नांदेड – प्रतिनिधी
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने पौष पौर्णिमा साजरी करण्यात आली. या निमित्ताने काव्यपौर्णिमा या कार्यक्रमांतर्गत भीमस्वर काळजातला हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जुन्या पिढीतील कवी गायक मोहन नौबते हे होते. उद्घाटक कवी गोविंद बामणे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक मंचाचे शामराव वाघमारे, सुमेध कला मंचाचे अध्यक्ष कृष्णा गजभारे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कवींनी बुद्ध धम्म , आंबेडकरी विचार पेरला.
बौद्ध जीवनात पौष पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. बुद्ध कालात राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा आणि भिक्खू संघाला वेळूवन दान देण्याच्या घटना यावेळी घडल्या आहेत. या पौर्णिमेला बावरी नगर, दाभड ता. अर्धापूर येथे दरवर्षी जागतिक धम्म परिषद भरते. या निमित्ताने शहरातील खडकपूरा परिसरालगतच्या पंचशील नगरातील पंचशील बुद्ध विहारात ३७ वी काव्यपौर्णिमा संपन्न झाली. या काव्यपौर्णिमेचे उद्घाटन कवी गोविंद बामणे यांनी एका बहारदार कवितेने केले. त्यानंतर गंगाधर वडने, मोहन नौबते, भगवान वाघमारे, बाबुराव कपाळे, निर्मलाताई नरवाडे, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, भीमाशंकर नरवाडे, गयाताई कोकरे आदी कवी कवयित्री, गायक गायिकांनी सहभाग नोंदवला व एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण केले.
सप्तरंगी साहित्य मंडळाची ही ३७ वी काव्यपौर्णिमा होती. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पपुजन, धूप व दीपपूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र अनुरत्न वाघमारे यांनी हाती घेतले तर आभार संयोजक अनिल थोरात यांनी मानले. जवळपास दोन तास रंगलेल्या काव्यमैफिलीनंतर बुद्ध विहार समितीचे शाहुजी हटकर, नवज्योत नवघडे, सुनिल खाडे, नरेंद्र ससाणे, संतोष हटकर यांच्या वतीने खीरदान करण्यात आली. यावेळी आनंदा धुळे, सुरेश काळे, सुकेशना ढगे, सुमनबाई गोडबोले, गौतम कोकरे, लक्ष्मीबाई नरवाडे, राहूल गोडबोले, दलित कापुरे, सोपान ढगे, प्रकाश गवारे, आकाश थिटे, आकाश हटकर, गोविंद वाघमारे, आकाश हिप्पलवाड, माधव कापुरे, पार्वती खाडे, गीता बनसोडे, दीक्षा गोडबोले, गोविंद वाघमारे, प्रशिक डावरे आदींनी परिश्रम घेतले.