तिर्थरुप बाबांस, साष्टांग दंडवत..

प्रिय बाबा,खरंतर बाबा म्हणताना अवघडल्यासारखे वाटत आहे ; कारण समज येण्या अगोदर पासून तुम्हाला ‘दादा ‘ असेच म्हणत आलो आहे. म्हणून आजपण ‘दादा’ म्हणूनच बोलेन. खरंतर खुप काही बोलायचं आहे,सांगायचं आहे .तक्रार म्हणून नाही, कारण आजपर्यंत कधीच तुमच्या विषयी मनात किंतु निर्माण व्हावा असे तुम्ही वागलाच नाहीत किंवा तक्रार करायची अनपेक्षितपणे पण कधी संधी दिली नाहीत.

माझ्यासाठी आदर्श म्हणून तुमच्या शिवाय दुसरा कोणता चेहराच येऊ शकत नाही. कामाप्रती एकनिष्ठ, विश्वासहार्य, नात्यामध्ये झोकून देण्याची वृत्ती, त्याग,प्रेम,प्रामाणिकपणा कितीतरी अशा बाबी आहेत मला सांगायला शब्द अपुरे पडत आहेत. दादा तुम्ही फक्त देत राहिलात.तुमचा देण्याचा सुगंध माझ्या आयुष्यात एखाद्या पारिजातकाप्रमाणे पसरला आहे. तो मला आयुष्यभर पुरुन उरेल एवढे मात्र मी विश्वासाने सांगू शकतो.

एखाद्या निवांत वेळी तुमच्या सोबत बसले असता तुम्ही बऱ्याच वेळा भुतकाळात रमून जाता.कशाप्रकारे वयाच्या दहाव्या वर्षापासून वर्षाकाठी पाच रुपयासाठी तुम्ही गुरे राखण्याचे काम केले.तिथपासून सुरवात झालेली कष्टाची प्रवास यात्रा तुमच्या वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत कायम आहे. मुलाबाळांसाठी जे जे करायचे असते त्याच्या कितीतरी पटीने जास्तच केले आहे. चौथी पर्यंतचे तुमचे शिक्षण पण शिक्षणाबद्दल कमालीची तुमची आस्था. एखाद्या सुशिक्षित , उच्चशिक्षित तरुणाला लाजवेल अशी आहे. त्यात तुम्हाला आईची पण तुमच्या एवढीच तोलामोलाची साथ मिळाली आहे.

गावातील एकाच ब्राह्मण शेतकऱ्याकडे जवळपास चाळीस वर्षे तुम्ही शेती केलीत.कारण तुम्हा दोघांचा एकमेकावर तेवढा विश्वास होता.त्याच कष्टातून आम्हा सात भावंडांना शिक्षण दिलंत.माझ्या चार बहिनीचे लग्न लावून दिलंत.रहायला कुडाचे घर असताना फक्त कष्टातून जागा घेतली. त्यावर तुमच्या परीने होईल तसे आमच्यासाठी चांगले घर बांधले.या भौतिक सुविधा कमी जास्त झाल्या असतीलही, (कमी झाल्यात असे मला तरी वाटत नाही. ) मुलांच्या वयाच्या चाळीसीपार ,तिसीपार तुम्ही त्यांना सांभाळत आलात.सांभाळ केलात.मुले मुलांचा संसार,नातवंडे सगळ्यांचा भार तुम्ही सोसलात.तुमच्या खांद्यावर उचललात.स्वतः काट्यावर चालून मुलांच्या वाटेवर मात्र साखरपेरणी करत राहिलात.

तसे म्हणाल तर माझ्या मते कोणत्याही वडीलांनी मुलांचा भार फार फार तर पंचविसी पर्यंत उचलायला हवा.त्यामुळे मुले स्वावलंबी लवकर बनतील.नाहीतर ते परावलंबी होतात.ते प्रत्येक गोष्टीसाठी आईवडील अथवा दुसऱ्यावर अवलंबून असतात.मग मनासारखे झाले नाही की स्वतः कसलेही कष्ट न करता त्रागा करून आईवडिलांना त्रास देतात.आणि मग मुलांना आई वडीलांच्या श्रमाचे मोल राहत नाही.एदाकदाचीत ते यशस्वी जरी झाले तर स्वतःच्या कर्माने,नशिबाने यशस्वी झाल्याच्या भंपक वल्गना मारतात.

दादा तुम्हाला एक सांगतो,आर्थिक बाब आम्हाला लहानपणी कधी कळाली नाही, ती तुम्ही कळू पण दिली नाही. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुमचे संस्कार. तुम्ही कधी घरात व्यसन केलं नाही म्हणून आम्हाला कधी कोणतं व्यसन जडले नाही. कधी अपेक्षांचे ओझे आमच्यावर टाकले नाही, कधी कोणत्या विचारात बांधून ठेवलं नाही,कधी घरात शिवीगाळ केली नाही, आमच्या कानावर घरात शिवी अथवा वाद आम्हाला पहायला मिळाला नाही,नाहीतर आज घराघरात शिवीगाळ करणारे,उच्चशिक्षित असून अर्वाच्य शब्दात बोलणारे आज कितीतरी लोक भेटतील.

आईसोबत पण किती सामंजस्य, एक आदर्श जोडपे तुमच्याखेरीज दुसरीकडे पहायला मिळाले नाही, आता आमचेही लग्नं झाले आहेत, बायको सोबत वावरताना किती मतभेदांना सामोरे जावे लागते,त्याचे कितीवेळा तरी वादात रुपांतर होते. हे अनेकवेळा अनुभवत आहोत.पण आई आणि तुमच्या मध्ये वाद झाल्याचे आजतागायत आम्हाला पहायला मिळाले नाही. मूलांसाठी मोकळीक म्हणजे स्वातंत्र्य दिलंत. त्याचाच परिणाम आमच्या जडणघडणीवर,आमच्या वर्तनावर दिसून येतो.ही कधीही कुठेही न विकत मिळण्यासारखी जीवनातील अनमोल भेट तुमच्या वर्तनुकीतून आम्हांस दिलंत.

आयुष्यभर सतत कष्ट करत आहात.तुमच्या शरीरातील रक्ताचा एक न एक थेंब तुम्ही मुलाबाळांसाठी घोटवलात.त्यांना त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत चंदनासारखे झिजलात.आता मुलेही कमावते झाले आहेत. आता मुलांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. त्यासाठी पण तुमचेच योगदान आहे. म्हणून म्हणतो खुप खस्ता खाल्ल्या आजपर्यंत. आणि आम्ही मुले स्वतः घेतलेल्या थोड्याशा परिश्रमाला,चिमूटभर कष्टाला जे तुमच्या तुलनेत नगन्य आहे .शुन्य आहे. आयुष्यात किती संघर्ष केला म्हणून आम्ही आव आणत आहोत कधी दुखाचा थोडा काटा जरी बोचला तरी रडत आहोत.

तुम्ही आता मुलांचा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती चा विचार सोडून द्या.दादा तुम्ही आता कामातून थांबायला हवं.आता आराम करायला हवं.सर्व मुलांकडे जावून रहायला हवं.एकच विनंती दादा आता थोडा विसावा घ्या आणि आपण केलेल्या कष्टाचे फळ किती गोड आहे कधी चाखून बघा.कधी डोळेभरुन पहा.आईला तुमच्या सोबत हे सौख्य अनुभवू द्या.नातवंडा सोबत खेळा.एवढीच तुम्हाला विनंती करायची आहे.

तुमचाच मुलगा
सतीश…

सतीश सोपान यानभुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *