शिवास्त्र : शब्देविन संवादु
किताबों सी शख्सियत दे दे मेरे मालिक,खामोश भी रहूं और सब कुछ बयाँ कर दूं..!!
मौनम् सर्वार्थ साधनम् – काहीजण न बोलताही खुप काही सांगून जातात तर काहीजण बोलतात खुप पण सांगत काहीच नाहीत. बरेचशे सांगतात खुप पण त्यांनी सांगितलेलं कळतच नाही. आपलं बोलणं समोरच्यांना कळणं हा खरा संवाद..!!
वाचन – चिंतन – मनन – लेखन – पर्यटन – संभाषण – संवाद ही ज्ञानसंपादनाची प्रमुख साधने मानली जातात. संभाषण जेव्हा फलदायी, विचारप्रचारक, नवनिर्मितीचालक, नाविन्यवाहक ठरतो तेव्हा ते संभाषण ‘संवाद’ या संज्ञेत मोडते. एखाद्या विषयावर मोजकं पण नेमकं बोलणं हे खरे विद्वत्तलक्षण.! यासाठी हवे चौफेर वाचन, चौकस आकलन आणि सुक्ष्म निरिक्षण दृष्टी. व्यासंग वाढला की कुणालाही सहज व्यक्त होता येतं.
श्रोत्यांना आपलं बोलणं कानात साठवून ठेवावं वाटणं हा संवाद विजय, हे खरे संभाषण कौशल्य. गीता प्रसवणारे भगवान श्रीकृष्ण, जगाला धम्म देणारे सर्वोत्तम भुमिपुत्र तथागत सिध्दार्थ गोतम बुध्द, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिकागोश्री स्वामी विवेकानंद, सत्याग्रह शिरोमणी महात्मा गांधी, शहीद भगतसिंग ही संभाषण कुशलतेची वैश्विक आयडॉल समजल्या जाणारी भारतीय प्रेरक महामानवं, जागतिक वाक्-पटू.! यांच्या वाणीत आणि मौनात सारखीच ताकद होती. वाणीत आणि मौनात सारखाच दम असणं हाच ‘शब्देविन संवादु’
नेमकं कुठे बोलावं, किती बोलावं, कधी आणि कुठे थांबावं हे ज्याला कळलं तो संवादात सर्वार्थ साधन नक्कीच पावतो. आपलं गप्प बसणं सुध्दा मुक संवाद बनवता यायला हवा, अगदी पुस्तकांसारखा…
इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर (नांदेड)मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली