माळाकोळी ; एकनाथ तिडके
लोहा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या माळाकोळी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनंतर दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली यावेळी सरपंच पदी सौ वैष्णवी मोहनराव शूर तर उपसरपंचपदी निखिल प्रेमचंद मस्के यांची निवड करण्यात आली.
तालुक्यात सर्वात प्रतिष्ठेची व चुरशीची निवडणूक झालेल्या माळाकोळी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता लागली होती दिनांक आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार अशोक मोकले यांच्या नियंत्रणाखाली सरपंच व उपसरपंचपदांची निवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , यावेळी सरपंच पदी पदासाठी सौ वैष्णवी मोहनराव शूर व उशाबाई सोपानराव चाटे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता, निवडणूक प्रक्रिया दरम्यान उषाबाई सोपानराव चाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे वैष्णवी मोहनराव शूर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंच पदासाठी श्री निखील प्रेमचंद मस्के यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार श्री अशोक मोकले यांनी वैष्णवी मोहन यांची सरपंच पदी तर निखिल प्रेमचंद मस्के यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले यावेळी त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अशोक मोकेले तर सहाय्यक म्हणून ग्राम विकास अधिकारी श्री विजय हंबर्डे, तलाठी श्री संदीप फड यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक संतोष गीते यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ,यावेळी सदस्य श्री केशव तिडके, श्री अरुण सोनटक्के, श्री चंद्रकांत केंद्रे, सौ गंगाबाई तिडके,सौ आरती कांबळे ,सौ मनीषा कांबळे, सौ उषाबाई गहरवार, श्री संतोष तिडके, परमेश्वर मुरकुटे, शोभा राठोड, स्वाती चव्हाण ,उषाबाई चाटे, विमलबाई केंद्रे आदी उपस्थित होते.
पहिल्यांदाच महिला सरपंच
माळाकोळी ग्रामपंचायत निर्मिती इतिहासात पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान वैष्णव शूर यांना मिळाला आहे. आज पर्यंत माळाकोळी ग्रामपंचायत स्थापनेपासून कधीही महिला सरपंच झालेली नव्हती. यावेळी नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण राखीव असल्यामुळे वैष्णवी मोहनराव शूर यांनी सरपंच पदी बाजी मारत इतिहास निर्माण केला आहे.
मूलभूत सुविधांसह पायाभूत विकासावर देणार लक्ष
पाणी ,रस्ते ,वीज ,नालेसफाई या मूलभूत सुविधांसह गावातील शिल्लक असलेल्या पायाभूत विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन नूतन सरपंच वैष्णवी मोहनराव शूर यांनी याप्रसंगी केले आहे. अंतर्गत पाईपलाईन, गावाअंतर्गत मजबूत रस्ते, डिजिटल शाळा या बाबींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
” सोपान काकांची” आठवण
माळरान व नापीक अशा माळाकोळीत आर्थिक सुबत्ता आणण्याचे श्रेय हे आद्य शिल्पकार स्व. सोपान काका शूर यांना दिले जाते , त्यांनी शिल्पकलेची मुहूर्तमेढ रोवून गावात आर्थिक सुबत्ता आणली , म्हणून ते “आद्य गुरु” म्हणून ओळखले जातात त्यांच्याच सुनबाई आज माळाकोळी च्या सरपंच झाल्यामुळे एक प्रकारे त्यांना गावाने गुरुदक्षिणाच दिल्याची चर्चा होत आहे , शिवाय त्यांची आठवणही केली जात आहे.
सर्वात तरुण उपसरपंच
माळाकोळी च्या राजकीय इतिहासात सर्वात तरुण उपसरपंच होण्याचा मान निखिल प्रेमचंद मस्के यांना मिळाला आहे अवघ्या 23 वर्षे वयाच्या निखिल मस्के यांची माळाकोळी च्या उपसरपंच पदी निवड बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांना मान मिळाला आहे त्यांनी माळाकोळी तील दिग्गज राजकारणी माजी जि प सदस्य व माजी सरपंच चंद्रमणी मस्के यांचा पराभव करत विजय मिळवला होता.