राम मंदिराच्या निधीचे राजकारण?

शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम जन्मभूमी मुक्त झाली असून त्या जागेवर मंदिराचे भूमिपूजन सोहळा झाला. हे मंदिर लोक सहभागातून व लोक वर्गणीतून बांधले जाणार असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागातून श्री राम मंदिर निधी समर्पण समितीची स्थापन करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदीर उभारणीसाठी असलेले सर्व अडथळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दूर झाले. या मंदिराचं आता काम सुरु झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं भूमिपूजन देखील पाच ऑगस्ट रोजी पार पाडलं. या मंदिरनिर्मितीसाठी जगभरातून निधी संकलन देखील केले जात आहे.

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या श्री राम मंदिरासाठी प्रत्येकजण आपआपल्या परिस्थितीनुसार देणगी देत आहेत. गरीब म्हणतो, माझी झोपडी तयार होईल किंवा नाही होईल पण भगवान श्री रामाचे मंदिर जरूर व्हायला पाहिजे. तसेच श्रीमंत लोकही मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या नावानं भाजप व आरएसएस घरोघरी जाऊन रोख पैसे गोळा करत असून त्यांच्याकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे. हा पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा पक्षासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जनतेनं आपला निधी थेट राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये जाईल याची खबरदारी घ्यावी. तसंच, भाजपा-आरएसएसनं गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. सोबतच संघ परिवारातील संघटनांकडूनही निधी गोळा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ‘भाजप व संघ परिवाराने राम मंदिरासाठी यापूर्वीही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ साली विहिंपने १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. तशी तक्रारही पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. मात्र, याची चौकशी करण्याची तयारी भाजपच्या सरकारने दाखवलेली नाही, असं सावंत म्हणाले.

राम मंदिरासाठी भाजपकडून निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदू महासभेनं विरोध केला आहे. भाजपला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपसाठी हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. गेल्या तीन दशकामध्ये भाजपनं जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असं हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितलेलं आहे. निधीचा हिशेब सार्वजनिक न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही जोशी यांनी दिला आहे, याकडं सावंत यांनी लक्ष वेधलं.

सावंत यांनी निधी संकलनातील काही गैरव्यवहाराची उदाहरणे दिली, ती अशी आहेत…

१० सप्टेंबर २०२० रोजी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधून ६ लाख रुपये क्लोन चेकच्या माध्यमातून काढले गेले होते.
१२ एप्रिल २०२० रोजी दिल्लीच्या एका युवकावर अयोध्येतील राम मंदिर पोलिस ठाण्यात खोट्या ट्रस्टच्या नावाने खोटी वेबसाइट काढून पैसे लुबाडल्याची देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खोट्या पावत्या दाखवून राम मंदिरासाठी निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीच्या मुरादाबाद येथील अध्यक्षांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
उत्तर प्रदेशातील पिलीभित येथे ५ लोकांनी खोट्या संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा केल्याचं उघड झालं आहे.
दिल्ली येथे राम मंदिर ट्रस्टच्या नावाने खोटे ट्विटर, वेबसाइट बनवल्याची तक्रार राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी केली आहे.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या नावाने घोटाळा केला जात असून अपहार करणाऱ्या १३ UPI ( United payment Interface) ची यादीच आरएसएसशी संबंधित ऑप-इंडिया या न्यूज पोर्टलनं दिली आहे.
सूरत पोलिसांनी १६ जानेवारीला कारवाई करून एका युवकाला पैसे गोळा करताना पकडले आहे.

सचिन सावंत यांच्या आरोपाला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे. आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राम मंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे आहे. राम मंदिरासाठी सामान्य माणूसही स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे, त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चिंता काँग्रेसवाल्यांना वाटू लागली आहे. राम मंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरित निधी देणाऱ्याकडे सुपूर्द करीत आहेत, असेही उपाध्ये यांनी पुढे स्पष्ट केले.

आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे, याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसनेराम मंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे लगावला आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याचे अभियान सुरू झाल्यानंतर भाजपचे नेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या कार्यासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी यांच्याकडे ठाकूर यांनी १ कोटी रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या कामास सुरूवात झाली आहे. सर्वांच्या योगदानासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्था, संघटनांनी देशव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरू केले आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याचे अभियान सुरू झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी देणगी दिली आहे. अभिनेता अक्षय कुमार यानंही व्हिडिओ शेअर करत देणगी देण्याचं आवाहान केलं होतं. आता या यादीत अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश झाला आहे.

अक्षय कुमारनं त्यानं दिलेल्या देणगीची रक्कम सांगितली नसली तरी राम मंदिराच्या कामाला हातभार लावण्याची जबाबदारी आपलीच असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
टीव्ही मालिकेत प्रभू रामचंद्र यांची भूमिका साकारलेला अभिनेता गुरमीत चौधरी यानं देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो चाहत्यांना मंदिरासाठी दान करण्याचं आवाहन करत आहे. ‘मी आज इथपर्यं पोहोचलो आहे तो, श्री राम यांच्यामुळंच. त्यांचे मी आभार मानतो. कारण माझी पहिली मालिका ही रामायण होती आणि यासाठी स्वत:ला नशिबवान समजतो’,असं त्यानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर यानं देखील राम मंदिर उभारण्यासाठी तब्बल एक कोटींची देणगी दिली आहे. शेवटी एक जुना मुद्दा आता संपला आहे. यामुळं एकता आणि शांतीचा मार्ग खुला होणार आहे. मी आणि माझ्या कुटुंबानं एक छोटंसं योगदान या कार्यात दिलं आहे’, असं गौतमनं म्हटलं आहे.

मंदिर निर्माणात भारतीयांनी आर्थिक हातभार लावायला हवा, यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मकरसंक्रमणापासून माघ पौर्णिमेपर्यंत निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अवधेशानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत अभियान सुरू झाले. त्यावेळी शासकीय रुग्णालयांमध्ये सर्जिकल पार्टचा पुरवठा करणारे व्यावसायिक सज्जादभाई दवावाला यांनी धनादेशाच्या माध्यमातून ५,१०० रुपयांचा निधी दिला.

अनेक शहरातील मुस्लिम बांधवांनी या अभियानात आपला सहभाग नोंदवित आहेत. अवधेशानंद गिरी महाराजांच्या समक्ष दोन मुस्लिम परिवारांनी मंदिरासाठी निधी समर्पित केला. त्यातील एक सज्जादभाई दवावाला यांचे कुटुंब आहे. निधी समर्पणप्रसंगी त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सर्वांपुढे येत स्वत:चा फोटो काढून घेण्याऐवजी त्यांनी महाराजांची कार्यक्रमापूर्वीच भेट घेऊन धनादेश सुपूर्द केला. लहानसहान कारणांसाठी चमकोगिरी करणाऱ्या आणि स्वत:चे फोटो अपलोड करून प्रसिद्धी मिळविणाऱ्यांपुढे ऐंशी वर्षांच्या सज्जादभाईंनी आपल्या कृतीतून आदर्श आखून दिला आहे.

अयोध्येच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. अयोध्येतील मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत, यावर शिवसेनेनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्येचा राजा प्रभू श्री राम यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलंय. व न्यायालयाच्या आदेशानं मंदिर निर्माण होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालंय. तरीही अयोध्याच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.

‘चार लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार हे लोकांना मान्य नाही. हे चार लाख लोक कोणाच्या प्रचारासाठी पाठवत आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपवावं,’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

‘रामाच्या नावानं बँकेत खातं उघडलं आहे त्यात पुरेसा निधी येतो. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळय़ात आधी दिला आहे, असं नमूद करतानाच, राजकीय प्रचारासाठी असं करणं हा हजारो कारसेवकांचा अपमान आहे,’ अशी टीकाही केली आहे.

संपूर्ण जगाने अभिमानाने व श्रद्धेने माथा टेकवावा असे प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्या येथे संपूर्ण जगभरातील व देशातील राम भक्तांच्या लोक वर्गणीतून उभे राहणार आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री व राज्याचे निधी संकलन अभियान प्रमुख शंकर गायकर यांनी सांगितले.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभर निधी संकलन मोहिम राबविण्यात येत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाच लाखाचा निधी श्रीराम मंदीरासाठी दिला आहे. तर विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदीरासाठी एक लाखाचा निधी दिला आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी सर्वच स्तरातून आर्थिक योगदान गोळा होत असून पुण्यातील पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरातर्फे ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या निधीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा निधी अभियानासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. पुण्यामध्ये या अभियानासाठी आलेल्या पू.साध्वी ॠतंभरा जी यांच्याकडे पहिल्या टप्प्यातील ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाचा प्रारंभ 15 जानेवारी रोजी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार आहे. “12 कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
२८.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *