किती दिवस अन्याय होत राहणार?

बिलोली येथे दलित महिलेवर अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला असल्याच्या काल बातम्या आल्या. सतत या देशात एका मुलीवर, चिमुरडीवर, युवतीवर, महिलेवर अत्याचार होतच असतो. हे का होते, यावर कसा आळा घालता येईल, कोणते कायदे आणता येतील ह्याबाबत अनेकवेळा चर्चित चर्वण झाले, नियोजन झाले, कायदे आले, शिक्षा झाल्या; होताहेत पण घटना घडायच्या थांबत नाहीत. दररोज कुठे ना कुठे तरी स्री अत्याचाराची कहाणी कानावर पडत असते. मानवी समाजाची संरचना संस्कारक्षम तत्वांवर उभी राहिलेली आहे. इथे स्रीला देवता मानण्यात येते. परस्रीला मातासमान मानण्यात येते. आदर्श जगण्याच्या भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान मोठ्या गर्वाने सांगितले जाते. परंतु अशा घटनांमुळे स्वत:च्याच देशात शरमेने मान खाली जाईल आणि स्वत:च्याच जगण्यावर छी: थू: करुन घ्यावी इतकी किळस येते.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मूकबधिर असहाय्य तरुणीवर काही आरोपी नराधमांनी पाशवी लैंगिक अत्याचार केला आणि हा पाशवीपणा उघड होऊ नये म्हणून नियोजितपणे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आणि त्या ” निर्भया ” तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी तिचा चेहरा दगडांनी ठेचून विद्रुप करित तिला ठार मारले. या
दलित तरुणीवर अमानवीय लैंगिक अत्याचार व निर्घृण खून प्रकरणात कलम वाढ करून आरोपींना कठोर शासन करणे तथा पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. बिलोली येथील या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन होण्यासाठी कलम २०१ भा.द.वि. आणि कलम ३७६ (एम) भा.द.वि. यांचा समावेश होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सहीत या अत्याचार प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग आणि समावेश असल्याचा उलगडा होत आहे. असे पीडितांच्या कुटुंबातील व्यक्तींचे म्हणणे आहे. पीडितेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळावा आणि खऱ्या दोषींना कडक शिक्षा व्हावी म्हणून कलम ३४ भादविचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे.

सदरील प्रकरणात मयत पीडितेच्या कुटुंबियांना सामाजिक न्यायाच्या परिपेक्षात आर्थिक मदत होणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. या अत्याचार प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, त्या नराधम आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेच्या कुटुंबियांचे सामाजिक न्यायाच्या परिप्रेक्षात पुनर्वसन व्हावे, या करिता मा.क.प.च्या वतीने मागणी करण्यात आली आहे. तातडीने कारवाई करण्यास प्रशासनाने हयगय केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माकपच्यावतीने देण्यात आला आहे.

या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनुसार या भोळसर आणि मुक्या युवतीवर एका २४ वर्षीय युवकाने अत्याचार करुन दगडाने ठेचून तिचा खून केल्याची अत्यंत भयानक घटना घडली आहे. याचा निषेध म्हणून ११ डिसेंबर रोजी बिलोली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात मातंग, बौद्ध, मुस्लिम समाजासह काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, वंचित बहुजन आघाडीचे तसेच मराठवाड्यातील अनेक सामाजिक संघटनांच्याही नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींचा समावेश होता. या मोर्चेकऱ्यांनी आरोपीची नार्को टेस्ट करा, सीआयडीमार्फत चौकशी करा, परिवारातील सदस्यांना शासकीय नोकरी द्या आदी विविध मागण्या केल्या.

एका वस्तीमध्ये एक २६ वर्षीय युवती राहत होती. ती युवती मुकी आणि भोळसर होती. त्याच वस्तीमध्ये साईनाथ राम निमोड (२४) याचे एक छोटेखानी किराणा दुकान आहे. युवती मुकी आणि भोळसर असली तरी या युवकासोबत तिची ओळख होती. आपल्या मनात पापाचा आलेख मांडलेल्या या युवकाने ९ डिसेंबर रोजी रात्री तिला आपल्यासोबत एका निर्मूनुष्य ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना ९ डिसेंबर रोजी जनतेला माहित झाल्यानंतर याबद्दल सर्वत्र रोष तयार झाला.

आलेल्या तक्रारीनुसार बिलोली पोलिसांनी गुन्हा क्र.201/2020, भारतीय दंडसंहितेच्या कलम 302, 376, (2), 354, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे हे घटनास्थळी गेले आणि त्यांनी योग्य सूचना दिल्या. त्यानुसार बिलोली पोलिसांनी आज दि.१० डिसेंबर रोजी साईनाथ राम निमोडला आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी दिली आहे. दि. १० डिसेंबर रोजी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर आपल्या पोलीस पथकासह बिलोलीमध्ये आहेत. मुक्या व भोळसर युवतीवर झालेला अत्याचार आणि अत्याचार करून झालेला खून ही अत्यंत त्रासदायक घटना घडल्यामुळे जनतेमध्ये रोष तयार झाला आहे. म्हणूनच आपल्या आचरणाची नितीमूल्ये घरातूनच पालकांनी आपल्या बालकांना दिली तर अशा घटना घडणार नाहीत, असे म्हंटले जाते. या प्रकरणात साईनाथ सोबत आणखी कोणी इतर लोक होते काय याचाही बिलोली पोलीस शोध घेत आहेत.

मुकबधीर, गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक प्रकरणं याआधीही घडली आहेत. या नराधमांनी निष्पाप, दिव्यांग लेकरांनाही सोडलं नाही. २०१८ मध्ये असेच एक प्रकरण उजेडात आले. चार महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. मुलीला दिवस गेल्यानं हे प्रकरण उजेडात आले.

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली होती. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहारूल इस्लाम अब्दुल वाहीद लस्कर ऊर्फ शाहरुख असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. ती मूकबधिर आणि गतिमंद आहे. ती कचरा वेचण्यासाठी जायची. त्यावेळी आरोपी तिला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करायचा. आरोपी शाहरुखने केलेल्या बलात्कारामुळे पीडित मूकबधिर मुलीला दिवस गेले आहेत. पिडीत मूकबधिर मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. या मुलीचे वडील देखील अंध आहेत.

अल्पवयीन मूकबधीर मूलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार कसबा पिंप्री येथे उघडकीस आला आहे. पिडीत मुलगी मुकबधीर असल्याचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन युवकाने मुलीवर अत्याचार केले. यातून पिडीत मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
याप्रकरणी मुंबई पोलिसात संबंधीत अल्पवयीन मुलाविरूध्द पोक्‍सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून शुन्यने पहूर पोलिसात मध्यरात्री सदर गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन युवकाने पिडीत मुलीच्या घरात बळजबरीने घुसून अत्याचार केला आहे. या प्रकारातून पिडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरूध्द पोक्‍सो (बाल लैंगिक अत्याचार सरंक्षण) कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर शहरातील नंदनवन परिसरातही गतवर्षी एका १४ वर्षीय मुकबधीर मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विनोद तांडी आणि शुभम गंगाबोईर अशी आरोपींची नावं असून ते पीडितेच्या घराशेजारीच राहतात. हे दोघेही आरोपी बेरोजगार असून त्यांचे आई-वडील हातमजुरी करतात. पीडित मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त नाशिकला गेले होते. त्यामुळे ती आजी आणि मोठ्या बहिणीसह घरी एकटीच होती. तेव्हा आरोपी पीडितेच्या घरी आले आणि त्यांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. पीडित मुलगी ही मुकबधीर असल्यामुळे ती आरडाओरडा करू शकली नाही. पण, याच दरम्यान तिचे मामा घरी आल्यानं हा प्रकार उघडकीस आला.

एक काळ बलात्काराच्या घटनांची मालिकाच लागल्याचा होता. २०१६ मध्ये मानखुर्द येथेही एक १५ वर्षीय मुकबधीर मुलगी दोघा नराधमांची शिकार बनली होती. काल संध्याकाळी या मुलीवर बलात्कार झाला. या मुलीला वैद्यकीय तपासण्यांसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानखुर्द येथील एका आश्रमातील ही मुलगी. या मुलीला एकटे हेरुन नराधमांनी डाव साधला. हे इसम नेमके कोण होते याचा शोध लागलेला नव्हता. याप्रकरणी दोघा अज्ञात इसमांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे दोघेही आजूबाजूच्या परिसरात राहणारे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती.

चेंबूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय मुकबधीर मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीनं तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीच्या मुलीनं ही घटना पाहिल्यानंतर तिनं तिच्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानुसार आरोपीच्या पत्नीनं चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल आरोपीला अटक केली.

बेळगाव जिल्ह्यात मुरगोड येथे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका गावात १५ वषीय मुकबधीर व मतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. ती मुलगी सहा महिन्यांची गर्भवती झाली होती. यासंबंधी मुरगोड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. त्या पिडीत मतीमंद मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

ती मुलगी मुकबधीर, मतीमंदही होती. त्यामुळे आपल्या सोबत काय झाले आहे? याची कल्पनाही तिला नव्हती.कोणामुळे आपल्यावर वेळ ओढवली आहे? हे सांगण्याइतपतही ती मानसिकरित्या स्थीर नव्हती. पोटदुखीचात्रास जाणवल्यामुळे तिला कुटुंबियांनी तिला दवाखान्याला नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनीसांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी तिला दाखल करण्यात आले होते. मुकबधीर वमतीमंद मुलीवर बलात्कार करणारा नराधम कोण, याचा शोध घेण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली होती.

अशा अनेक घटना घडतात तेव्हा लोकांना खूप दु:खं होतं. मोर्चे काढले जातात. फाशीची मागणी केली जाते. भर चौकात. सोशल मीडियावर उधाण येते. त्याआधी पीडितेची जात पाहिली जाते. मग जातीनिहाय मोर्चे, आंदोलनाला सुरुवात होते. पीडिता कोणत्याही जातीची असो, त्याआधी ती एक महिला आहे याचे भान सकल समाजाला नसते. इतर जातीला ती आपली मुलगी, महिला वाटत नाही. ती ज्या जातीची, ज्या समाजाची तोच समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. बिलोली (जि. नांदेड) शहरातील झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय अविवाहित मूकबधिर तरुणीवर बलात्कार करून दगडाने ठेचून खून केल्याकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने एका आरोपीस बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले.

बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपलेली मातंग समाजातील मयत मूकबधिर सुनीता नबाजी कुडके (वय २७) आपल्या बहिणीकडे शहरातील झोपडपट्टी(नवीन आबादी) येथे वास्तव्यास होती. मयत तरुणीची बहीण मोलमजुरी करून मूकबधिर तरुणीचा सांभाळ करत होती. ९ डिसेंबर रोजी सदर बहीण नित्यनियमांप्रमाणे मोलमजुरीस गेली होती. सायंकाळी कामाहून परतल्यानंतर मूकबधिर बहीण घरी नसल्याने शोधाशोध सुरू केली; परंतु झोपडपट्टीलगत असलेल्या जि.प.शाळेच्या पाठीमागे शौचास गेल्यानंतर सदर बहिणीवर काही नराधमांनी बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला दगडाने ठेचून खून केल्याचे आढळून आले.

शेजाऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सहा. पो. निरीक्षक रामदास केंद्रे, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर, रत्नाकर जाधव, गंगाधर कुडके यांना देताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयास सुपूर्द केला. सदर घटनेबाबत मयताचे चुलत भाऊ दयानंद विठ्ठल कुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३०२,३७६,३५४ भा.दं.वि.नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सदर घटनेचा विविध स्तरातून निषेध होत असून, या प्रकरणातील नराधमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आरोपींना अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक व समाजबांधवांनी घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री सहा. पोलीस अधीक्षक विजय काबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली, तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी श्वान पथकाच्या साहाय्याने बिलोली येथील एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले. सदर मृतदेहावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका मातंग युवकाने एक प्रश्न विचारला आहे, माझ्या समाजातील ही मुलगी मूकबधिर होती..तिला बोलता ही येत नाही व कानाने ऐकताही येत नाही, अशी अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेली आई-वडील नसलेली निरागस मुलगी जिचा परतपाळ तिची बहीण करत होती अश्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिला ठेचून मारले ही घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील साठे नगर येथे घडली.
अरे भडव्यांनो तुमचं मन एवढं निर्दयी कसं झालं?
या पुरोगामी महाराष्ट्रात आमच्या समाजावर किती दिवस अन्याय होत राहणार?

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
११.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *