ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर
•••
एक शेतकरी नेता होता. राजीव गांधींच्या विरोधासाठी पाॅलिस्टरला राजीववस्त्र म्हणून हिणवायचा ! राजीव वस्त्राची होळी करायचा.
एक अंबाणी होता. त्याचा पाताळगंगा नावाचा वस्त्राचा कारखाना होता. शेतकरी नेता कारखान्याला घेराव करायला निघाला. हजारो शेतकरी विश्वास ठेवून गोळा झाले. अंबानीनं नेत्याला काय मंत्र दिला माहीत नाही, घेराव रातोरात मागे घेण्यात आला. कुणाशी चर्चा नाही, कुणाला माहीत नाही.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. शेतकरी नेत्यानं विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा फंडा जाहीर केला. शेतकरी चळवळीतील योगदान हा निकष असल्याचा देखावा करण्यात आला. पण निवडतांना मात्र बहुतेक उमेदवार भाजपचे असतील याची काळजी घेतली गेली. हा केवळ योगायोग असेल का ?
प्रा. महादेवराव शिवणकर हे त्यावेळी भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शेतकरी आंदोलनात त्यांचं चांगलं योगदान होतं. त्यांना मात्र पाठिंबा दिला गेला नाही. तो प्रफुल्ल पटेल यांना दिला गेला. प्रफुल्ल पटेल हे कोणत्याही अंगानं शेतकरी आंदोलनाशी संबंधित नव्हते. मात्र मोठे भांडवलदार होते. अंबानी सारखा तेंदुपत्ता हा पटेल यांचा मोठा उद्दोग होता. तो फॅक्टर महत्वाचा ठरला असेल का ? किंवा नागपूर शाखेचा विशेष आदेश होता का ? शिवणकर सारख्या शेतकरी नेत्याशी अशी बेइमानी कशासाठी केली गेली असेल ? त्यामागील लॉजिक आजपर्यंत समजलेलं नाही.
हे सारं आठवण्याचं कारण असं की, सद्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे ( शिल्लक असलेले जोशी भक्त ) लोक जिवाच्या आकांतानं बोंब मारायला लागलेत. त्यावेळी शरद जोशी यांच्या अवतीभवती असलेले लोक, आताही ज्या पातळीवर जाऊन शेतकरी आंदोलनाची बदनामी करण्यात जीव ओतत आहेत, शेतकऱ्यांना खलिस्तानी, आतंकवादी सारखी दूषणे लावत आहेत, ते बघून संशय निर्माण होतो. बहुतेकांच्या सोशल मीडियावरील पोस्ट बघून हे सारे संघाचे स्लीपर सेल असावेत, याबद्दलचा संशय दृढ व्हायला मदतच होते. योगेंद्र यादव यांच्यासारख्या नेत्याला देखील या बाजारबसव्या वृत्तीच्या लोकांनी शेतकरी विरोधी जाहीर करून टाकले !
त्याचवेळी तिकडे मुकेश अंबानी पण शेतकऱ्यांच्या विरोधात पातळी सोडून बोलायला लागला असे ट्विट वाचण्यात आले. काँग्रेसच्या राज्यात शेतकरी उपाशी मरत होता, पण मोदींच्या काळात तो सहा महिन्याचे राशन घेवून दिल्ली फिरायला निघाला, अशी त्याची नीच कॉमेंट मीडियातून फिरत आहे. मुकेश अंबानी यांचा स्वतःचा बाप पेट्रोल पंपावर लोकांच्या गाडीत पेट्रोल भरण्याचं काम करत होता, हे मुकेश अंबानी यांना माहीत नाही का ? आता जेट मधून फिरणारे मोदी स्वतः तीस वर्षे भीक मागून जगत होते, असं मोदी स्वतः म्हणाले होते, याची आठवण अंबानी विसरले आहेत का ?
एक मोदी, दुसरे जोशी पण दोघांचीही कार्यपद्धती हेकेखोर, हुकुमशाही, दांभिक आणि दुटप्पी. वर दिलेली उदाहरणं इथं देण्याचा उद्देश प्रवृत्तीमधील साम्य दाखविणे एवढाच आहे !
संघाच्या परंपरे नुसार या बाबतीतही संघ स्वतः काही बोलताना दिसत नाही. एकीकडे त्यांच्यातल्याच एका संघटलेला आंदोलनाला समर्थन करण्याचं नाटक करायला लावलं आणि दुसरीकडे मोदी – शहा शेतकऱ्यांना गुलाम करायला निघालेत. बाजपेयी मंडल आयोगाची तोंड देखली भलावण करायचे आणि अडवाणींनी मंडल विरोधात रथयात्रा काढून देश पेटवून दिला. संघ गांधींना प्रत:स्मरणीय म्हणतो आणि त्याचे स्लीपर सेल गोडसेचा उदोउदो करतात, हीच परंपरा शेतकरी आंदोलना बाबतही सुरू आहे !
दांभिकपणा हा संघाचा स्थायीभाव आहे. संघाचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांचे लोक देशात पुन्हा मनुस्मृती आणायला उतावीळ झालेत. सारा देश त्यांना गुलाम हवा. त्यांना लोकशाही चौकट नको आहे. ती उध्वस्त करायचीय. शरद जोशींना तरी दुसरं काय हवं होतं ? त्यांना सरकार नावाची व्यवस्थाच नको होती. ‘सरकार क्या समस्या सुलझायेगी, सरकार ही समस्या है’ हा त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आहे. मग सरकार ऐवजी कोणती पर्यायी व्यवस्था आणणार, यावर मात्र जोशी चूप ! त्यांचे चेले चूप ! मनुस्मृती हवी, असं डायरेक्ट कसं म्हणणार बिचारे ?
खुली अर्थव्यवस्था असंघटित, अज्ञानी आणि गरीब समूहाच्या फायद्याची कधीच असू शकत नाही. भारतीय शेतकरी जागतिक बाजारपेठेत तर सोडाच स्थानीय बाजारपेठेत देखील तग धरू शकत नाही. याची जाणीव शरद जोशी यांना नव्हती का ? ‘हातावर आणणं आणि पानावर खाणं’ अशीच अवस्था बहुसंख्य शेतकऱ्यांची आहे. ते खरंच खुल्या बाजारपेठेत तग धरू शकतील का ?
संघाचं हिंदुत्व जसं, बोलाचीच कढी.. म्हणजे केवळ घोषणे पुरतं मर्यादित तशीच जोशींची मुक्त बाजारपेठ ! शेतकऱ्यांना तशी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा जोशींनी कधी प्रयत्न केला का ? निदान शेतकऱ्यांना बियाणं, खतं, फवारणीसाठी लागणारी औषधी यासाठी तरी संघटनेनं कधी पर्यायी व्यवस्था उभी केली होती का ? ती तर त्यांना सहज उभारता आली असती. कारण त्यांचे स्थानीय पातळीवरचे बहुतेक नेते हे कृषी सेवा केंद्राचे मालक होते. पण त्यांनी देखील खतं, बियाण्यांचा काळा बाजार केला, हे संघटनेला माहीत नव्हतं का ?
अर्थात, शरद जोशी डायरेक्ट संघ स्वयंसेवक असायलाच हवेत, असा त्याचा मुळीच अर्थ नाही. उलट अशावेळी वर वर विरोधी वाटणारी व्यक्तीच जाणीवपूर्वक निवडली जाते. जसे ओवेसी नेहमी भाजपा, संघ, हिंदू विरोधी गरळ ओकत असतात. आणि मग त्याची प्रतिक्रिया म्हणून भोळा भाबडा बहुजन हिंदू आयताच संघ, भाजपाच्या जाळ्यात अडकतो.
संघ दुटप्पी आहे, शरद जोशी देखील दुटप्पी होते. मात्र त्यांच्या अजेंड्यात कमालीचे साम्य होते. एकीकडे जोशी महात्मा फुले यांचे नाव घ्यायचे. विज्ञानवादी असल्याचा आव आणायचे. त्यांचा अंतिम संस्कार देखील वैज्ञानिक पद्धतीनं झाला म्हणतात. त्यांची राख किंवा अस्थी कुठं विसर्जित केल्या गेल्या, हे बाहेर कुणालाही माहीत नाही, त्यांनी त्यांची सारी संपत्ती देखील दान करून टाकली, हेही जाहीर आहे. पण मग सामाजिक जीवनात त्यांनी तशीच भूमिका घेतली होती का ?
शरद जोशींनी भोळ्या शेतकऱ्यांचे धार्मिक शोषण मात्र पद्धतशीरपणे केले. शेगाव सारख्या किंवा अन्य तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मेळावे घ्यायचे, बाया बापड्यांना देवाधर्माच्या आडून मोठी गर्दी उभी करायची. पण दुसरीकडे महात्मा फुले यांच्या नावाचाही वापर करायचा ! म्हणजे एकाचवेळी गजानन महाराज आणि महात्मा फुले या दोघांचाही हुशारीने वापर करायचा.. हा काय प्रकार आहे ?
बहुतेक कृषी सेवा केंद्र वाले शेतकरी संघटनेचे नेते होते. ( मोजके अपवाद असतीलही..पण ) हंगामामध्ये तेच सिड, खते, कीटकनाशके यांचा काळा बाजार करायचे. संघटनेच्या सदस्यांनाच दाम दुपटीनं विकायचे. याविरोधात शरद जोशींनी काय भूमिका घेतली होती ? उलट तेच लोक तर त्यांचे आधारस्तंभ होते.
एकंदरीत मोदीही तसेच आणि जोशी ही तसेच ! मोदीही ‘सबका साथ, सबका विकास’ची बोंब मारत मारत काय दिवे लावतात हे आता लपून राहिलेले नाही. पक्षातल्या आपल्या सहकाऱ्यांना तर सोडाच पण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सारख्या संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींना सुद्धा संसद भवनाच्या शिलाण्यास कार्यक्रमात पद्धतशीरपणे टाळणं, हा यांचा सबका साथ.. ! शरद जोशी यांनी सुद्धा संघटनेत पद घेतले नाही. पण इतर कुणाचीही स्वतंत्र ओळख निर्माण होणार नाही, याची पद्धतशीर काळजी घेतली. त्यांच्या संघटनेचे अध्यक्षपद फक्त एक वर्षांचे असायचे. अध्यक्ष झाला कधी आणि गेला कधी, लोकांना पताही लागायचा नाही. म्हणजे सारे.. एक दिवसाचे गणपती ! पण तो संघटनेचा अंतर्गत मामला आहे !
थोडक्यात, शरद जोशी यांची एकूणच वैचारिक मांडणी आणि प्रत्यक्ष कृती ही निव्वळ गोंधळात गोंधळ होता. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून त्यांची मुख्य धारा जवळपास नष्ट होण्याच्या परिस्थितीत आहे. शरद जोशी यांच्या अफलातून घोषणा आणि कृतीचा विचार केला तरी आपल्याला वैचारिक गोंधळाची बऱ्यापैकी कल्पना येवू शकते.
• मत मागायला आलो तर जोड्यानं मारा !
( मात्र.. जोशी स्वतः निवडणुकीला उभे राहिले )
• सरकार क्या समस्या सुलझाएगी, सरकार ही समस्या है !
( राज्यसभेवर जाण्यासाठी जंग जंग पछाडले. शिवाय स्वतःची पार्टी काढून निवडणुका लढविल्या.. )
• सत्ताधारी मोठे चोर, विरोधी पक्ष छोटे चोर ! मोठ्या चोराला धडा शिकवण्यासाठी छोट्या चोराला मदत करावीच लागते !
( राज्यसभेच्या निमित्ताने मोठ्या चोरांच्या कळपात स्वतःच सामील झाले )
• हिरवी गिधाडे, भगवी गिधाडे, निळी गिधाडे
( बहुसंख्य वेळा भाजपाच्या सोयीची भूमिका घेतली. भगव्या गिधाडांच्या कळपात सामील झाले. )
• आम्ही आमच्या पुरते पिकवू !
( ऐकायला आकर्षक वाटत असला तरी व्यवहारात पोरकट असलेला अचाट विचार.. कधीही उपयोगात आणण्याची हिम्मत केली नाही. का ? )
• गोहत्या बंदी बद्दल वरवर विरोध दाखवायचा, हे शेतकऱ्यासाठी योग्य नाही असं बोलायचं, पण लगेच ‘भावनेच्या आडून’ त्या कायद्याचे समर्थन देखील करायचे, ही कोणती वैज्ञानिक भूमिका असावी ? असा सारा दुटप्पीपणा शरद जोशी यांच्या लिखाणात आणि वागण्यात ठासून भरला होता.
मात्र शेतकरी संघटनेत अनेक नेते, कार्यकर्ते प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यावर निखारे ठेवून सहभागी झाले होते. त्यातले अनेक बर्बाद झालेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. अनेकांचा भ्रमनिरास झाला. दुटप्पीपणा बघून त्यांनी आपापले मार्ग शोधले. काही राजकीय दृष्ट्या यशस्वी झालेत, काही अजूनही टिकून आहेत, तर काही निराश होऊन घरी बसलेत. आणि उरलेले मात्र अजून जोशी यांची पालखी घेवून नाचत आहेत.
यात कृषीसेवा केंद्र वाल्यांनी मात्र हात धुवून घेतलेत. असो.
शरद जोशी यांनी असंघटित असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करून एका क्रांतीच्या दिशेनं वाटचाल केली, असं बऱ्याच भाबड्या विचारवंतांना त्यावेळी वाटायला लागलं होतं. आपण तसेही भोळे आहोत. चिकित्सा आपल्याला नको असते. भक्ती हा आपला खास स्वभाव आहे ! आणि त्यातूनच नकळत अंधभक्तिकडे वाटचाल सुरू होते. शरद जोशी यांच्या मांडणीत असलेला विरोधाभास आणि भोंगळपणा त्यामुळेच लोकांच्या लक्षात आला नाही. अशिक्षित शेतकऱ्यांना त्यासाठी दोष देता येणार नाही, पण विचारवंतांना देखील समजू नये, ही खरी शोकांतिका आहे. शरद जोशी यांनीही तशी पुरेपूर काळजी घेतली. कधी शेगाव, कधी पंढरपूर, कधी फुले, कधी महिलांच्या नावाने सातबारा.. असे बेमालूम मिश्रण ते करत राहिले. पण नेमक्या वेळी महिला आरक्षणाला मात्र त्यांनी राज्यसभेत विरोध केला. हेही विसरता येणार नाही. म्हणजे शरद जोशी यांचे खरे रूप कोणते होते ?
मते मतांतरे असू शकतात. पण शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या नावानं महाराष्ट्रात एक झंझावात निर्माण केला होता, यात संशय नाही. मात्र एकदा भ्रमनिरास झाला, विश्वासघात झाल्याची जाणीव लोकांना झाली की, नंतरची अनेक वर्ष पुन्हा अशी आंदोलनं उभी राहू शकत नाहीत, हे भयानक वास्तव मान्य करावेच लागेल. ही भीती तेव्हाही मी बोलत होतो. त्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची जी हानी झाली, ती भरून निघायला आणखी किती वर्ष जातील सांगता येणार नाही.
पण कठोर आत्मचिंतन करून, झालेल्या चुका टाळून पुढे जाता येणार नाही का ? कुणीही परिपूर्ण नाही, चुका प्रत्येकाच्याच होतात, पण त्या दूर करून, नवी मांडणी करता येणार नाही का ? आपापला इगो बाजूला ठेवला, अंधभक्ती सोडली, शेतकऱ्यांच्या हिताचा वास्तविक विचार केला, तर कुठल्याही परिस्थितीतून नवा मार्ग काढता येवू शकतो, असं मला वाटते.
असो..!
तूर्तास एवढंच..!
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष