समाजात सलोख्याचे संबंध राहण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा- सुभाष लोखंडे

फेसबुकवर आॅनलाईन चर्चासत्र रंगले; शिवजयंती निमित्त बौद्ध‌ – मराठा तरुणांचा आॅनलाईन चर्चासत्रात मोठा सहभाग


नांदेड – बौद्ध आणि मराठा समाजात सतत तेढ निर्माण केली जाऊन आजपर्यंत राजकारणी लोकांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. प्रसंगी दोन्ही समाजातील असंतोषाचे पर्यवसान दंगलीत झालेले आहे. सामाजिक असंतोषाबरोबरच वैमनस्यही निर्माण होत गेले. परंतु आता समाज सजग झालेला आहे. तो विचार करु लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना बौद्धांनी स्विकारले आहेच ; तर मराठा समाजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणावर स्विकारु लागला आहे. छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महान वैचारिक प्रतिकं आहेत. दोन्ही समाजात सामाजिक सलोखा आणि समन्वय साधण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेच्या वतीने आयोजित आंबेडकरी साहित्य संस्कृती आणि विचार या फेसबुक समुहात आॅनलाईन पद्धतीने विचार व्यक्त केले.

   छत्रपती शिवाजी महाराज यांना जसे मागासवर्गीय लोकं मनापासून, अभिमानाने आणि आपलेपणाने स्विकारतात तसे इतर समाजातील लोकं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून, अभिमानाने आणि आपलेपणाने स्विकारत नाहीत याची खंत आहे. पण त्याचबरोबर हा बदल पण हळूहळू होतोय की, इतर समाजातील काही लोकं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आता हळूहळू स्विकारायला लागलेत, त्यांना समजून घ्यायला लागले आहेत, याचाही आनंद आहेच! अशी प्रतिक्रिया अहमदनगर येथून सहभागी झालेले मोहनीश कांबळे यांनी दिली. नवी दिल्ली येथून साऊल झोटे म्हणतात की, मुळातच प्रेरणा आणि जातीय अस्मिता याचं आकलन करण्यात गफलत झाल्यामुळे आणि आंबेडकरी चळवळीत बहुजनवाद्यांनी केलेल्या वैचारीक प्रदूषणामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. बहुमताच्या राजकारणात वारंवार येत असलेल्या अपयशामुळे आंबेडकरी समूह हिंदूच्या छोट्या छोट्या जातीय अस्मितांना कुरवाळू लागला आहे, असचं काहीसं चित्र आहे.

भगव्याला , तथागत बुद्धाचाच वारसा आहे हे इतिहास सांगतो शिल, प्रज्ञा,करूणा, मैत्री ,बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे बुद्धाचे तत्व आणि यालाच तर छत्रपती शिवरायांनी महत्व दिलेलं आहे हे अजूनही रयतेला दिसंत नाही हिच खरी शोकांतिका आहे. जो इतिहास जाणत नाही तो इतिहास घडवू शकत नाही ही भूमिका चिखली (बुलढाणा) येथील विकास भंडारे म्हणाले. मराठा आणि बौद्ध समाजात कायम सलोखा राहावा, कोणतेही वितंडवाद होऊ नयेत, दोन्ही समाजांनी कोणत्याही मुद्यावर हातात दगडं घेऊन एकमेकांसमोर उभे राहू नये किंबहुना आपापली प्रगती साधावी ही मानसिकता घेऊन अनेक बौद्ध व मराठा कार्यकर्ते पुढे येत आहेत. काही विघ्नसंतोषी सोशल मीडियाचा आधार घेऊन जाणिवपूर्वक वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यात काही समाजकंटकही सहभागी आहेतच. तेव्हा अशा सामाजिक नेतृत्वांना वेळीच मूठमाती देणे आवश्यक आहे,  असा एकूणच या चर्चासत्राचा सूर होता. 

‘बौद्ध व मराठा समाजात समन्वयाचा अभाव’ या विषयावर आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन गेल्या सात दिवसांपासून करण्यात आले होते. त्यात खामी साम, कनिष्क गमरे, गौतम उजगरे, अरुण पगारे, नितीन नरवाडे, विपुल भवरे, सिद्धार्थ जगदेव, भीमराव डोलारे, संतोष काकडे, नितीन ‌उन्हवणे, दीनानाथ मनोहर, मयुर तांबे, अशोक शिंगे, चंदन पळवेकर, सीमा जाधव, प्रदीप कांबळे, लक्ष्मण अवचरमल, विनय हनमंते, रेवती अलोणे,  भारत कांबळे, केतन पगारे, बंटी मेश्राम, रमेश राजगुरू, दीपक आवाळे, गीता महाजन, संतोष तोंडारे, धम्मरत्न निकम, राहुल खरात, जनार्दन हटकर, महेंद्र मलामे, हेमंतकुमार कंधारकर, शरद महाकश्यप, सुविद्या रामटेके यांच्यासह पाचशेहून अधिक चर्चकांनी सहभाग नोंदवला होता. चर्चासत्राचे समन्वयक म्हणून अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे सरचिटणीस गंगाधर ढवळे यांनी काम पाहिले. तर आभार राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *