उपक्रम – स्मृतिगंध (क्र.३६) कविता मनामनातल्या**(विजो) विजय जोशी – डोंबिवली* कवी – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

कवी – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
कविता – बहु असोत सुंदर संपन्न की महा

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर.
कवी, लेखक, नाटककार, समीक्षक.
जन्म – २९/०६/१८७१ (अकोला).
मृत्यू – ०१/०६/१९३४ (पुणे).

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे एक अष्टपैलू प्रतिभावंत साहित्यिक होते. कवी, लेखक, नाटककार, समीक्षक विशेषतः विनोदी लेखक अशा विविध प्रकारात लेखन करून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. “सुदाम्याचे पोहे” प्रसिद्ध साहित्यकृती आणि “बहु असोत सुंदर, संपन्न की महा” या सुप्रसिद्ध महाराष्ट्र गीताचे रचनाकार म्हणून कोल्हटकर सर्वपरिचित आहेत.

कोल्हटकरांना लहानपणापासूनच नाटकांची खूप आवड होती. १८९१ मध्ये “मृच्छकटीक” या संस्कृत नाटकात अभिनय करून आपल्या कलेची चुणूक दाखविली होती.
शिक्षण सुरू असतानाच “विक्रम शशिकला” या नाटकावरील कोल्हटकर यांची समीक्षा विविध ज्ञान विस्ताराने प्रसिद्ध झाली.

गुप्तमंजुषा, जन्मरहस्य अशी एकापेक्षा एक सरस कोल्हटकरांनी एकून १२ नाटके लिहिली.
सुदाम्याचे पोहे, अठरा धान्यांचे कडबोळे, ज्यातिष गणित, श्यामसुंदर अशा अनेक उत्तमोत्तम कादंबरी लेखन त्यांनी केले.
त्यांच्या पद्य (कविता) रचनांनी नाट्यक्षेत्रात संगीतकलेला वेगळे वळण मिळाले.
असाधारण कल्पकता, व्यासंग, शास्त्रीय दृष्टी, शिस्तप्रियता व परीश्रमांची जोड यामुळे त्यांचे लेखन अधिक भारदस्त आणि प्रभावी ठरले.


म्हणून विसाव्या शतकात पहिल्या तीन दशकात
कोल्हटकर एक व्यक्ती न राहता एक संस्था बनले.

पुणे येथे भरलेल्या दुसऱ्या कविता संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
पुणे येथिल १९२७ मध्ये भरलेल्या १३व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कोल्हटकर ज्योतिष तज्ज्ञ होते. तिसऱ्या ज्योतिष परिषदेचे ते अध्यक्ष होते.


गंगाधर देवराम खानोलकर यांनी कोल्हटकरांचे चरित्र लिहिले.
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी श्रीकृंवर “श्री.कृ.कोल्हटकर व्यक्तीदर्शन” या नावाने समीक्षात्मक पुस्तक लिहिले.

अशा या प्रतिथयश प्रतिभावंताचे वयाच्या ६३ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. जाण्यापुर्वी कोल्हटकरांनी अनेक अजरामर साहित्यकृती रसिकांसाठी लिहून ठेवल्या.

“बहु असोत सुंदर संपन्न की महा” या अजरामर गीताचे जनक आहेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. या काव्यातून कोल्हटकरांची शब्दप्रतिभा आणि काव्यसौंदर्य आपल्याला दिसून येतं.
जगामध्ये कितीही सुंदर संपन्न विभाग असोत, पण आम्हाला प्रिय असलेला असा महाराष्ट्र हा एकच देश आहे. अशा शब्दांमध्ये कोल्हटकर महाराष्ट्राचे गुणगौरव वर्णन करताना महारष्ट्राची परंपरा, वीरता, निसर्ग, संपन्नता अशा विविध अंगांनी आदर्श असा महाराष्ट्र आपल्या समोर उभा करतात…

बहु असोत सुंदर संपन्न की

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

  • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
    ◆◆◆◆◆
    संदर्भ – इंटरनेट

विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)

सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.

Vijay Joshi sir


विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.


https://www.facebook.com/vijayjoshi20/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *