कंधार ; हनमंत मुसळे
वंजारवाडी ता.कंधार येथील ग्रामपंचायत निवडणूक खेळीमेळीत बिनविरोध पार पडली असून त्यामुळे गावात सौहार्दाचे वातावरण तयार झाले आहे.या बिनविरोध निवडणूकीचा गावकऱ्यांनी गावजेवण देवून आनंदोत्सव साजरा केला.
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात बोली लावून ग्रामपंचायतींचा लिलाव होत आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे. अनेक ठिकाणी लाखांवर, कोटीवर बोली लावल्या गेली. पण आताही काही गावे कुठलीही बोली न लावता चांगल्या व्यक्तींना गावाचा कारभार सोपवतो आहेत.
त्यापैकी कंधार तालुक्यातील वंजारवाडी हे छोटेसे गाव आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, प्रत्येक वार्डात चुरस असते, छोटेछोटे वाद बाहेर येतात त्यातून अनेक ठिकाणी अप्रिय घटनाही घडतात.
या सर्व प्रकाराला फाटा देऊन बिनविरोध निवडणूका घेणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. वंजारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बळवंत कागणे, धोडीबा भायगावे, परमेश्वर गिते,केरबा केंद्रे, ज्ञानोबा गिते गंगाधर गित्ते, संग्राम गिते, संभाजी केंद्रे, सुभाष गिते, हरी केंद्रे, छटूराम गिते, आनंदा गिते, गोविंद केंद्रे, भास्कर गिते, बालाजी गिते, विठ्ठल गिते इ. नी गावात बैठक घेऊन बिनविरोध निवडणूकीचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार या प्रस्तावावर सर्वांनी चर्चा करून मान्यता दिली.
सौ. सगुणाबाई परमेश्वर गिते, आनंदा चुडाजी केंद्रे, सौ. अंजना त्रिंबक गिते, सौ. वंदना हरिभाऊ गिते, धोडीबा भायगावे, ज्ञानोबा रामदास गिते, सौ. माया शंकर गिते या सर्वांची सदस्य म्हणून निवड केली. निवडणूकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर या सदस्यातून सरपंच, उपसरपंचाची निवड होणार आहे. खरेतर अशा छोट्या गावांचा बोध इतरही गावांनी घेऊन निवडणूक बिनविरोध कराव्यात जेणेकरून गावातील शांतता अबाधित राहील.
या बिनविरोध निवडणूकीचा गावकऱ्यांनी गावजेवण करुन आनंद साजरा केला.