चिकन उद्योगावरील संक्रांत

कोरोना महामारीत अनेक राज्यांत बर्ड फ्लूचा फैलाव वाढत असल्याने नवे संकट उभे राहिले आहे. राज्यात बर्ड फ्लूचे संकट आल्याने चिंता वाढली आहे. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात ठाण्यात पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश व अन्य काही जवळच्या राज्यात बर्ड फ्लूची साथ आली असतानाच ठाणे येथील विजय गार्डन या सोसायटीच्या उद्यानातील तब्बल १५ बगळे बुधवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आले. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना एकत्र करून लॅबमध्ये तपासणीकरिता पाठवले आहे. यामागचे कारण तपासणीचा अहवाल आल्यावरच कळणार आहे. पंजाब, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात मरून पडलेले सापडत आहेत. त्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूबाबत ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही राज्यांमध्ये अनेक पक्ष्यांचा मृत्यू हाेत असून पाच राज्यांनी बर्ड फ्लूमुळे हे मृत्यू हाेत असल्याचा दुजाेरा दिला आहे. त्यामुळे या आजाराचा धाेका लक्षात घेऊन अनेक राज्यांनी ॲलर्ट जारी केला आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.केरळमध्ये काही दिवसांपूर्वी १२ हजार बदकांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्येही अनेक पक्षी मृतावस्थेत आढळले हाेते. हे मृत्यू बर्ड फ्लूमुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहेत. केरळच्या अलाप्पुझा आणि कोट्‌टायम या दाेन जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे ३६ हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेजारील कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनी केरळमधील पाेल्ट्री उत्पादनांवर बंदी घातली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये स्थलांतरीत करणाऱ्या एका जातीचे शेकडाे पक्षी मृतावस्थेत आढळले हाेते. हरयाणामध्येही जवळपास विविध पाेल्ट्री फार्ममधील सुमारे चार लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये १० जिल्ह्यांमध्ये शेकडाे कावळ्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्लूला दुजाेरा मिळाला.

परराज्यातील पक्ष्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेशात बर्ड फ्लूने पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे पाहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने आत्तापासूनच सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.स्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लू परतलाभारतातून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बर्ड फ्लू हद्दपार झाला हाेता. परंतु, गेल्या महिन्यात पक्ष्यांचे मृत्यू व्हायला लागले. ज्या भागात स्थलांतरीत पक्षी हिवाळ्यात वास्तव्यास येतात, तेथेच बर्ड फ्लू पसरल्याचे दिसत आहे. या पक्ष्यांमुळे बर्ड फ्लू परतला, असे केंद्रीय पशुसंवर्धन व मत्स्यपालन मंत्री गिरीराज सिंग यांनी सांगितले.२५ नमुने पॉझिटिव्ह राजस्थानच्या झालावाड, बारांक, जयपूर व कोटा जिल्ह्यांत कावळ्यांच्या मृत्यूशिवाय कोटाच्या राजगंज मंडीत २०० पेक्षा जास्त कोंबड्या मृत आढळल्या. ११० नमुन्यांतील २५ चे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. n बर्ड फ्लूला दुजाेरा मिळाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काेणत्याही प्रकारच्या पाेल्ट्री फार्ममधील पक्षी, अंडी, मासाेळी इत्यादींची कत्तल, खरेदी-विक्री तसेच निर्यातीस बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने केरळ आणि हरियाणामध्ये विशेष पथके पाठविण्यात आली आहेत.

बर्ड फ्लूचा संसर्ग राेखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. नवी दिल्लीमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असून पाेल्ट्री फार्ममध्ये विशेष दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये एच५एन८ हा ‘बर्ड फ्लू’ विषाणूचा स्ट्रेन आढळला आहे. याचा मानवी संसर्ग झाल्याचे भारतात अद्याप निदर्शनास आलेले नाही. संसर्ग राेखण्यासाठी कच्ची अंडी, कच्चे मांस खाऊ नये. मांस याेग्य प्रकारे शिजवून घेऊनच खाल्ले पाहिजे, असे सांगितले जाते. अन्यथा चिकन उद्योगावर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

देशात सध्या पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’ची एकही घटना आढळून आलेली नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही”, असं मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी पीटीआयला सांगितलं. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’मुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्येही ‘बर्ड फ्लू’ची प्रकरणं समोर आली आहेत. केरळच्या कोझिकोड येथील दोन पोल्ट्री फार्मध्ये ‘बर्ल्ड फ्लू’ पसरल्याचं समोर आलं आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूचा कहर वाढल्यानं हायअलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’ला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ‘बर्ड फ्लू’ची फैलाव माणसांमध्येही होण्याची दाट शक्यता असते. याआधी २००६ साली महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाला होता. त्यावेळी हजारो कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ची लागण झाली होती.

कोरोनानंतर आता देशात पुन्हा एक जुना रोग डोकं वर काढतो आहे. या रोगाचं नाव बर्ड फ्लू. जशा बर्ड फ्लूच्या बातम्या येतात, तशा कोंबड्यांच्या पोल्ट्री खाली केल्या जातात, लाखो पक्षांना मारलं जातं, चिकनचे दर एकाएकी खाली उतरतात. उलटसुलट चर्चा सुरु होता, आणि लोकांमध्ये दहशत पसरते. बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.

पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटी आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत, तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो. यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.

१९०० च्या दशकात इटलीमध्ये सर्वात आधी हा फ्लू आढळला होता. त्यानंतर १९६१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत या फ्लूमुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. डिसेंबर १९८३ ला पेन्सिलवेनिया आणि व्हर्जिनियात या फ्लूनं थैमान घातलं. त्यानंतर ५० लाख कोंबड्या आणि बदकांना मारण्यात आलं. १९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये १८ लोकांना हा फ्लू झाला. त्यातील पाच लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू होण्याची ही जगातील पहिलीच घटना होती. त्यानंतर हाँगकाँगमद्ये तब्बल पंधरा लाख पक्षांना मारण्यात आलं. २००३ साली नेदरलँडमध्ये ८४ लोकांना H7N7 या नवी स्ट्रेनचा फ्लू झाला, त्यातील एकाचा मृत्यू झाला. ३१ जुलै २०१२ ला H3N8 या नव्या फ्लूच्या स्ट्रेनमुळं तब्बल १६० सील माशाच्या पिलांच्या मृत्यू झाल्याचं शास्रज्ञांनी उघड केलं. 2019 ला जगभरात तब्बल 1568 लोकांना या फ्लूची लागण झाली,तर त्यातील ६१६ लोक दगावले, हा H7N9 प्रकारातला फ्लू होता.

२००६ साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर ५ लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नाही

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो

बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.

बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.

दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात, त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. कोंबड्यांचे दर पडतात. लाखो कोंबड्या मारल्या जातात, आणि लाखो शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. बर्ड फ्लूमुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाहिलं तर ते अतिशय कमी आहे. मात्र, त्याचा प्रसार होऊ न देणंही गरजेचं आहे. त्यामुळंच या सगळ्यामध्ये सुवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. खरंच आपल्यापर्यंत बर्ड फ्लू आला आहे का? आणि आला असेल तर कुठली काळजी घ्यायला हवी हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण, आस्मानी-सुलतानी संकटानंतर शेतकऱ्याचं सर्वाधिक नुकसान कुठली गोष्ट करत असेल तर ती आहे अफवा.

कोरोनाला आपण जितकं गांभीर्यानं घ्यायला हवं होतं, तितकं सुरुवातीला घेतलं गेलं नाही, मात्र, जेव्हा बर्ड फ्लूचा प्रश्न येतो, तेव्हा तातडीनं पावलं उचलली जातात. जी अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, बर्ड फ्लू लगेच सगळ्या राज्यात पसरला असं होत नाही. ज्या राज्यात सध्या बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत, तिथल्या प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, गुजरातमध्ये पशूसंवर्धन विभागानं हायअलर्ट जारी केला आहे. त्यामुळं घाबरुन न जाता, अफवांना बळी न पडता तथ्य़ जाणून घेणं जास्त गरजेचं आहे.

गेल्या आठवड्याभरापासून याबाबतच्या उलट सुलट चर्चा सुरु असून याचा राज्यातील चिकन उद्योगावर परिणाम होण्याची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राज्यातील चिकन उद्योगावर याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसते.

‘बर्ड फ्लु’ हा आजार पक्षांमधून माणसांना होत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे ही डॉ रानडे यांनी सांगितले. आपल्याला हा आजार नवीन नाही त्यामुळे त्याचा सामना कसा करायचा हे माहित आहे, शिवाय आपल्याकडे अधिक स्वछता तसेच सरकारने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत आहे.

इतर राज्यात पसरलेल्या ‘बर्ड फ्लु’मुळे महाराष्ट्रातील चिकनची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातून गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणावर चिकन पुरवले जात असून ही मागणी ३०० टनावर गेली आहे.

राज्यात दररोज १७०० ते १८०० टन चिकनचा पुरवठा होतो. तर मुंबईत १००० ते १२०० टन चिकन फस्त होते. यावर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. ‘बर्ड फ्लु’ आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती असून हा आजार आपल्याकडे आला नसल्याचे लोकांना माहित आहे. त्यामुळे राज्यातील चिकन उद्योगावर काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगितले जात आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
०८.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *