पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भ्रमणध्वनीवर शुभेच्छा संदेश!
नांदेड : कोरोनाने पुन्हा एकदा वर काढलेली मान, त्यातच लग्न समारंभ ही जशी खर्चाची बाब तशीच समुह जमा करुन कोरोनाला नव्याने आमंत्रण यामुळे सामाजिक जाणीवा जपत नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी साखरपुड्यामध्येच चक्क लग्नसोहळा उरकुन घेतला. एवढेच नव्हे तर नववधू-वरांसह या समारंभात तब्बल ५० जणांनी रक्तदान करुन समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
लग्न म्हटलं कि, आवाढव्य खर्च, नातेवाईक, स्नेहांकितांचा मेळावा परंतू संदीप सोनकांबळे हे एक आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य नाव. सामान्यांच्या सुखदू:खात धाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून त्याची वेगळी ओळख. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर नगरसेवक पदासह अनेक जबाबदार्या सोपविल्या आहेत. अशा या तरुण कार्यकर्त्याचे कांही दिवसांपूर्वी हडको येथील बसवेश्वर नगरात राहणारे रविदास चित्ते यांची कन्या सिमा हीचा विवाह संदीपसोबत निश्चित झाला. विवाहापूर्वीचा साक्षीगंध सोहळा सिडको येथील साईदत्त मंगल कार्यालयात सोमवार दि.२२ रोजी ठरविण्यात आला.
या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, महापौर सौ. मोहिनीताई येवनकर, काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांच्या सुविद्य पत्नी मृणालताई राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी, नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
कोरोनाचा वाढता धोका व लग्नासाठी हिच मंडळी पुन्हा उपस्थित राहणार ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी सोनकांबळे व चित्ते कुटूंबियांशी चर्चा करुन साक्षीगंध सोहळ्यात लग्न लावण्याची सूचना केली. ही सकारात्मक सूचना तात्काळ उचलत माजी पालकमंत्री डी.पी. सावंत व आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी साक्षीगंध सोहळ्यात लग्न लावण्याचा आग्रह धरला. उपस्थितांनी या सूचनेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. भन्ते पय्याबोधी यांनीही या सोहळ्यासाठी संमती दर्शविली. ही सर्व पार्श्वभूमि लक्षात घेऊन दोन्ही कुटूंबियांनी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास नववधू-वरांनी संमती दर्शविली आणि साक्षीगंध सोहळ्यातच विवाह संपन्न झाला.
सामाजिक जाणीवा जपत विवाह सोहळा संपन्न होत असतांनाच कोरोनाचा पार्श्वभूमिवर नववधू-वरासह युवक, युवतींनी रक्तदान करुन आणखी एक नवा चांगला पायंडा पाडला. या विवाह सोहळ्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. या विवाहप्रसंगी उपमहापौर मसूद खान, स्थाई समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडिवाले, माजी महापौर सत्तार, जि.प.सभापती संजय बेळगे, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, पत्रकार विशाल सोनटक्के, अनिल कसबे, संदीप पतंगे, रघुनाथ पोतरे, शमिम अब्दुल्ला, किशोर भवरे, अमित तेहरा, विनय गिरडे पाटील, विठ्ठल पाटील डक, पप्पु पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, अजिज कुरेशी, चांदपाशा, अ. गफार, सुभाष रायबोळे, विजय सोनवणे, किसन कल्याणकर, माधवराव कल्याणकर, ज्योती रायबोले, बाळासाहेब देशमुख, गोविंदराव देशमुख, उद्योजक गजानन श्रीमनवार, प्रफुल्ल सावंत, सुभाष काटकळंबे, बालाजी सूर्यवंशी, दिलीपसिंघ सोडी यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा
भ्रमणध्वनीवर शुभेच्छा संदेश!
नगरसेवक वर संदिप व वधू सिमा यांनी साक्षगंध (साखरपुडा) कार्यक्रमातच विवाहबध्द होवून समाजात एक नवा व स्तूत्य असा पायंडा पाडला आहे. विवाह सोहळयास येण्याची इच्छा असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवू शकलो नाही. वर संदिप व वधू सिमा यांचे वैवाहिक जीवन सुखाचे, समाधानाचे व समृध्दीचे जावो. दोघांनाही शुभाशिर्वाद असा शुभेच्छा संदेश देणारा भ्रमणध्वनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. त्यांचा शुभेच्छा संदेश उपस्थितांना ऐकवण्यात आला.