माळाकोळी ; एकनाथ तिडके
मोजकेच भाविक…. चाबकाचे फटके अंगावर ओढणारे वारू……, गोंधळी.. , पोतराज……., मुरळी …, वाघ्या…..,यांच्या व देवस्थान पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या वर्षीच्या माळेगाव श्री क्षेत्र खंडोबा पालखीचे पूजन करण्यात आले. दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा दरवर्षी फार मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी होत असते मात्र या वर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर माळेगाव यात्रा रद्द करण्यात आली आहे मात्र पारंपारिक पद्धतीने पालखीचे पूजन करून बेलभंडारा उधळत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात देव स्वारी चे पूजन करण्यात आले.
यावेळी माळेगाव येथे रिसनगाव चे मानकरी गणपतराव नाईक यांच्या पालखीचे आगमन झाले त्यानंतर मंदिर परिसरातच मानकरी यांची पालखी व श्री क्षेत्र खंडोबा ची पालखी यांची प्रदक्षिणा करण्यात आली व पालखीचे पूजन करून भंडार उधळण्यात आला यावेळी मोजके भाविक उपस्थित होते. यावेळी पालखीचे सर्व मानकरी यांचा सत्कार व सन्मान देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ,आमदार शामसुंदर शिंदे , आमदार मोहन हंबरडे , जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाताई आंबुलगेकर , आशाताई शिंदे , माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, सभापती संजय बेडगे, यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मालेगाव येथे येऊन श्री क्षेत्र खंडोबा मंदिरात दर्शन घेतले.
स्टॉल लावण्यास मनाई
यावेळी जिल्हाधिकारी व तहसीलदार लोहा यांच्या आदेशान्वये माळेगाव यात्रेत कुठल्याही प्रकारचे स्टॉल लावण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे यामुळे व्यापार्यांनी यात्रेत स्टॉल लावलेले नव्हते.
पोलीस बंदोबस्त
यावेळी माळेगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी माळाकोळी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला होता भाविकांची गर्दी होऊ नये याची खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे.
“कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचे आदेश काढलेले आहे या आदेशाचे पालन करत पारंपारिक पद्धतीने पालखीचे पूजन करण्यात आले, मात्र यात्रा भरणार नाही किंवा कुठलेही शासकीय कार्यक्रम होणार नाहीत तसेच कोणीही यात्रेत स्टॉल लावणार नाही याची काळजी घेतलेली आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने सुद्धा भाविकांना सूचना करणारे फलक लावण्यात आलेले आहेत अशी माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दयानंद पाटील यांनी दिली.
*** video news***