भले बुरे जे घडून गेले,विसरुन जाऊ सारे क्षणभर…!

ए गुजरे हूए साल
भले ही कुछ ना दिया हो तुने
पर जाते जाते जिंदगी के
बहोत सारे सबक दे गया….

खरचं….जीवनाच खर महत्व या वर्षाने समजावल.पैसा हा सर्वस्व नाही याची अनुभूती आली.मागे वळून पाहातांना…समोर उभं आयुष्य असतांना भुतकाळाच्या झुल्यावर मन वेड्यासारखं झुलत राहात…खरच,आयुष्यातुन दिवस,महिने,वर्ष कशी झटकन निघून जातात ते कळतच नाही…अन ही सरत्या वर्षाची उदास कातर वेळ…दाहि दिशात अनामिक हुरहूर एक अतृप्तता रुंजी घालतेय.असंख्य घटनांचे झाकोळ घेउन हे वर्ष शेवटच्या क्षणात उंबरठ्यावर ऊभे आहे.थोड्या प्रश्नार्थक नजरेने,कारण,या वर्षाचा प्रत्येकक्षण अत्यंत वेदनामयी ठरला…कोरोनाच्या छत्रछायेत या वर्षाचा प्रत्येक क्षण होरपळला.एक प्रकारची दहशत या क्षणात भारलेली होती.कोरोनाच्या आगममान सारं जीवनमान अस्थव्यस्थ झाल.जगण्यासाठी दोन वेळची पोटभर भाकर आणि जीवलग व्यक्तींची साथ असेल तर आपण प्रत्येक संकटावर अगदि सहजच मात करु शकतो याची जाणीव झाली.पोटावर हात असणा-याची मात्र या वर्षाने खुप दैना केली,पण…माणसातल्या माणूसकीने त्यांना तारले,जमेल तशी प्रत्येकानी त्यांना मदत केली.देशावरच्या या संकटांचा सामना एकजूटीने करतांना जात,धर्म,पंथ या बाजू खुप फीक्या पडल्या.मानवताधर्माची बीज प्रत्येकाच्या अंतकरणात खोलवर रुजली.मदतीचे हजारो हात समोर आले.आणि अजूनही येत आहेत.
प्रत्येक वर्षासारख हे वर्ष पण त्याच्या गतिनेच सरकले. या वर्षाला कोरोनाने ग्रासले होते…त्यामूळे अख्खवर्षच कोरोनाच्या दहशतीखाली गेल,खुपजणांनी आपले जीवलग गमावले,या संकटकाळात आपले कोण?परके कोण?याची जाणीव झाली.पैसा,गडगंज संपत्ती असलेल्या व्यक्तीला शेवटी बेवारसपणे जावे लागले.लाॅकडाऊनमूळे ब-याच समस्या उद्यभवल्या होत्या पण त्यावर एकमेकांच्या साह्याने मात करत ही वेळ पण निभवली.महाराष्ट्र पोलिस,डाॅक्टर,परिचारीका,आरोग्यसेवक,स्वच्छता कामगार यांनी जीवाची बाजी लावत कोरोनाचा सामना केला,त्यांच्यातला देवमाणूस प्रत्येकाला बघायला मिळाला.देशसेवा करतांना अनेक कर्मचारी कोरोनाबाधीत झाले,तरी आपल्या कर्तव्यात त्यांनी खंड पडू दिला नाही,कोरोनामूक्त झाल्यावर ते परत ड्युटीवर हजर झाले.तर खुप जणांना आपले प्राण पणाला लावावे लागले.

○ मनातील अनामिक भिती हुरहुरतेय. कॅलेंन्डरचे शेवटचे पानं फडफडतय वा-यावर अधिर होऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी.काय हरवले?काय गवसले? याचा अंदाज घेतांना भावना विवश झालय हे मन.क्षणभर डोळ्यात आश्रू दाटलेत.भावनांच पंख पाखरु सैरभैर झालय,गंध भारले क्षण हृदयात जपण्यासाठी!येणारे नवं वर्ष कसे असेल?या विचाराने मन गहिवरुन आलेय…या वर्षाला निरोप देतांना अंत;करणात गतकाळातील आठवणींच मोरपीस गहिवरलय,अन…थरथरणा-या ओठांवर निशब्द भावनांची जणू पानगळ झालीय.सुख-दु:खाचा आढावा घेत,आयुष्याच्या नव्या रंगमंचावर नवा डाव मांडतांना मन खुप अस्वस्थ झालयं.पाहाता पाहाता २०२१वर्षाची अखेर जवळ येऊन ठेपली आहे.मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून अनामीक सुखाच्या ओढीन या वर्षाला निरोप देऊ.या वर्षात असंख्य ब-या,वाईट घटना होउन गेल्या.महिलांवरच्या अत्याचारांनी तर या वर्षात कळस गाठला.बलात्कारातून असंख्य निर्भया,अनामिका पूरुषप्रधान संस्कृतीने भोगवस्तू समजून पायदळी तूडवल्या.वंशाच्या दिव्यापाई इवल्याश्या स्त्री अभ्रकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.

हुंड्यापाई स्त्रीयांना जाळून मारण्यात आले,मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन तीला ठेचून मारण्यात आले,कौटूंबीक कलहातून घटोस्फोटा सारख्या अग्नीदिव्यातून स्त्रीयांना जावे लागले.येणा-या वर्षात तरी या समस्यांची पुर्नआवृत्ती होऊ नये…महिलांनाही मनाजोग जगण्याचा अधिकार नव्या वर्षात मीळावा…असंख्य प्रश्न मनात थैमान घालत आहेत अनुत्तरीत होऊन.या वर्षी निसर्गाने आपले रौद्र रुप दाखवले.निसर्गच आपला जवळचा मित्र आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले.सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचाराने आपले स्थान मजबूत केले आहे,भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचे मनाशी दृढ करत…येणा-या वर्षात तरी निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करुया.वृक्षसंवर्धन करुन पर्यावरणाचा समतोल राखूया.


नवं स्वप्नांची नवं उभारी,नवं वर्षाच्या आकाशी झेपावली..मनमयुरही फुलून आला नवं वर्षाचे तेज पाहून.तुमच्या स्वप्नांना मिळतील कोंदण वास्तवाचे,अन…साकार होतील मनातील इच्छा,आकांक्षा!हे नवं वर्ष येईलं आनंद घेऊन सुखाच्या पंखावर स्वार होऊन.मन उदास आहे तरी अनामिक ओढीन सुखाच्या शोधात भरकटलेलं,

आठवणींचा सप्तरंगी गोफ विणण्यासाठी,एकदा गेलेले क्षण पुन्हा येत नाहीत.काळ कधीच कोणासाठी क्षणभरही थांबत नाही.तरीही हे वेड मन सरत्या वर्षाच्या सरत्या क्षणांना थांबविण्याचा प्रयत्न करतय.असो…नव्या वर्षातही आपलेपणा जपून स्नेंहभावना वृध्दिंगत करुया,नव्या वर्षात संवादातून एकोपा वाढवूया…स्वता:ला वेळ देऊन छंद जोपासूया…सेल्फी आणि सोशल मिडिया अपडेट करण्यात वेळ निर्थक घालण्यापेक्षा तो वेळ पुस्तकाच्या सान्निध्यात घालवू या…

स्वार्थीपणाची भावना त्यागून मैत्रीचे रेशमी धागे गच्च गुंफूयात,जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नव्याचे स्वागत करतांनाचा हा संधीकाल सर्वांच्या आयुष्यात सुखाचे क्षण घेऊन येवो…२०२२साल पुर्णपणे कोरोनामुक्त आणि आरोग्यसंपन्न असेल या सदिच्छेसह….सरत्या वर्षाला निरोप देऊया!

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर….!

रुपाली वागरे\वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *