कवी – अरुण बालकृष्ण कोलटकर
कविता – वामांगी
अरुण बालकृष्ण कोलटकर.
मराठी, हिंदी, इंग्रजी (बहुभाषिक कवी).
जन्म – ०१/११/१९३२ (कोल्हापूर).
मृत्यू – २५/०९/२००४ (पुणे).
कवी अरुण कोलटकर हे बहुभाषिक भारतीय कवी होते. त्यांनी मराठी, हिंदी बरोबरच इंग्रजी भाषेतही कविता केल्या. तिनही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. कवी अरुण कोलटकर यांच्यावर विल्यम कार्लोस आणि संत तुकाराम यांचा प्रभाव होता.
अरुण कोलटकर हे एक उत्तम ग्राफीक डिझायनर होते व जाहिरात क्षेत्रात ते अत्यंत यशस्वी कला दिग्दर्शक होते.
अरुण कोलटकर हे वैश्विक पातळीवर जाणाऱ्या मराठीतल्या मोजक्या कवींमधील एक होते.
प्रवाही विचारपुर्वक मांडणी हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यातून प्रसवणारी कविता संपूर्ण भावचित्राचे दर्शन घडवते. त्यामुळे त्यांची कविता विश्लेषक दृष्टीला आर्त भिडते.
रोखठोक कोलटकरांच्या बहुतेक कविता प्रत्यक्ष घटनांवर किंवा प्रत्यक्ष व्यक्तींवर रचलेल्या आढळतात.
१९५०-६० च्या दशकात त्यांनी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीच्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांचे व गुन्हेगारी जीवनाचे दर्शन घडविते.
उदा. मै भाभी को बोला, क्या भाईसाब के ड्युटीपे मै जाऊ?, भडक गयी साली, रहमान बोला गोली चलाउँगा, मै बोला एक रंडी के वास्ते, चलाव गोली गांडू…. अशा अने कविता बंबैया मराठी हिंदी बोली भाषेत आढळतात.
अरुण कोलटकर यांच्या कविता (१९७७), चिरीमिरी (२००४), द्रोण (२००४), भिजकी वही (२००४) असे अरुण कोलटकर यांचे प्रकाशित कविता संग्रह आहेत.
कलेक्टेड पोएम्स इन इंग्लिश, जेजुरी, काळा घोडा पोएम्स, द बोट राईड अँड अदर पोएम्स, सर्पसत्र असे त्यांचे इंग्रजी कविता साहित्य प्रकाशित आहे.
“न्युयॉर्क टाइम्स क्लासिक बुक” या यादीत त्यांच्या “जेजुरी” या इंग्लिश काव्यसंग्रहाचा समावेश आहे.
अरुण कोलटकर यांना २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, २००५ चा बहिणाबाई पुरस्कार, राष्ट्रकुल काव्य पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.
अरुण कोलटकर यांची कल्पनाशक्ती असामान्य होती. सामान्य कवी जो विचार करील त्यापेक्षा कितीतरी वेगळा आणि कल्पनातीत विचार ते करायचे.
देवळात गेल्यावर रखूमाईच्या बाजूला विठ्ठल नाही अशी कल्पना करून विठ्ठलाची वामांगी (बायको) खुद्द रखुमाईलाच याबद्दल प्रश्न विचारायचे, अशी भन्नाट कल्पना फक्त अरुण कोलटकर यांच्यासारखा असामान्य कवीच करू शकतो. आणि त्यांच्या प्रश्नांवर रखुमाई काय प्रतिक्रिया देते हे त्यांच्या “वामांगी” या मुक्तछंदातील कवितेतच पाहू –
वामांगी
देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट
मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला
मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही
म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही
कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण
- अरुण कोलटकर
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/