कंधार ; दिगांबर वाघमारे
ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे. बहाद्दरपुरा जिल्हा परिषद सर्कल मधील 14 ग्रामपंचायत ची मुदत संपलेली आहे. या गावातील एकोपा टिकवण्यासाठी व आपसातील मतभेद टाळण्यासाठी गावचा सार्वजनिक विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचे आव्हान जि प. सदस्य सौ.संध्याताई धोंडगे व पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी केले आहे. बिनविरोध ग्रामपंचायतला पंधरा लक्ष निधी विकास कामांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.
बहाद्दरपुरा सर्कलयध्ये जिल्हा परिषद गटातील 14 ग्रामपंचायत ची मुदत संपली असून निवडणूक प्रक्रीया 15 जानेवारी पर्यत चालणार आहे बहादरपुरा ,बामनी( प.क) पांगरा, संगुचिवाडी ,भंडारकुमटयाचीवाडी, लाठी (खुर्द), बोरी (खुर्द), पानभोसी, चिखलभोसी, घोडज, नवघरवाडी, धर्मापुरी, वंजारवाडी, बाबुळगाव या गावाचा समावेश आहे. यापैकी बिनविरोध ग्रामपंचायत काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे बोलताना म्हणाले की या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यास गावात शांतता व बंधुभाव सातत्याने कायम टिकून राहील व गावच्या सर्वांगीण विकास पण होईल,तसेच गावात एकोपा तर राहीलच सध्या कोरोना महामारी संकटात व्यस्त असलेले पोलीस बांधव ,व महसूल विभाग निवडणूक प्रशासनाचा यामुळे तानतनाव कमी होणार आहे.
गावात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बहादरपुरा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायती काढण्याचे आव्हान यावेळी केले आहे.
यावेळी शिवसेना नेते मुक्तेश्वर धोंडगे बोलताना बहादरपुरा सर्कल सह तालुक्यातील ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा संकल्प असून त्यानुसार सर्कल मध्ये भेटीगाठी सुरू आहेत. बहाद्दरपुरा जिल्हा परिषद गणातील ग्रामपंचायत बिनविरोध काढल्यास या गटातील जिल्हा परिषद सदस्य संध्याताई धोंडगे यांच्या कडून दहा लक्ष रुपये व पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांच्या निधीतून पाच असे एकुण 15 लक्ष रुपये बिनविरोध ग्रामपंचायतीला विकास कामासाठी निधी देण्यात येणार आहे.
बिनविरोध ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी देण्याचा मानस असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले .