नांदेड, दि. ४ फेब्रुवारी २०२१:
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याने मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर झाले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज यासंदर्भातील शासननिर्णय जारी केला.
या ग्रामीण रूग्णालयाची क्षमता ३० खाटांची असणार आहे. या ठिकाणी चार वैद्यकीय अधिकारी व सुमारे २५ आरोग्य कर्मचारी तैनात असतील. विविध आजारांचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी या ग्रामीण रूग्णालयात कार्यरत राहणार असल्याने परिसरातील नागरिकांना दरवेळी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वर असलेले मालेगाव आणि लगतच्या परिसरातील नागरिकांची ग्रामीण रूग्णालयाची मागणी मागील अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित होती. मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नव्हता. ना. अशोक चव्हाण यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आल्यानंतर त्यांनी सतत या मागणीचा पाठपुरावा केला व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, मालेगाव-अर्धापूर परिसरातील सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे.