नांदेड,दि.2- मुदखेड शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. यास यश मिळाले असून शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत मुदखेड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 40 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मुदखेड शहरात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विविध विकास कामे राबवून शहराचा कायापालट केला. अनेक रखडलेल्या कामांना गती व प्रलंबित कामे मंजूर करुन घेण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मागील भाजप सरकारच्या काळात निधीअभावी विकास कामे ठप्प झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड शहर व तालुक्यातील विविध विकास कामांसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करुन आणला.शहरातील वाढती लोकसंख्या यातून भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होवू शकतो यासाठी बळेगाव बंधार्यातील पाणी मुदखेड शहराला उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा मुदखेड शहरवासियांची होती. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही शहरवासियांच्या भविष्यातील मूलभूत गरजा लक्षात घेवून विकास कामे करीत आहेत. मुदखेड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला .
या पाठपुराव्यास यश आले असून राज्य शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मुदखेड शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 40 कोटी 79 लाख रुपये मंजूर केले आहेत. बळेगाव बंधार्यातून मुदखेड शहरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शहराच्या या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. ना.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुदखेड शहराचा पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.