शाळा सुरू झाल्याचा आनंद!

२७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील इ. ५ वी ते ८ वी च्या शाळा पूर्ण काळजी व खबरदारी घेऊन सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून चला मुलांनो चला शाळेकडे चला …आशयाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात सुरुवातीला नववी ते बारावी आणि आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप काहीच निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून घेण्यात आला नसल्याने पालक व संस्थाचालक, मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मागील पत्रकाप्रमाणे १६ जानेवारीपासून पुढील निर्देशांपर्यंत मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या तरी मुंबईतील शाळा कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने इयत्ता चौथीचे वर्ग टप्प्या-टप्प्याने सुरू केले जातील, असे सांगितले. त्याचप्रमाणे शाळांमधील उपस्थिती वाढवावी व शालाबाह्य विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावेत यासाठी स्वतंत्र मोहिम राबविली जाईल,असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसतानाही, शिक्षण विभागाने ५ ते ८ वर्ग सुरू करण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. शिक्षण विभागाच्या शाळा भेटी अहवालात पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ५ ते ८ वर्गाचे ३३९१६ विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात झाले. कुठे विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ९ ते १२ वर्गाच्या शाळा १४ डिसेंबरपासून सुरू केल्या. या शाळांना हळूहळू विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम मिळाला. राज्यातील ९ ते १२ वर्गाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, ५ ते ८ चे वर्गही सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नागपूरच्या मनपा आयुक्तांनी हे वर्ग ८ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी २७ जानेवारीपासूनच शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाला सांगितले. बुधवारी जिल्ह्यातील १७८८ शाळांची घंटा वाजली. तब्बल १० महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

करोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे बंद असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करून आज पासून सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी 422 शाळा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातील शाळा दि.२७ जानेवारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या 1346 शाळा आहेत. या शाळा खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद आदी स्वरूपातील व्यवस्थापनाच्या आहेत.आज पहिल्याच दिवशी 345 प्राथमिक शाळा तर 77 माध्यमिक शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत आहे. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यानी मास्क लावल्याची खात्री करण्यात आली. तसेच शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर राखून बसविण्यात येत आहे.. शिक्षकांना देखील खबरदारी म्हणून कोव्हिडं चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. सुरू झालेल्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळानी शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिले आहेत.

८-९ महिने घरीच राहून अनेक विद्यार्थी कंटाळले होते. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध आलेले आहेत. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटता येईल याची ओढ अनेकांना लागलेली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सुरू होण्याची वाट पाहात होते. शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार असले तरी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनामुळे काहीशी चिंता जाणवत आहे.

८ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते, मात्र शाळा सुरू झाल्याने प्रत्यक्षात अध्यापन होणार असल्याने काही कठीण भाग शिक्षकांकडून समजावून घेता येईल. शाळा सुरू होत असल्याने प्रत्यक्षात शिक्षण घेता येईल व शिक्षक आणि मित्रांना भेटायला मिळेल. या सगळ्याचा आम्हाला आनंद आहे. अशा भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. पालिकेच्या स्वतःच्या १० शाळांसह संपूर्ण पालिका क्षेत्रात सर्वच माध्यमांच्या २५० पेक्षा जास्त शाळा आहेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.या ऑनलाइन शिक्षणापासून शिक्षक ,विद्यार्थी व पालकांची सुटका होणार आहे. दि.२७ जानेवारीपासून या शाळा सुरू करण्यास पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परवानगी दिली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या शाळा सुरू करण्यास देण्यात आली आहे. याकरिता शिक्षकांची कोविड चाचणी यापूर्वीच शासनाने अनिवार्य केली आहे. विशेष म्हणजे कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

यापूर्वी सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या ५ वी ते १२ वीपर्यतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री दिले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. तर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५ ते ८ वीपर्यंतच्या शाळा या आदेश अनुसरुन सुरु करण्यात येत आहे. यासाठी सर्व शिक्षकांच्या प्रथम कोरोनाच्या अँटीजेन स्टेस्ट करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर दोन शिक्षक शाळांवर उपस्थित ठेवले जाणार आहे. या तपासणीत शिक्षकात कोरोनाचे सिमटंन्स आढळून आल्यास त्यावर त्वरीत उपचाराच्या दृष्टीने सर्व तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता पालिकांनीही शहरातील शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू होणार आहेत. याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला. शाळा सुरू करण्याआधी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासोबतच थर्मामीटर, थर्मल गन, ऑक्सिमिटर, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हन आदी वाहनांचे निर्जंतुकीकरण नियमित होण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.

वर्गखोल्या तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमानुसार असावी. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे फलक लावणे आवश्यक असून शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहताना मुलांमध्ये किमान ६ फुट अंतर राखावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी सहमती आवश्यक असून ही सहमती शिक्षण पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभाग यांना सादर करावी लागणार आहे. शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करणे व स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर ) निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वर्ग कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये भरवण्यात येऊ नये. हवा खेळती राहण्यासाठी वर्ग खोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या मंजुरीनंतर घेतला. राज्यात पाचवी ते आठवीच्या एकूण १ लाख ६ हजार ४९१ शाळा असून, विद्यार्थिसंख्या ७८ लाख ४७ हजार इतकी आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या शाळांतील स्वच्छतेच्या सुविधा, शाळांचे निर्जंतुकीकरण शिक्षण विभागाकडून प्राथमिक जिल्हा परिषद शाळांना ४ कोटींचे विशेष सादील अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्याचे वाटप सर्व ३४ जिल्ह्यांना झाले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. आता जिल्हास्तरावरून प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शाळांना या अनुदानाचे वाटप करणे अपेक्षित असून, शाळांनी स्वच्छतेच्या, सुरक्षिततेच्या दृष्टीने तयारी सुरू करणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्याच्या ३४ जिल्ह्यांपैकी पश्चिम महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना २ कोटी १९ हजार ९२५ इतके अनुदान, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांना ९८ हजार ७७४ रुपये, तर विदर्भातील ११ जिल्ह्यांना १ कोटी २१ हजार ८४४ कोटींचे सादील अनुदान मंजूर करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेले दहा महिने बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा येत्या २७ तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी आणि पालकांची संमती घेऊनच शाळा सुरू होतील आणि त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर इयत्ता नववी ते बारावीप्रमाणेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दररोज तपासणी (थर्मल चेकिंग) करण्यात येईल त्यासाठी थर्मामीटर, थर्मल गन आवश्यक असेल. त्याआधी शाळांचे निर्जंतुकीकरण आवश्यक असेल, शाळांमध्ये सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, ऑक्सिमीटर, स्वछतागृहांसाठी, दैनंदिन सफाईसाठी आवश्यक द्रव्ये, मास्क या सगळ्या साहित्याची खरेदी शाळांना करावी लागणार आहे. दैनंदिन स्वच्छता, साफसफाईसाठी एवढ्या साहित्याच्या खर्चाचा भर जिल्हा परिषद शाळांना पेलवणे शक्य होणार नाही. या कारणास्तव शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापकांकडून, संघटनांकडून शाळांना निधी पुरविला जावा, अशी मागणी होत होती.

गेली आठ दहा महिने शाळा बंद होत्या. आॅनलाईन शिक्षणात गरीब, खेड्यातील मुलांचे शिक्षण व्यवस्थित होत नव्हते. कंटाळलेल्या शिक्षक विद्यार्थ्यांना नव्या जोमाने या प्रवाहात उतरता येणार आहे. काळजी तर सर्वतोपरी घ्यायचीच आहे. परंतु शाळा सुरु होत असल्याचा आनंद सर्वच स्तरांतून होत आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२७.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *