ग्रामीण साहित्य संमेलन

साहित्याचे विविध वाङमयीन प्रकार असतात. त्यानुसार साहित्य चळवळीतही विविध प्रवाह असल्याचे दिसते. एकाच स्वरुपाच्या साहित्य संमेलनात वाङमयाचे विविध प्रकार चर्चिले जावे असे अपेक्षित असले तरी साहित्याचेच काही अंतरंग उपेक्षित राहिले आहेत, किंवा राहत आहेत याची प्रखर जाणीव होऊन ही उणीव भरून काढण्यासाठी काही प्रवाह निर्माण झाले आहेत असे निश्चितपणे म्हणता येईल.‌ म्हणूनच साहित्य संमेलनही या विविध प्रवाही स्वरुपाचीच असतात. संमेलनाच्या पाठीशी प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक अधिष्ठान असू शकते. आहे रे, नाही रे वर्गांचे परस्परविरोधी साहित्यविषयक आंदोलन उभे राहू शकते. नव्हे ती उभी राहिलीच आहेत.

साहित्य संमेलने केवळ साहित्यापुरतीच मर्यादित नसतात, तर संस्कृतीशीही निगडित असतात. संस्कृती लोकांसमोर आणण्याचे काम ही संमेलने करतात. पुस्तके आणि साहित्याचे विविध प्रकार ग्रामीण भागातील नागरिक आणि मुलांपर्यंत संमेलनाच्या माध्यमातून पोहोचतात. त्यामुळेच साहित्याकडे पावले वळवण्याचे आणि लोकांमधून आस्वादक घडविण्याचे काम संमेलने करतात. म्हणूनच ग्रामीण साहित्य संमेलने महत्त्वाची असतात.

ग्रामीण भागातील साहित्य संमेलनाचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. अखिल भारतीय स्तरांवरील संमेलनांमध्येही जे मिळणार नाही, ते या संमेलनात मिळेल, असे गावपातळीवरील छोट्या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पाहून वाटते. कारण मोठ्या संमेलनांमध्ये उत्सव होतो, साहित्यासाठीच्या गोष्टी ग्रामीण संमेलनांमध्ये खूप घडू शकतात. या संमेलनातील पुस्तके, शस्त्रे, चित्रे, छायाचित्रे यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने गावातील लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. या संमेलनातून ग्रामीण भागातील नवे, चांगले साहित्यिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली तर गैर नाही.

संमेलन गावपातळीवर आयोजित केल्यामुळे एक प्रकारे मराठी भाषेचा, बोलीचा सन्मानच वाढवला जातो. शहरांपासून दूर गावकुसात राहणाऱ्या साहित्यप्रेमींना, कवी-लेखकांना यामुळे प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळत असते. ग्राम पातळीवरील साहित्य मंडळे कोणतेही शासकीय अनुदान न घेता ग्रामीण पातळीवरच ही संमेलने यशस्वीरीत्या पार पाडत असतात, ही मोलाची बाब आहे.

ग्रामीण भागातील संस्कृती पुढे आणण्याचे साहित्याकडे पावले वळवण्याचे आणि लोकांमधून आस्वादक घडविण्याचे काम संमेलने करतात. म्हणूनच ग्रामीण साहित्य संमेलने महत्त्वाची आहेत. समाजातील अन्याय शोधून काढण्याची जबाबदारी लेखकाची असते. संवेदनशील कथांमधून त्याचे चित्रण झाल्यास त्याचा प्रभाव पडतो. कथा ज्या ठिकाणी संपते, तिथून ती वाचकाच्या मनात सुरू होते. कथांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन विकसित करण्याचे काम ही संमेलने करतात. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण जीवन मांडले. त्यांच्या निरीक्षणांतून मानवी भावनांचे व्यामिश्र दर्शन होते. ग्रामीण भागातील माणसे कोणताही आडपडदा न ठेवता वागतात. इरसाल नमुने गावखेड्यातच पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचे चित्रण ग्रामीण कथांच्या माध्यमातून लोकांसमोर यायला हवे. त्यासाठीचे व्यासपीठ ग्रामीण साहित्य संमेलनातून उपलब्ध होऊ शकते. साहित्य ही फक्त पुस्तकात बंद करून ठेवण्याची गोष्ट नसून, आस्वाद घेण्याची गोष्ट आहे. आस्वादक तयार होण्याचे काम या संमेलनांतून घडते. अस्तित्व विसरण्याची ताकद साहित्यात असते आणि साहित्य आस्वादनाची प्रक्रिया तिथूनच सुरू होते. साहित्य अभिवाचन किंवा अन्य विविध माध्यमांतून संमेलनातून सादर होते. या संमेलनांमुळे लोकांचे कान तयार होतात. साहित्याच्या प्रकारांची चर्चा होते. नव्या लोकांना व्यासपीठ मिळते.

मुले शहरात असल्यामुळे गावात आई-वडील एकटे असणाऱ्या घरांची संख्या अधिक आहे. एकटेपणामुळे कोकणातील गावांची अवस्था सध्या बिकट झाली असून, मोबाइलमुळे कुटुंबव्यवस्था कोलमडली आहे. वाचकवर्ग कमी होतोय आणि मोबाइलला जास्त वेळ दिला जातोय. अशा स्थितीत मुलांना, लोकांना पुस्तकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही ग्रामीण साहित्य संमेलने करतात. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करतात. प्रादेशिक भागातील श्रद्धा, अंधश्रद्धा, परंपरा सांगणाऱ्या कथांचे वर्तमान, वैज्ञानिक संदर्भ शोधायला हवेत आणि त्यातून नवे जगण्याची प्रेरणा, दिशा मिळायला हवी.

पुरुषांनी व्यवसाय केला, तर एक घर उभे राहते; मात्र स्त्रियांनी उद्योग केला, तर घरातील सर्व मंडळी त्यात येतात. त्यामुळे महिलांनी आपापले व्याप सांभाळून जरूर उद्योग क्षेत्रात यायला हवे. नोकरी करू नये, असे नाही; मात्र उद्योगातून आत्मविश्वास मिळतो, स्वतःच्या पायावर उभे राहता येते. बेरोजगारींचा मोठाच प्रश्न ग्रामीण भागात असतात. ग्रामशोषणाचे स्रोतही गावातच आढळून येतात. तेव्हा रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोजगार गावातच उपलब्ध झाला पाहिजे.

ग्रामीण भागातही साहित्य संमेलने भरवली जातात. सर्व समूह त्यात सहभागी होत असतात.एकतर साहित्य म्हणजे काय असते याची माहिती ग्रामस्तरावर खूप कमी लोकांना असते. ते फक्त मनोरंजन या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतात. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, नाट्य, यांना डिजिटल युगातील स्थान शोधावे लागते. वाचन संस्कृती ही धार्मिक ग्रंथ वाचन आणि पारायण यापलिकडे जायला तयार नाही. शिक्षणाचा प्रभाव आता जाणवू लागला आहे. परिणामस्वरूप आता काही ठिकाणी साहित्य संमेलने भरत आहेत हे सुचिन्ह आहे. मंगळवारपासून सोयगावमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे.हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल, यात शंका नाही.मराठवाडा साहित्य परिषदेची साहित्य संमेलने ही अधिकाधिक शहरवजा खेड्यातच होत आहेत. अशा साहित्य संस्थांनी पुढाकार घेऊन साहित्याचा ग्रामजागर भरवावा. गावखेड्याची सांस्कृतिक भूक खूप मोठी आहे. ती या व्यवस्थेने पूर्ण करावी.ती त्यांची जबाबदारी आहे. या संमेलनाचा मांडव अनेक मानापमान नाटकांनी रंगतो. साधनांची कमतरता असते. साहित्याचे अंग कमी आणि बिघाडीची हमी जास्त अशी गत असते.

राजकीय पार्श्‍वभूमीही यास लाभलेली असते.त्यामुळे आयोजनास कुणी धजावत नाही. ज्यांची शाळा, महाविद्यालये आहेत अशी मंडळी राबता असल्यामुळे संमेलन आयोजनाचे धाडस करतात. महागाईच्या काळात साहित्य जोपासणो अवघड होऊन जाते.त्यातच इंग्रजी भाषा आक्रमणाचा हा काळ आहे. इंग्लिश स्कूल नावाचा नवीन व्यवसाय रूळत आहे. त्यांची सेवावृत्ती की मेवावृती हाही एक प्रश्न आहे. त्या मार्गाने मराठी साहित्य संवर्धन होईल का हे येणारा काळच ठरविल.

गावखेड्यात एखादा दुसरा कवी, लेखक असतो.जीवनाशी निगडीत, परिसराचे चित्रण तो मांडत असतो. त्याची धडपड असते ती आपले साहित्य वाचकांपर्यंत जावे ही. पण त्यास आवश्यक त्या संधी मिळत नाहीत.मातीतून उगवलेले साहित्य पीक करपण्याचीच शक्यता अधिक. प्रकाशन संस्था आणि त्यांचे व्यवहार या विषयी अनेक अनुभव आहेत.

कविता, कथा वा कादंबरी लिहिली तरी प्रकाशित करण्यासाठी शहरातच यावे लागते. कितीतरी दज्रेदार लेखन करणारे लेखक असे आहेत की ते त्यांचे पुस्तक प्रकाशित करू शकत नाहीत.काहींनी तर लिहिणो हा छंदच सोडून दिला आहे. काही फेसबूक , व्हॉट्सअँप, हाईक, गुगल, इन्स्टाग्राम अशा माध्यमांपुरतेच र्मयादित असतात. तिथेच अभिव्यक्त होतात.

साहित्य निर्मिती आणि त्यावरील चर्चा, समीक्षा हा विषयच वेगळा आहे.तो दुर्मिळ आहे. असे असले तरी आसाराम लोमटेंच्या आलोकचा साहित्य अकादमी पुरस्कार ही घटना या मातीचेच पीक आहे. तसे कसदार साहित्य निर्माण होते पण त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होणो ही खरी गरज आहे. खेड्यात संमेलनास खूप चांगला प्रतिसाद मिळतो. नाविन्यता असते.

गावपरिसरातील उत्तम परंपरा लोकसाहित्य याचे प्रतिबिंब या संमेलनात उमटले पाहिजे. नविन लेखकांना लिहीते केले पाहिजे. त्यांच्या पाठीवर थाप देऊन प्रोत्साहित केले पाहिजे. म्हणजे प्रस्थापित लेखकांनी नवे लेखक घडवावेत आणि सुजाण वाचकांनी, रसिकांनी वाचक घडवावेत असे हे समचलनाचे समीकरण आहे. वाचकांना वाचण्यास प्रेरीत करण्यासाठी ग्रामसाहित्य संमेलने महत्वाचे कार्य करतात. मोठय़ा संमेलनापेक्षा छोटे साहित्यिक उपक्रम अधिक भर घालतात. प्रभावी ठरतात. लेखनावर चर्चा होते. भाषिक सौंदर्य अधिकाधिक खुलण्यास मदत होते. ग्रामीण साहित्य संमेलने ही मोठ्या संमेलनाची छोटी आवृत्तीच असते असे मानले जाते.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
३१.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *