ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर
•••
खरं तर भ्रष्टाचार ही सामाजिक बिमारी आहे. पण आपण नेहमी सरकार भ्रष्ट आहे, नेते भ्रष्ट आहेत, अधिकारी भ्रष्ट आहेत, राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत अशी कुरकुर करत असतो. स्वतः सोडून बाकीच्यांनी इमानदार असावं, अशी आपली अपेक्षा असते. भ्रष्ट उमेदवार असला तरी आपणच त्याला निवडून देतो. सारे तसेच आहेत, असं म्हणून आपण मोकळे होतो. पण जर एखादा इमानदार उमेदवार उभा असेल त्याला मात्र मत देत नाही. तो निवडून येणारच नव्हता, त्यामुळे त्याला देऊन आपलं मत वाया कशाला दवडायचं, असा मूर्खपणाचा प्रश्न आपणच लोकांना विचारतो. खरं तर ही आपली बेईमानी आहे. वैचारिक दिवाळखोरी आहे.
मुद्दा असा की, आपल्याला खरंच भ्रष्टाचाराबद्दल चिड आहे का ? घृणा आहे का ? आणि असेल तर मग..
• भ्रष्ट नेत्यांना निवडून कोण देतो ?
• गरिबांच्या नावानं उघड उघड ऐय्याशी करणाऱ्या नेत्यांचा जयजयकार कोण करतो ?
• भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची समाजात वरवर कोण करतो ?
• धर्माच्या नावाखाली बलात्कारी, बदमाश गुंडांना तथाकथित साधू, संत, मुल्ला, मौलवी.. यांच्यासमोर लोटांगण कोण घालतो ?
याचा कधी विचार केला का आपण?
या साऱ्या पापाचे धनी आपणच आहोत, याची कधी जाणीव होत नाही का आपल्याला ? कधी लाज वाटली नाही का ?
‘आम्ही काय करणार.. सारेच तसे आहेत’, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती पळवाट असते. आपली बदमाशी असते. मखलाशी असते.
हे आपल्याला थांबवता येणार नाही का ?
स्वतःपासून सुरूवात करता येणार नाही का ?
चोराला चोर आणि सावाला साव म्हणण्याची हिंमत दाखवता येणार नाही का ?
किती दिवस आपण खाली माना घालून बसणार ?
किती दिवस लोकशाहीचं वस्त्रहरण मुर्दाडपणे सहन करणार ?
किती दिवस दुर्योधन – दुःशासनाच्या नावाचे होर्डिंग्ज लावणार ?
किती दिवस..
कुणीतरी कृष्ण यावा आणि द्रौपदीची इज्जत वाचवावी याची वाट पाहणार ?
सावधान.. लोकशाही धोक्यात आहे..!
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि
पुन्हा माणसांची लढू या लढाई
मनाला पुन्हा धार लावू नव्याने
मनासारखे शस्त्र कोठेच नाही !
तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 9004397917
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116