कामेश्वरची कौतुकास्पद कामगिरी : भाग -१

नांदेड जिल्ह्यातील कंधार जवळील घोडजच्या कामेश्वर वाघमारे या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन कामेश्वरला देण्यात येणार आहे. कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आपल्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने नदीतच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण वाचवले. गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात दुपारच्या वेळेत तीन बालक बुडत असतांना कामेश्वरने पाहिलं. पाहताच क्षणी पाण्यात उडी घेऊन त्याने जिवाच्या अकांताने दोघांना बाहेर काढले. परंतु एका मुलाला वाचवण्यात तो अयशस्वी राहिला, त्याला न वाचवू शकल्याची खंत मात्र कामेश्वरच्या मनात सदैव असल्याचं त्यानं सांगितलं. शासनाकडून दिला जाणारा प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार कामेश्वर वाघमारे याला मिळावा यासाठी कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून यावर्षीचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार कामेश्वरला जाहीर झाला आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. कंधार तालुक्यातील घोडज येथे या वर्षीच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन बालकांचे प्राण इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कामेश्वर वाघमारे याने वाचविले होते.

गतवर्षी तर देशभरातून २२ मुलांची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात १० मुली आणि १२ मुलांचा समावेश आहे. दीड वर्षांपूर्वी परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतून झेन सदावर्ते हिने १७ जणांची सुखरूप सुटका केली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण जखमी झाले होते. झेनने प्रसंगावधान दाखवत मुख्य स्विच बंद करून अग्निशामक दलास १६ व्या मजल्यावर येण्यास सांगितले. तोपर्यंत तेथील १७ जणांना तिने टॉवेल ओले करून दिले आणि त्याचा मास्कप्रमाणे वापर करून श्वास घेण्यास सांगून त्यांचे प्राण वाचविले होते.

आकाश खिल्लारे याने नदीत बुडणाऱ्या मायलेकींचे प्राण वाचविले होते. दुधना नदीत बुडणाऱ्या एका महिलेचा मदतीसाठी टाहो ऐकताच आकाशने ७० फूट खोल नदीत उडी घेतली. महिलेसोबत एक मुलगी असल्याचे पाहिल्यानंतर त्याने प्रथम मुलीला वाचविले आणि नंतर पुन्हा नदीत उडी घेऊन महिलेलाही सुरक्षितपणे बाहेर काढले.

जम्मू-काश्मीरमधील दोन तर कर्नाटकमधील एका मुलासही राष्ट्रीय शौर्य पदकाने गौरविण्यात आले. केरळमधील १६ वर्षीय मोहम्मद मोहसीनचा समुद्रात बुडणाऱ्या तीन मित्रांना वाचविताना बुडून मृत्यू झाला. त्याला मरणोत्तर अभिमन्यू पुरस्कार देण्यात आला. कूपवाडातील सरताज मोहिद्दीन मुगल (१६) आणि बडगाममधील मुदसीर अशरफ (१९) यांनाही शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातून दोघांची घोषणा करण्यात आली होती. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुंबईच्या परळ भागातील राहत्या इमारतीत आग लागून झालेल्या घटनेत झेन सदावर्ते या 10 वर्षाच्या मुलीने 17 जणांचे प्राण वाचविले. झेन राहत असलेल्या 17 माळ्यांच्या इमारतीला अचानक आग लागली 16 व्या माळाव्यार राहणा-या झेनच्या कुटुंबियांना आग लागल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी तिला झोपेतून उठवले. झेनने स्वयंपाक घराची खिडकी उघडताच संपूर्ण घरात धूर पसरला अशातच शेजारून काही लोकांनी दिलेल्या “वाचवा- वाचवा”च्या आरोळया तिच्या कानावर पडताच ती घराबाहेर आली आणि आवाजाच्या दिशेने धावली. आगीच्या विळख्यात सापडलेल्या या लोकांना धीर देत झेनने सुरक्षित स्थळी सर्वांना हलविले. यावेळी तिने या माळ्यावरील वीजेचा मेन स्वीच बंद केला व अग्नीशमन दलालाही फोन केला. दरम्यान, आपत्ती काळात स्वसंरक्षणासाठी शाळेत शिकविलेले उपाय प्रत्यक्षात आणत झेनने या सर्वांना आपल्याकडील विशिष्ट मास्क दिले व एकाच ठिकाणी सर्वांना खाली बसविले. यानंतर अग्नीशमन दलाची गाडी येऊन झेनसह आगीत अडकलेल्या 17 जणांना सुरक्षित बाहेर काढले. झेनच्या प्रसंगावधानाने व धाडसामुळे 17 जणांचे प्राण वाचले तिच्या या साहसाकरिता ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ जाहीर झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे ने मायलेकींना नदीत बुडण्यापासून वाचविले आहे. गावातील शाळे शेजारून जात असताना जीवाच्या आकांताने ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज आकाशच्या कानावर आला. त्याने प्रसंगावधान राखत आवाजाच्या दिशेने धाव घेतली. शेजारील दुधना नदीत एक महिला बुडत असल्याचे त्याने बघितले. आजूबाजूला कोणी मदतीला नाही हे पाहताच आकाशने या महिलेला वाचविण्यासाठी 70 फुट खोल नदीत उडी मारली. जेव्हा आकाश महिलेला बाहेर काढण्यासाठी गेला तेव्हा, तिथे त्या महिलेची लहान मुलगीही बुडत असल्याचे त्याने पाहिले. त्याने मुलीला सुरक्षितरित्या बाहेर काढले व पुन्हा नदीत उडी घेत महिलेलाही सुरक्षित बाहेर काढले. आकाशने प्रसंगावधान राखत व धाडसाचा परिचय देत या माय लेकींचा प्राण वाचविल्याबद्दल त्याला हा पुरस्कार जाहीर झाला.

10 मुली आणि 12 मुले अशा एकूण 22 बालकांना वर्ष 2019 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एका बालकाला मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सहा श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील शूर मुला-मुलींना दिले जातात. या पुरस्काराची सुरुवात 1957 साली झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केले जाते.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२३.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *