कंधार (प्रतिनिधी) नारी ही आपल्या कुटुंबाचे चाक असून हे चाक जर निखळले तर कुटुंबाची वाताहत होते म्हणून प्रत्येकानी ‘नारी सन्मान’ करण्यास शिका असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती व कंधार अभिवक्ता संघाच्या संयुक्त विद्यमाने पं. स. कंधार येथील बचत भवनात कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्या. सलगर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून न्या. सय्यद, न्या. सुभाष तारे, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड. किशोर क्षीरसागर, गटविकास अधिकारी बळवंत हे होते. न्या. सलगर पुढे म्हणाले की, सद्ध्याच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असुन त्यास बर्याच अंशी आपली पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे. महिला ही कुटुंबाच्या गाडीचे चाक असून हे चाक जर निखळून पडले तर कौटुंबिक गाडीचा अपघात होऊन अनेक दुर्दैवी घटना घडतात. नारीकडे कौटुंबिक ज्ञानाचा समुद्र असतो.
मुलांच्या पालनपोषणासाठी नारी ही आरसा असून ती प्रेमाचे प्रतीक आहे आणि जीवन नौकेची ती चालक आहे. म्हणून सर्वांनीच नारीला सन्मानाची वागणूक देऊन आपली कुटुंब व्यवस्था बळकट करावी तरच येणारी पिढी ही सुसंस्कृत व संस्कारित घडणार आहे अन्यथा अशा वादात अनेक कुटुंबाची वाताहत झालेली आहे.
यावेळी दिवाणी न्यायाधीश सभाष तारे यांनी महिलाविषयक कायदे, हुंडा प्रतिबंधक कायदा, कार्यालयीन कामाचे ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण तसेच अन्यायग्रस्त महिलांना नुकसानभरपाई देणार्या कायद्याविषयी सविस्तर विवेचन केले तर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर क्षीरसागर यांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंबंधी महिलांना सासरी होणार्या त्रासापासून कायद्याने मिळणारी मदत याविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला संघाचे सचिव अॅड. सुधाकर मुसळे, अॅड. रवि कांबळे, अॅड जयप्रकाश देऊळगांकर, अॅड. राहुल ढवळे, अँड. शिवाजी मोरे, उपाध्यक्ष अॅड. अन्सारी पं. स. चे सर्व अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोले मॅडम यांनी केले तर आभार अॅड. अन्सारी यांनी मानले.