कॉलेजला असताना एकदा मित्राला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मित्र जेवण करीत होता. त्याने जेवायला बस असा आग्रह केला.मला पण भूक लागलेली होती त्यामुळे मी कोणताही विचार न करता जेवायला बसलो. मित्राच्या घरची परिस्थिती तशी जेमतेमच होती. मसुरची सुकी डाळ व ज्वारीची भाकर असा साधाच पण चविष्ट मेनू होता. जेवल्यानंतर तृप्तीचा ढेकर देत त्याचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माझी सायकलची चावी विसरल्यामुळे मी परत घरात आलो असता आतील दृश्य पाहून हबकलोच. मित्राच्या दोन छोट्या बहिणी भांड्यात उरलेली भाजी घेण्यासाठी ओढाओढी करत होत्या. थोडीशीच भाजी शिल्लक होती आणि भाकर देखील अर्धीच उरलेली. उगाच आपण त्यांच्या हिस्याचे जेवलो याची जाणीव झाल्यामुळे ओशाळून गेलो. अन्नाची काय किंमत आहे याची जाणीव क्षणात मला झाली.
दुसरी घटना आहे मी नुकताच नगरसेवक झालो तेव्हाची. महापालिकेच्या कार्यालयासमोर गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय होते. संध्याकाळी वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी मी गेलो. परत येत असताना जे पाहिले ते आजही डोळ्या समोरून जात नाही. महापालिकेच्या कॅम्पसमध्ये विटा रचून काही महिला स्वयंपाक करत होत्या. वॉचमन त्यांना बाहेर जा म्हणून दरडावत होता. महिला थोडा वेळ थांबा म्हणून गयावया करत होत्या. काय प्रकार आहे याची मला कल्पना आली. मी थोडे पैसे त्या महिलांना देऊन हॉटेलातून जेवण विकत घेण्यास सांगितले. यानंतर महिनाभरात तीन-चार वेळा या घटनेची पुनरावृत्ती झाली. प्रत्येक वेळी अर्थिक मदत करणे शक्य नव्हते. काहीतरी उपाय शोधला पाहिजे व या अशा गरजू लोकांसाठी आपण काही तरी केले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली व सतत या विषयावर मी विचार करू लागलो.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकरकाका डोईफोडे यांच्याशी चर्चा करत असताना मार्ग सापडला. त्यांनी सांगितले की, नृसिंह दांडगे हे रुग्णसेवेचे काम करत असताना जेवणाचे डबे पुरवायचे. तो धागा पकडून मी एक नवीन उपक्रम तयार केला. ज्याला नाव दिले ‘भाऊचा डबा’. महिन्यातून एकदा एका व्यक्तीचा जेवणाचा डबा आपल्या घरी बनवून द्या असे वृत्तपत्रातून आवाहन केले. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. आलेल्या जवळजवळ बत्तीशे नावांपैकी दीड हजार नावांची यादी फायनल केली. प्रत्येकाची एक तारीख निश्चित करण्यात आली. भारतीय महिला अन्न कितीही देतील पण जर स्टीलचा छोटा चमचा परत मिळाला नाही तर अस्वस्थ होतील याची जाणीव असल्यामुळे स्टीलचे चार खाणी डबे विकत घेण्यात आले. त्या ठराविक तारखेला आमचा स्वयंसेवक रिकामे डबे घेऊन त्या त्या व्यक्तींच्या घरी जायचा. माऊलीने वरण-भात-भाजी-पोळी भरून दिल्यानंतर शासकीय रुग्णालयातील बाहेरगावच्या वेगवेगळ्या ५० रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज आम्ही डबे देऊ लागलो. महिलांना एका व्यक्तीचा डबा द्यायला सांगितला असला तरी जास्तीचे अन्न दिल्यामुळे दोघे तिघे सहज जेवायचे. नऊ वर्षांत १,६४,००० डबे आम्ही जमा करून गरजू रूग्णापर्यंत पोहचविले. पुढे शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे स्थलांतरित झाल्यानंतर आमचा उपक्रम थांबला. महाराष्ट्रातील सर्व टीव्ही चॅनल आणि प्रमुख वृत्तपत्रांनी भाऊच्या डब्याची नोंद तर घेतलीच पण सोबत भरभरून कौतुक ही केले.
मागे एकदा दत्त जयंती निमित्त माहूर येथे पदयात्रा घेऊन गेलो असता रेणुका मातेच्या पायथ्याशी हार घेतले. म्हातारी आजी हाराचे पैसे काही घेईनाच. कारण विचारले असता तिने सांगितले की, आजारी असताना नांदेडच्या दवाखान्यात सात दिवस तिला आमचा भाऊचा डबा मिळाला होता. त्यावेळी दिलीप ठाकूर हे नाव तिने पक्के ध्यानात ठेवले होते. आमच्या सर्व यात्रेकरुंचे एक सारखे टी-शर्ट व त्यावर माझे नाव पाहून तिला कुतूहल वाटले .कारण या अगोदर असे चित्र तिने पाहिले नव्हते म्हणून तिने यात्रेकंरूबद्दल चौकशी केली असता तिला कोणीतरी माझे नाव सांगितले. मीच दिलीप ठाकूर असल्याची खात्री झाल्यामुळे पैसे घेण्यास तिने नकार दिला होता. चांगले काम कधीही वाया जात नाही याचा प्रत्यय मला त्यावेळी आला.
दोन वर्षांपूर्वी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या बैठकीमध्ये “फीड द हंगर” या थीम वर प्रोजेक्ट घ्यायची चर्चा सुरू होती. मी भाऊच्या डब्या बद्दलची माहिती दिली. सर्वानुमते रयत रुग्णालयात भाऊचा डबा सुरु करण्याचे ठरले. तब्बल एक वर्ष रोज दहा डबे देण्याचे श्री आशिष भंडारी यांनी जाहीर केल्यामुळे आमचा उत्साह वाढला. भाऊचा डबा ऐवजी लॉयन्सचा डबा असे नामकरण करण्याचा माझा प्रस्ताव सर्वांनी सहर्ष पारित केला. १ जानेवारी २०१९ पासून आजतागायत रयत रुग्णालयात दररोज डबे देण्यात येत आहेत.
रयत रुग्णालयात बाहेर गावाहून आलेल्या गरीब रुग्णांना दररोज डबे देण्यात येतात. डब्यामध्ये चपाती, भाजी,वरण-भात चा समावेश असतो. ज्यांच्या वतीने डबा देण्यात येणार असेल त्याचे नाव असणारे कार्ड डब्या सोबत रुग्णाना देण्यात येते. दररोज ज्या रुग्णांना डबे देण्यात आले व ज्यांच्यातर्फे डबे देण्यात आले याची नोंद ठेवण्यात येत असते. अनेक दानशूर व्यक्तींनी अग्रीम नोंदणी केलेली आहे. एखाद्या शुभ प्रसंगी अथवा आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आतापर्यंत रयत मध्ये १८५२० डबे देऊन गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अल्पसे सहकार्य करण्यात आले आहे.
कोरोना महामारी ने सर्व परिस्थिती बदलून टाकली. माझे पत्रकार मित्र महेश राजे यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन मध्ये अनेक विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. अनेक जण अन्नदान करत आहेत. परंतु हे विद्यार्थी वेगवेगळ्या भागात राहत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत नाही. भाऊ हे काम फक्त तुम्हीच करू शकता… तरी पुढाकार घ्यावा. मी बघतो असे सांगून वेळ निभावली. योगायोगाने दोन तासानंतर तहसीलदार श्री काकडे यांनी विचारणा केली की, कलेक्टर साहेबांनी सूचना केल्यानुसार अन्नदान करू इच्छिणाऱ्या एनजीओ ची यादी बनविण्यात येत आहे त्यात तुमच्या नावाचा समावेश करावा काय? मी लगेच संमती दर्शविली. जबाबदारी घेतल्यावर ती निभावणे आवश्यक असल्यामुळे लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे पदाधिकारी डॉ. विजय भारतीया आणि संजय अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. लॉयन्सचा डबा हा उपक्रम रयत रुग्णालयात दोन वर्षापासून सुरू होता.
तो डबा लॉकडाऊन मध्ये देखील सुरु करायचा असे ठरले. आमच्याजवळ निधी एक रुपया देखील नव्हता, पण हौसले बुलंद होते. त्यामुळे व्हाट्सअपवर एक मेसेज टाईप करून”लॉकडाऊन मधील लॉयन्सचा डबा” उपक्रमाची माहिती सर्वांना वायरल केली. दोन तास काही रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे कसे होते की याची काळजी वाटू लागली. बाबा अमरनाथ व वैष्णो देवी तसेच सत्यगणपतीला साकडे घातले कारण मी यांचा निस्सीम भक्त आहे.
आतापर्यंत मी हाती घेतलेले समाजसेवेचे एकही काम अपूर्ण राहिले असे घडले नव्हते. त्यामुळे मन आशावादी होते. हळूहळू अन्नदात्यांचे फोन येऊ लागले, पहिल्याच दिवशी हजार डबे बुक झाले. मग ठरविले आता मागे वळून पहायचे नाही. झपाट्याने कामाला लागलो, आम्हाला रयत रुग्णालयासाठी डबा बनवणाऱ्या मन्मथ स्वामीला बोलवले.
वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरपोच भाजी- पोळी चा डबे द्यायचे असल्यामुळे प्रति डबा पस्तीस रुपये दर ठरविला. एकाच गल्लीत चार-पाचशे डबे वाटप करणे सोपे आहे, पण प्रचंड विस्तारलेल्या नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच डबा देणे किती अवघड आहे, याची कल्पना न केलेली बरी. युज अँड थ्रो पार्सल चे डबे विकत घेतले. मुबलक ग्लोज, सॕनीटायझर आणि मास्क विकत घेतले.
आमच्या आवाहनाला विद्यार्थ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. मेस बंद असल्यामुळे त्यांची उपासमार होत होती. आलेल्या विद्यार्थ्यांची यादी बनवून स्वयंसेवकांकडे सोपवली. आमचे तिघे स्वयंसेवक सर्व श्री दिनेश सगरोळीकर, विक्की स्वामी, राजेशसिंह ठाकूर यांच्यासह मी आणि संजय अग्रवाल हे शहरात फिरून विद्यार्थ्यांना घरपोच डबे पुरविण्याचे काम अगदी योग्य प्रकारे करू लागलो. याशिवाय ट्रेनी डॉक्टर्स, नर्सेस, शिकाऊ पोलीस यांनी डबे देण्याची विनंती केली. हे सर्व घटक लॉकडाऊन मध्ये अतिशय योग्य कर्तव्य बजावत असल्याने या सर्व बांधवांना देखील जेवणाचे डबे देण्याचे ठरले. खा. चिखलीकर यांच्या हस्ते रेल्वे स्थानकावरील सफाई कामगारांना डबे वितरित करून लॉयन्सचा डब्याचा शुभारंभ करण्यात आला.
आम्हाला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री खुशालसिंह परदेशी यांच्या शिफारसी वरून पोलिसांनी ४ पास दिले असल्यामुळे संचारबंदीत गरजू पर्यंत डबे पोहचविण्यात कसलीही अडचण येत नव्हती. पहिल्याच दिवशी आमचा डबा खालेल्या एका विदयार्थ्याचा मेसेज आला… “आठ दिवसानंतर पहिल्यांदा पोळी खात आहे.. खिचडी खाऊन कंटाळा आला होता… धन्यवाद भाऊ….” हा मेसेज वाचून आपण करीत असलेले हे काम योग्य असल्याची जाणीव झाली.
एके दिवशी सकाळी पाच वाजता एका विद्यार्थ्याचा फोन आला. त्याने रडत रडत फोनवर सांगितले की, मला उदगीरला गावी जायचे आहे त्यासाठी आपण वाहनाची व्यवस्था करू शकाल का ? त्याला समजावून सांगितले की, लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही. तुला तर लॉयन्सचा डबा घरपोच मिळत आहे आणखी काही मदत लागली तर सांग. तेव्हा तो म्हणाला की, माझी आई दरवर्षी रामनवमीला पुरणपोळी खाऊ घालायची.
आज रामनवमी असल्याने आईची फार आठवण येत आहे त्यामुळे मला घरी जाण्यासाठी मदत करा. तेव्हा त्याला चौदा एप्रिल नंतर घरी पाठवायची व्यवस्था करतो असे समजावून सांगून त्याला शांत केले. त्यानंतर लगेच डबे बनविणा-या मन्मथ स्वामी यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद येऊ लागला. त्यामुळे मग त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन आजच्या डब्यात सर्वांसाठी पुरणपोळी करण्याची सूचना केली.
एक दिवस आधी सूचना दिली असती तर तीनशे जणांना पुरणपोळी देणे शक्य होते असे मन्मथ यांनी सांगितले. जेवढ्यांना शक्य तेवढ्यांना पुरणपोळी व उर्वरित इतरांना शिरापुरी देण्याचे ठरले. दररोज डबा देण्याच्या नियमित वेळे पर्यंत एकशे ऐशी पुरणपोळीची व एकशे पंचेचाळीस शिरा पुरी ची पाकिटे तयार करून कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी व मेस बंद असल्यामुळे अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना घरपोच जेवणाचे डबे देण्यात आले. या कालावधीत आलेल्या प्रत्येक सणाला डब्यामध्ये भाजी-पोळी सोबतच आम्ही गोड पदार्थ आवर्जून दिले. लॉयन्सच्या डब्यामुळे सगळे सण गोड झाले अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
सतत ५२ दिवस आमचा लॉकडाऊन मधील लॉयन्सचा डबा चालला. एकूण ३२५०० गरजूंची भूक भागवण्यात आम्हाला यश मिळाले. देशावरील आणि जगावरील कोरोनाचे हे भले मोठे संकट असताना देखील जनसेवेचे संधी आम्हाला मिळाली आहे ती आम्ही आनंदाने पूर्ण केली.
गरजू रुग्णांना मदत मिळावी या उद्देशाने लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने १००% लोकसहभागातून रयत रुग्णालय व श्रीगुरुजी रुग्णालयात लॉयन्सचा डबा हा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यात येतो. यासाठी अन्नदात्यांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रसारमाध्यम व समाज माध्यमातून करण्यात आले होते. रयत रुग्णालयात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची नोंदणी पूर्वीच पूर्ण झाली होती. श्री गुरुजीसाठी १जून २०२० ते ३१ मे २०२२ पर्यंतचे सर्व ७३० दिवसाची अग्रिम नोंदणी आता पूर्ण झालेली आहे. या दोन्ही रुग्णालयात प्रत्येक दिवशी अन्नदात्यांच्या हस्ते डबे वाटप करून समाजमाध्यमाच्या मार्फत जवळपास पंचवीस हजार नागरिकापर्यंत माहिती दिली जाते. कोण कोणत्या दिवशी डबे देणार आहेत याची माहिती दर्शविणारा फलक संबंधित रुग्णालयात लावण्यात आलेला आहे.
भाऊचा डबा असो अथवा लॉयन्सचा डबा या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत २,१९,००० डबे वाटप करण्यात आले आहे. आमच्यावर विश्वास ठेवून शेकडो नागरिकांनी आर्थिक मदत केली आहे.
अन्नदानाचे महत्व पुरातन काळापासून आम्हा भारतीयांच्या मनात वसलेले आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा गरजूंना दोन घास देता यावे या उद्देशाने गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून दरवर्षी मूक बधिर विद्यालय, वृद्धाश्रम, मुलींचे अंध विद्यालय याठिकाणी वर्षातून एक दिवस तरी जेवण देत असतो. मग ते निमित्त असते कधी माझ्या आईच्या पुण्यतिथीचे, कधी एखाद्या वरिष्ठ नेत्याच्या वाढदिवसाचे, अथवा परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसाचे.
असा समज आहे की,अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो.अन्नदान हे असे दान आहे जेथे अन्नदाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होत असतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते. जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही.
अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व यापुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो.
अन्नदाता परमात्मा आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खावे याचे नाव “सात्विक आहार” होय. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही. त्यामुळेच अन्नदात्याला नेहमी भरभरून आशीर्वाद मिळत आहेत.
सृष्टी का है एक नियम…
जो बाटोंगे वही होगा आपके पास बेहीसाब…
फिर वह धन हो…अन्न हो…
सन्मान हो… अपमान हो…
नफरत हो या प्रेम…
लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,
नांदेड*
94218 39333