सौ.मुग्धा कुळये, रत्नागिरी (शिक्षिका, कवयित्री, लेखिका, समाजसेविका) यांनी …… अंतःस्थ मनात या कविता संग्रहाचा केलेला रसग्रहणात्मक परिचय :
दि. 3/1/2021
“अंतःस्थ मनात” काव्यसंग्रहाचे उमटलेले तरंग…
सुप्रसिद्ध कवी गझलकार – विजय जोशी (विजो) यांचा “अंतःस्थ मनात” हा काव्यसंग्रह मी नुकताच वाचला. माझ्यासारख्या नवोदितांना अभ्यास करायला एक छान संग्राह्य पुस्तक मिळाल्याचा आनंद झाला.
आमच्या सुदैवाने आम्हाला काव्य कार्यशाळेसाठी लाभलेले आमचे मार्गदर्शक गुरू जोशी सरांच्या काही रचना मी वृत्त शिकताना वाचल्या होत्या. त्यातील काही कवितांचा या पुस्तकात समावेश आहे.जोशी सरांच्या कविता वाचताना मनात आपोआप लय सापडत जाते.सुंदर लयीत असणाऱ्या आशयगर्भ, वास्तवाशी नातं जोडणाऱ्या या कविता नकळत वाचकांशी एकरूप होऊन जातात. आपल्याच मनातील या भावना आहेत असे वाटते.
अंतःस्थ मनात नाव किती समर्पक आहे याची प्रचिती मी त्यांच्या कविता जशी वाचत गेले तेव्हा कळत गेलं.मुखपृष्ठावरील चित्राचा मला लागलेला अर्थ असा -आपल्या बाह्य रूपाचे प्रतिबिंब जसे पाण्यात दिसते तसे कवी लेखकांच्या मनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीतून उमटत असते.
या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ कविवर्य आदरणीय प्रा. अशोक बागवे सरांची अभ्यासपूर्ण आशयघन अशी प्रस्तावना लाभली आहे.प्रस्तावनेत भाषा सौंदर्याचा उत्तम अविष्कार वाचकांना अनुभवायला मिळतो. यातील काही शब्द तर मला इतके नवीन होते की शब्दकोशच घेऊन वाचावी लागली.मी ही प्रस्तावना पुनःपुनः वाचली. बागवे सर अंतःस्थ मनातील कवितांपर्यंत वाचकांना हळूच घेऊन जातात.
मनोगतात काव्यसंग्रहाचे अंतरंग कवी विजय जोशी सरांनी उलगडवून दाखवले आहे. यातील कवितांची केलेली विभागणी व त्यात समाविष्ट असणाऱ्या कवितांची संख्या इ.नमूद केल्यामुळे एका दृष्टीक्षेपात अंतरंग समोर येते. यातील शब्दांबद्दलच्या भावना काव्यातून सुरेख शब्दबद्ध केले आहे.
मुक्तांगण या भागात कवींच्या मुक्तछंदातील कविता वाचावयास मिळतात. लहानपणापासून कवीने आपल्या आजूबाजूच्या सामाजिक स्थितीचे संवेदनशीलतेने निरीक्षण केलेलं आहे.त्यांच्या बालवयापासून टिपलेल्या अनेक बाबी त्यांच्या काव्यातून येतात. उदा. कावळा शिवल्यावर या कवितेत येणारा कावळा लहान मुलांच्या मनात आजही घर करून राहिलेला आहे. पाखरे या कवितेत आजीची व्यथा चटका लावते. मनाचा कप्पा, वहीचं शेवटचं पान याही कवितांतून कवीचे बालपण डोकावताना दिसते.मुक्तछंदातील कवितांना एक अंतर्गत लय असते असे जोशी सर आम्हाला नेहमी सांगत. ती लय नेमकी कशी हे अभ्यासण्यासाठी हे उत्तम दिशादर्शक पुस्तक आहे.
वृत्तबद्ध कविता, अभंग, व इतर कविता कवितांगण या विभागात वाचावयास मिळतात.अनेक विषयांना स्पर्शून जाणाऱ्या या कविता आनंद तर देतातच सोबत ज्ञानात भर टाकणाऱ्या आहेत.कवीचे बालपण, तारूण्य ते आता प्रौढ वयातील अनुभवातून आलेल्या कवितांना कधी खुमासदार शैलीत तर कधी चिंतन, मनन करायला लावणाऱ्या कविता आपल्याला भेटतात.
मालवणिका या भागात मालवणी भाषेतील गावच्या मातीशी नातं सांगणाऱ्या अनेक छान छान कविता वाचताना खूप मजा आली. यातील काही कविता विनोदी ढंगात भेटतात तेव्हा हसू आवरत नाही. सामाजिक जीवनातील वास्तवता बोलीभाषेतून थेट काळजाशी भिडतील इतक्या समर्थपणे सरांनी कवितेच्या माध्यमातून मांडल्या आहेत. यावरून कवीची आपल्या मालवणी भाषेशी नाळ अजूनही जुळलेली आहे हे जाणवते.गावाबद्दलचे प्रेम व ओढच कवीला लेखनास प्रद्युक्त करतेय इतकं जिव्हाळ्याच्या नात्याचं प्रतिबिंब काव्यातून उमटल्याचे दिसते.
गझल विभागात विविध वृत्तातील गझला वाचणं म्हणजे एक सुंदर पर्वणीच आहे.एकाहून एक सरस गझला नवोदितांनी अभ्यासाव्या अशाच आहेत.गझलियत म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर या आशयघन गझलांतून मिळत जाते.एकंदर काय तर हे पुस्तक संग्रही असेल तर अनेक काव्यप्रकार एकावेळी अभ्यासायला मिळतील असं छान पुस्तक आहे.पुस्तकबांधणी सहज हाताळता येईल अशी आहे. कविता मांडणीही वाचकांच्या मनाची पकड घेणारी आहे.
यातील मला सर्वाधिक भावलेली कविता – जात का नाही एकदाची? ही कविता वाचून मी खूप अंतर्मुख झाले. सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारी ही कविता कवीने अगदी समर्पक शब्दातून मांडली आहे.
खूप छान काव्यसंग्रह…. मी वाचला.मला खूप आवडला.आपणही जरूर वाचा. नक्की आवडेल.खरंतर या कवितांबाबत कवींशी थेट संवाद साधून जाणून घ्यायला व मला नेमकं काय वाटलं हे सांगायला नक्की आवडलं असतं.
मला जे आवडलं ते मी माझ्या शब्दात मांडले आहे.धन्यवाद.
@ मुग्धा कुळये
रत्नागिरी
97642 44145