भारतीय संविधान : एक आदर्श लोकशाही


                          26 जानेवारी हा दिन ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून संपूर्ण देशामध्ये आज आनंदोल्हासात साजरा करीत आहोत.कारण याच दिवसाने भारतीयांच्या जीवनात मानसाचे माणूसपण निर्माण करुन सर्वांना स्वातंत्र्य बहाल  केल आहे. म्हणून ह्या राष्ट्रीय उत्सवाचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्य साधारण आहे. भारतीय गणराज्य हे  जगातील सर्वात मोठे लोकशाही प्रजासत्ताक आहे. भारत देश हा विविध जाती धर्माचा देश आहे. याची विशेषता म्हणजे विविधतेतून एकता निर्मान करणारे भारत हे एकमेव महान राष्ट्र आहे.  या महानतेच रहस्य शोधले तर ते आहे ‘भारतीय संविधान.’ याच संविधानाने जगाला समता, स्वातंत्र्य ,बंधुता देवून मोलाचा संदेश दिला आहे.आणि भारताने जगाच्या ईतिहासात आपल्या नावाचा आदर्श देश म्हणून ठसा उमटवला आहे.


                                   तद्वतच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान ज्ञानसूर्याची  भारतीय संविधानाचे  शिल्पकार म्हणून जगाला ओळख झाली आहे. संविधान लिहिताना या महान शिल्पकाराने सर्व गोष्टीचा विद्वत्तापूर्वक अभ्यास करुन सर्व मानव जातीच्या कल्याणकारी जीवनाचा सारासार विचार  करून सर्वांना समान  हक्क, अधिकार,आणि स्वातंत्र्य देऊन प्रत्येकावर कर्तव्याची जबाबदारीही टाकली आहे.  प्रत्येक नागरिकास समाधानाने आणि स्वाभिमानाने कसे जगता येईल याची काळजी घेतली आहे .  याबरोबरच सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार देऊन आपला प्रतिनीधी निवडण्याचा फार मोठा विशेष अधिकार प्राप्त करून दिला आहे. आणि लोकांचे राज्य निर्माण केले आहे. म्हणजे  लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य होय. यालाच ‘लोकशाही’ म्हणतात.


                              विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या संविधानाची सुरुवातच ‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्यापासून केलेली आहे. आणि ते संविधान भारतीयांनाच अर्पण केले आहे. यातूनच भारतीयांची महानता आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी आपणास लक्षात येईल.म्हणूनच हा देश जगात आदर्शवत ठरला आहे. येथील लोकशाही ईतर देशापेक्षा महत्त्वपूर्ण ठरली आहे. भारत देशाच्या संविधानाचे महत्त्व व विशेषता पुढील तुलना केलेल्या देशातील राज्य घटनेवरून आपणास नक्कीच होईल. अमेरिकेची राज्यघटना  फक्त 7 कलमांची आहे.या राज्यघटनेस लिहिण्यासाठी 4 महिने इतका अवधी लागला आहे. कॅनडाची राज्यघटना  147 कलमांची आहे. तिला 2 वर्षे 5 महिने लागले.  ऑस्ट्रेलियाची राज्यघटना 128 कलमांची आहे. त्याला 9 वर्ष लागले आहेत.  द.आफ्रिका येथील राज्यघटना 153 कलमांची आहे. तिला एक वर्ष कालावधी लागला आहे.


                              या तुलनेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना 395  कलमांची लिहिलेले आहे. तिला 2 वर्षे 11महिने 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. आणि म्हणून ही  जगातील सर्वात मोठी आणि आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. हे जतन करण्याची आणि तिची महानता वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. या विषयी  बाबासाहेबांनी फार मोलाचा संदेश दिला, ते म्हणतात, लोकशाही टिकून ठेवायची असेल तर आपणास काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. त्यात प्रथम गोष्ट ही की, सामाजिक व  आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सनदशीर मार्गांचा अवलंब केला पाहिजे.दुसरी गोष्ट आपण ही केली पाहिजे ती अशी की,जाँन स्टूअर्ट मील म्हणतो, ‘लोकशाहीच्या पुरस्कर्त्यास व संरक्षकास दिलेल्या धोक्याच्या सूचनेचे परिपालन केले पाहिजे.  मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या देखील  चरणावर तुम्ही आपले  स्वातंत्र्य अर्पिता  कामा नये, अगर शासनसंस्थांचा तो दुरुपयोग  करील एवढी सत्ता देखील त्याजकडे तुम्ही विश्वस्त म्हणून  ठेवू नये’.


                                   तिसरी गोष्ट ही की, आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट होऊन चालणार नाही.    राजकीय लोकशाहीचे  रुपांतर आपण सामाजिक लोकशाहीत  केले पाहिजे. सामाजिक लोकशाहीचा आधारभूत  पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही फार दिवस टिकाव धरू शकत नाही.  सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय?  समता स्वातंत्र्य आणि भातृभाव निर्माण करणाऱ्या जीवन पध्दतीस सामाजिक लोकशाही म्हणतात. समता, स्वातंत्र्य आणि भातृभाव या त्रीवेणीची फारकत करता येणार नाही. त्यांचे ऐक्य अविभाज्य आहे.यातील एक एक तत्त्व वेगळे करून त्यांची परस्परांपासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा हेतू हाणून पाडण्यासारखे आहे. स्वातंत्र्य समतेपासून अलग करता येत नाही. आणि समतेला स्वातंत्र्यापासून अलग करता येत नाही. अगर स्वातंत्र्य समतेला भातृभावापासून दुर लोटता येत नाही. समता नसेल तर केवळ स्वातंत्र्यामुळे मुठभर लोकांची मिरास बहूजनसमाजावर माजल्याशिवाय राहणार नाही. समता असेल आणि स्वातंत्र्य नसेल तर व्यक्ती साहसास संधी राहणार नाही.


                             समाजव्यवस्थेत दोन गोष्टीचा संपूर्ण अभाव आहे.पैकी एक गोष्ट आपण प्रथमतः कबूल केली पाहिजे त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे समता. सामाजिक दृष्टीने पाहिले तर आपल्या समाजात क्रमवार उच्चनीच  विषमतेचे तत्व आहे. ज्याप्रमाणे काही लोक उच्चस्थानी जातात तर काही अधः पतितेच्या गर्तेत पडतात.  आर्थिक दृष्टीने पाहिले तर मुठभर लोक धन दौलतीत लोळतात.आणि अफाट जनता दारिद्र्याच्या खाईत खितपत पडली आहे.   ही विसंगती दूर केली पाहिजे. ,नाही तरतर लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. भातृभावाचे तत्व सर्वांनी मान्य केले पाहिजे. भातृभाव म्हणजे तरी काय? आपण सर्व भारतवासीय एकाच मायेची लेकरे आहोत. असा भाव निर्माण होण्यास भातृभाव म्हणतात. भातृभाव म्हणजे भारतीय येथून तेथून एक अशी भावना निर्माण करणारे एक तत्व आहे. सामाजिक ऐक्य सांभाळणारे आणि सामाजिक शक्ती वाढणारे हे तत्त्व आहे.


                                       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सांगितलेल्या मौल्यवान  गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तो प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. तेव्हाच  भारताची लोकशाही मजबूत होईल. देशाचे अखंडत्त्व टिकून राहील.देश सुजलाम सुफलाम होईल आणि हीच यशाची विकसनशील वाट महासत्ताकाच्या  दिशेने   जाईल . प्रत्येकाने संविधान वाचन करावे. संविधानाचा जागर करावा.प्रास्ताविकेचे कार्यक्रमातून वाचन करावे. यातून संविधानाचे महत्त्व वाढीस लागेल.संविधानाची मूल्ये जपले जातील.देशभक्ती वाढेल.देश समृध्द होईल. आपल्या हातून राष्ट्र कार्य घडेल आणि लोकशाही आनंदाने नांदेल..शेवटी समारोप करताना एवढच म्हणेल… 
आजदिनी संकल्प करुएकतेची कास धरुदेशाचा विकास करूनलोकशाही मजबूत करु


..
 – बाबुराव पाईकराव     

     सहशिक्षक               

कै.बापूराव देशमुख मा.व उ.माध्य वि.डोंगरकडा   

  mo. 9665711514

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *