विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. जेव्हा शुक्रवारी रात्री अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे आणि सोशल मीडिया अकाऊंटवरुनही अण्णांचे आभार मानले आहेत.
लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि मा. अण्णा हजारेजी यांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. अण्णांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री, नीती आयोग सदस्य आणि मा. अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अशी एक उच्चस्तरिय समिती गठीत करण्यात येत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उच्चस्तरिय समितीचे गठन होते आहे. यापूर्वी अण्णा हजारेजी यांनी केलेल्या मागण्या आणि त्या पूर्ण केल्यासंबंधीचा अहवालसुद्धा यावेळी त्यांना सादर केला. अण्णा हजारेंनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, असे ट्विटही फडणवीस यांनी केले आहे.
कृषी राज्यमंत्री चौधरी म्हणाले, शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत अण्णांच्या प्रत्राची केंद्राने वेळवेळी दखल घेतली आहे. त्यात अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी जे प्रश्न आहेत, ते कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील.
अण्णा हजारे म्हणाले, केंद्राला सूचविलेल्या मुद्यांना उशीर झाला. तो त्यांनी मान्य केला. मी केंद्राला १५ मुद्दे सुचविले होते. हे मुद्दे आता कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील. हे प्रश्न सुटले तर शेतक-यांना दिलासा मिळेल. आज दिलेल्या आश्वासनामुळे मी उपोषण मागे घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे होता. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी महाजन यांनी अण्णांबरोबर तासभर चर्चा केली. अण्णांच्या मागणीनुसार समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असतील. सरकारच्या निर्णयाचे लेखी पत्र घेऊन केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अण्णांची भेट घेणार आहेत.
शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्य मंत्री हे या समितीचे अध्यक्ष राहतील. हीच समिती सर्व निर्णय घेईल..या समितीत निमशासकीय सदस्य कोण कोण असणार आहेत, याबाबत अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. तसेच केद्रीय कृषी राज्यमंत्री हेही राळेगणसिद्धीला येतील, असे त्यांनी सांगितले.
अण्णा म्हणाले होते की, २०११ मध्ये मी उपोषणाला बसलो. त्यावेळी माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत पत्र पाठविले. त्याचे उत्तरही दिले जात नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांचे शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे व कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखविणार आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
दिल्लीत मंगळावारी घडलेल्या हिंचाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. अण्णा हजारे या घटनेबाबत म्हणाले की, दिल्लीत जे घडलं ते नक्कीच क्लेशदायक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे.
प्रजासत्ताक दिनी प्रजेची सत्ता आली. प्रजा मालक झाली. मात्र अशा पवित्र दिवशी आपणच धूडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणं, पूर्णपणे चूकीचं आहे, असं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. मी ४० वर्षे आंदोलन करीत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होते. गालबोट लागतं, असं अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
केंद्रीय कृषिमूल्य आयोग हा केंद्रीय कृषिमंत्री यांच्या अंतर्गत येतो. मंत्र्यांकडे आयोगाचे नियंत्रण ठेवण्यापेक्षा कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्या, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे. राज्याने दिलेले कृषी दर आणि केंद्राने त्यात केलेली काटछाट अण्णांनी उघड केली होती.
हजारे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेती मालाला खर्चावर आधारित भाव ५० टक्के वाढवून मिळावा, यासाठी २३ मार्च २०१८ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्याबाबत सरकारने पत्र दिले होते. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे झालेल्या खर्चावर ५० टक्के अधिक भाव द्यायला हवा. पण तसे न होता उलट राज्य कृषिमूल्य आयोगाने केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला पाठविलेल्या अहवालामध्ये केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने मोठ्या प्रमाणावर काटछाट केली आहे. शेतकऱ्यांनी पीक उत्पन्नावर केलेला खर्चही मिळणार नाही, असे दर लावण्यात आले आहेत. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असं अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटलं होतं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतलं. यावरून शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या, असा सवाल केला. याला अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते राळेगणसिद्धीत बोलत होते. आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो, असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय.
तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल, असा निर्वाणीचा इशारा अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असंही अण्णा हजारे म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतलं. यावरून शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून अण्णा हजारे यांना काही सवाल केले आहेत.
अण्णांनी आधी उपोषण जाहीर केलं आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केलं. हे सगळं ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले आणि त्यांनी जंगी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचं काम तेव्हा भाजपने केलं, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉक डाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरलं आहे काय?, असा सवाल शिवसेनेनं विचारलाय.
राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतले. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणे व ती पुढे रेटणे ही साधी गोष्ट नाही. पुन्हा अण्णांचे वय पाहता त्यांनी जिवाचा धोका पत्करू नये, असं शिवसेनेनं म्हटलंय. अण्णांनी आयुष्यात जितकं कमावलं होतं तितकं भाजपासोबत मॅनेजमेंट करून आयुष्यातलं पूर्ण गमावलं आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घ्यायचं नव्हतं.
अण्णा यांनी बदललेल्या भूमिकेवरुन सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यांच्या समर्थनाच्या बाजूने कमी पण लोकांना अण्णांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली भूमिका आणि फडणवीस यांच्या मध्यस्थीने घेतलेला यू- टर्न यामुळे नेटकरी गेले दोन दिवस संतापल्याचेच दिसून आले.
काही प्रतिक्रियांची नोंद येथे घेण्यात आली आहे.
👉अण्णांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात नाही, ते तुमच्यासारखे पैसे घेऊन आंदोलन करत नाहीत, किंवा उगाच लोकांना भडकवत नाहीत, राष्ट्रहिताचा विचार करतात, त्यांच्या मुळे आपल्याला माहिती अधिकार मिळाला आणि भ्रष्टाचाराला बऱ्यापैकी आळा बसला. आता आपल्यावर आहे तो कायदा वापरून भ्रष्टाचार बाहेर काढायचाय.
👉त्यांनी योग्यच निर्णय घेतला आहे. त्यांच्या दृष्टीने शेतकरी हीत महत्वाचे आंदोलन महत्वाचे नाही. जर सरकार समोर प्रस्ताव ठेवत आहे तर त्याप्रमाणे सरकार वागते आहे की नाही, हे पहायला काय हरकत आहे. योग्य निर्णय.
👉अण्णा चा निर्णय योग्य आहे, कारण लोकशाही पद्धतीने समिती गठीत करुन शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील असा अण्णा चा विश्व स आहे म्हणून त्यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे, देशाकरिता आयुष्य भर झगडत राहणाऱ्या देव मानसाला सोशल मीडियावर अर्वाच्य भाषेत बोलने हे स्वामी विवेकानंद यांच्या देशात बरोबर नाही
👉अण्णांच्या आजवरच्या भूमिकेमुळे , तसेच लोकपाल मुळे अण्णासोबत वावरणारे कुणी मुख्यमंत्री झाले तर कुणी मोठे मोठे मंत्री मात्र अण्णा लिंबू-पाण्यावरच राहीले.
अण्णांनीच विचार करावा योग्य काय अयोग्य काय?
👉अण्णा हजारे यांना माहित आहे की देशात 1947 पासून शेतकऱ्याचे शोषण सूरू आहे . त्याला जबाबदार सत्ताधारी आहेत. मोदी सरकारच्या पूर्वी शेतकऱ्याच्या आंदोलनावर गोळीबार करून हजारों शेतकऱ्याची हत्या करणारे आपल्या राजकीय स्वार्थाकरीता आज शेतकऱ्याच्या नावाने गळा काढत आहेत. या नेत्यांचे मगर मच्छ के आशू आहेत. आजपर्यंत लाखों शेतकऱ्यानी आत्महत्या हत्या केल्या , त्या आत्महत्याना जबाबदार आजच्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे नेते आहेत.
👉अण्णा तुम्ही लोकशाहीमानता मग आपल्या निर्णयावर 98टक्के कमेंट आपल्याविरुद्ध आहेत मग ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे काय ?तुमच्याकडे कोण आले होते का उपोषण करा म्हणुन सामनातून जनतेच्या भावना मांडल्या तुम्हाला लगेच राग आला आणि मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत म्हणताय हे पुरावे तुम्हाला देतय कोण किरीट सोमय्या सारखी माणसं आपण आपली विश्वासार्हता गमावली आहे
👉नुसती नाचक्कीच नाही तर उपोषन मागे घेण्याने आण्णा बाबत जनतेची विश्वासहर्ताच नष्ट झालेली आहे आणि आण्णा ह्या वयात टिंगल टवाळकीचा विषय झालेले आहेत. आण्णा तुम्ही एक माजी सैनिक आहात आणि एका शेतकऱ्यांचा मुलगा आहात थोडा शांत डोक्याने विचार करुन निर्णय घ्यावयास हवेत.
👉महाराष्ट्रत सरपंच पदाचा लीलाव होतो, ग्रांम पंचायतीच्या निवडणूकीत खूद राळेगण सिध्दि त साड्यांच वाटप केल गेल हे दाखवून दिल्याने अण्णाना कळून चूकल कि सर्वप्रथम महाराष्ट्र साफ केला पाहिजे आन् मग राष्ट्र म्हणून अण्णा मागे आले असावेत. अण्णा स्वच्छ आणि पारदर्शक राज्याच्या बाजून आहेत.
👉सद्यपरिस्थितीत हिंदूस्थानात एकही विरोधी पक्षनेता विश्वास ठेवण्यासाठी लायक नाही. प्रजासत्ताक दिनाला कीसान मोर्चाच्या आडून खलिस्तानवादि गद्दार लोकांनी जो हिंसाचार माजवला त्याचं एकाही विरोधीपक्ष नेत्यांनी नाराजी व्यक्त केली नाही याचे आच्छर्य वाटते. देशातील कायदा, सुरक्षितते बाबत विरोधी पक्षनेते संवेदनशील नाहीत. अश्या लोकांना देशाच्या राजकारण थारा देऊ नका. जय हिंद.
👉अण्णा हजारे पाखंडी उल्लू आहे समाजसेवक नाही तर , झोलर आहे , कारण की काँग्रेस सरकार होते तेव्हा सारखा सारखा उपोषण करत होता , लोकपाल बिल साठी , आता भाजप सरकार आला आहे , किती दिवे लावले आहेत, हे लोकांनी पाहिले आहे , अण्णा हजारे या 6 वर्षात एकदाही उपोषण केला नाही , भाजपचा चेला अण्णा हजारे आहे , रोज उठतात आणि अण्णा हजारे भेटायला जातात भाजपचे फन्टर , मीडियाला ही संगत घेऊन जातात , खाली फुकट भाजप व अण्णा हजारे याचा तमाशा आहे , लोकांनी पहिला तमाशा , अण्णा हजारे स्मशान मध्ये लाकडं गेली आहे , आता तरी खरं बोला , लोकपाल नाटक होता , भाजपची सत्ता अन्यासाठी लोकपाल रक बहाणा आहे , कुठे पाप फेडणार , जाता जाता चांगले आणि पुण्य काम करायला पाहिजे होते , झोलर माणसाला पाप पुण्य सारखाच असतात , देऊन मंदिर नावाला आहे , लोकांसाठी दिखावा आहे , ये सब अंदर की बात है ,
👉हो योग्य आहे..आणि या वयात त्यांनी आराम करावा…तरुण लोकांनी सुध्धा पुढे आले पाहिजे..दरवेळी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालणार नाही..महत्त्वाचे त्यांच्या कामाला राजकीय चेहरा देणे चुकीचे आहे..at least त्यांची कामे तरी दिसत आहे..टीका करणाऱ्यांनी स्वतः ची कामे आधी तपासावित..
👉२०१४ च्या लोकसभा निवडणुकी आधी(लोकपाल) अण्णांच्या उपोषणात “मै हूं अण्णा” चे मुखवटे घालून समर्थन करणाऱ्यनाच आज आण्णा नि उपोषण करू नये म्हणून मनधरणी करत आहेत.
👉भाजपा वर विश्वास ठेऊन अण्णानी आत्मविश्वासाचा घात केलेला दिसुन येतो.कारण जर त्यांना किसान अंदोलना विषयी खरी आत्मीयता असती तर केवळ आश्वासन वर विश्वास ठेऊन त्यांनी उपोषण मागे घेतले नसते.
👉लोक महात्मा गांधीजींच्या विचारावर सुद्धा नाराज आहेत. अण्णा कसे वाचणार. लोक आहेत लोकांच्या तोंडाला कोण हात लावणार. सोशल मीडियावर बोंबलत बसण्यापेक्षा एकदा स्वतः उपोषण करा आणि मग किती सोसता येतय ते पहा. एखाद्या स्वच्छ ठिकाणी थुंकणे सोपे असते पण तिथे थुंकण्यास मनाई आहे हे आपण विसरतो.
👉कसला आंदोलन करतो हा नाटकी जे जे लोकं 2014मध्ये बोंबल्या मारून उपोषण आणि आंदोलन करत होते ते स्वताच्या स्वार्था साठी करत होते हे सिध्द झालं आहे तो मग सलवार वाला बाबा असो की नकली गांधी अंन्ना हजारो हे फक्त दलाल ठरले.यांना एन आर सी,सि ए ए,370,प्रायवेटीकरण,रोजगार नौकरी खतम शिक्षा खतम,शेतिविशयक काळे कायदे यांना काहीच वाटत नाही हे आले होते नाटक करायला थोडी सहानुभुती हाताळायला परंतू ज्या तरहेनी एका दिप सिंध्दू नावाच्या व्यक्तीने शेतकरयाला बदनाम करण्यासाठी कुक्रूत्य केले तसच पेपरवर छापून आलं फडणवीस साहेबाच्या मध्यस्तीनं अंन्ना आंदोलन मागे घेणार.अरे बाभळ्या आता लोकांना समजलय कि तुमची इलेक्ट्रॉक बटन कुना जवळं आहे ते फालतूचे प्रश्न विचारू नका.
👉योग्य किंवा अयोग्य याच उत्तर नेमकं कसं द्यायचे. कारण सरकार कोणाचंही असो. आज 60 वर्ष झाली आहेत तरी शेतकरयाला कोणीच सक्षम केले नाही. त्यांना शेती,आरोग्य,शिक्षण,नोकरी,प्रवास इत्यादीत 50% सवलत दिली असती तर शेतकरी आज स्वयंपुर्ण झाला असता. आतातरी शेतकरयांना वरिल सवलती नुसार न्याय देण्याचे काम सरकार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी करावे हि विनंती आहे.
धन्यवाद!
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
३०. ०१.२१