” जन्म बाईचा बाईचा
खुप घाईचा घाईचा
एक आईचा आईचा
एक ताईचा”
अहो किती घाई जातो हा स्त्री जन्म, कधी ह्या कळीचे रुपांतर फुलात होते आणि कधी त्या फुलाचे विसर्जन होते. हा जो सर्व प्रवास किती कमी वेळात होतो ना!या ‘ बाईपणाची’ जी गंमत आहे ना ती फारच अप्रतिम आहे. तिच्या आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात ती अगदी दुधात साखर विरघळावी तशीच विरघळून जाते. बाबांची लाडकी परी असते, तर दादा ची खोडी काढणारी खट्याळ तायडी असते. पण जेव्हा हीच खट्याळ व गोड परी कोणाची तरी पत्नी होते तेव्हा तिच्याही नकळत ती अल्लड पोर एक परिपक्व पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी होते. एवढ्या नात्यांचे पदर ती अगदी सहज उलगडत जाते. मग कधी या तिची त्रेधातिरपीट ही उडतच असते. पण जर एकदा पती महाशयांनी अगदी प्रेमाने तिला म्हटले की- किती ग राबते घरासाठी. झालं एवढं टॉनिक पुरेसा आहे तिला अन मग बघा कशी सुसाट एक्सप्रेस पळते तिची. अशीही निरागस असते.
जेव्हा आपल्या बोबड्या बोलण्याने सर्व घरालाच ती वेड लावते तर तीच बबडी जेव्हा सून होते तेव्हाही ती अगदी चोख जबाबदाऱ्या पार पाडत असते. सासूच्या भूमिकेत जेव्हा ती जाते तेव्हा तर खरी परीक्षा असते तिची कारण परक्या घरातून आलेल्या मुलीला आपल्या रितीभाती शिकवून तिलाही सांगताना आपल्या तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेल्या मुलाला ती अगदी अलगद तिच्या(सुनेच्या ) विश्वात सोडते. अन आता राहता राहिला तो एक शेवटचं नातं सांगणारा धागा तो म्हणजे आजी चा, आजी म्हणजे नातवंडांची मैत्रीण, त्यांच्या सगळखोड्यांची भागीदार व साक्षीदारही प्रत्येक घरातलं हे आजी नावाचं गाव फार गमतीदार असतं कारण नव्या व जुन्या दोन्ही पिढ्यांमध्ये रेशीम धागा गुंफणारा हा दुवा असतो.
नातवंडांची ढाल असते. ह्या सर्व पैलूंना प्रत्येक स्त्री अगदी सहज उलगडत जाते व स्वतःला सोबतच इतरांचे आयुष्य ही सुगंधित करून टाकते.
या सर्व भूमिका प्रत्येका स्त्रीबाबत कमी-अधिक फरकाने दिसतच असतात. एकाच कुळातील असलेल्या सीता व उर्मिला या दोघींचेही चरित्र मोठे विस्मयकारक आहे कारण सीता रामा सोबत आहे पण सुखात लोळणारी ही राजकन्या काट्या-कुट्या मधून वाट काढत पर्णकुटीत राहते. तर राजमहालात सर्व भौतिक सुखे उर्मिले सोबत आहेत पण ज्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला तो तिचा जीवनसाथीच तिच्यासोबत नाही. पण तरीही ती अगदी स्थितप्रज्ञ तिने आपल्या लोकांना सांभाळत आहे. खरंच किती तो संयम. (दोघीच ).
कधी क्रेन(किरण ) बेदी बनवून पंतप्रधानांच्या गाडीला उचलते तर त्याच पंतप्रधान( स्वर्गवासी इंदिरा गांधी) आपल्या सद्सद्विवेकबुद्धी ला जागृत ठेवून या किरण चे कौतुक करून मोठ्या मनाने तिला क्रेन म्हणून संबोधतात. किती ती कर्तव्यतत्परता व त्या कर्तव्यतत्पर तिची खुल्या दिलाने दिलेली दाद. धन्य त्या दोन्ही स्त्रिया.
स्वतःच्या रूपाने इतरांची मने जिंकता जिंकता ती कधी युद्ध जिंकून सम्राज्ञी झाली व तेही फारच कमी वयात अशात या राणी लक्ष्मीबाई ला सलाम कारण
खूब लडी मर्दानी
झाशीवाली राणी थी.
संपूर्ण जगातून सौंदर्यवती चा किताब मिळवणारी ऐश्वर्या असो किंवा बॉक्सिंग मध्ये जिंकणारी मेरी कोम असो. कसल्याही अनुकूल ते विना अनवाणी पायांनी धावणारी सावरपाडा ची एक्सप्रेस कविता राऊत जी की वेगवेगळ्या प्रकारे यशाचे व विक्रमाचे मनोरी रचते.
किती बरे तिची रूपे म्हणूनच तर आदिशक्ती लाही नवरूपे घ्यावी लागली. स्वतःवरती झालेल्या अत्याचार, अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठून इतर अनाथांची माय झालेली सिंधुताई असो किंवा स्वतःच्या पतीला वीर मरण आले असता स्वतःच्या अवघ्या दहा दिवसाच्या चिमुकल्या बाळाला घेऊन त्याच्या चितेला भडाग्नी देणारी वीरपत्नी असो. किंवा स्वतःचा एकुलता एक पुत्र वीर मरण प्राप्त करतो तेव्हा अभिमानाने ती माय माता म्हणते परमेश्वरा मला एकच पुत्र दिलास जो या मातेच्या सेवेत मृत्यू पावला अजून एखादा दिला असतास तर कदाचित या मातृभूमीची जास्त सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असते.
खरंच किती सुंदर पैलू आहेत या स्त्री जन्माचे.
आमटे कुटुंबीयांकडून तर जणूकाही साधनाताईंनी स्वतःच्या नावाला अगदी सार्थ ठरावी अशीच साधना( वैद्यकीय व्रत) आपल्या मुलांना, सुनांना, नातवंडांना घ्यायला लावले. त्या स्वतः बाबांसोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणूनच तर त्या आदिवासी पाड्यांना माणूस म्हणजे काय हे समजले. खरंच किती सुंदर जन्मा आहे हा स्त्री जन्म स्वतःच्या जन्माने ती सर्वांचे आयुष्य अगदी आनंदाने भरून टाकते.
या जगातील सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे ही स्त्री कारण केवळ ही स्त्रीच स्वतःच्या गर्भात वाढणाऱ्या त्या जीवाच्या प्रत्येक हालचालीचा स्वर्गीय आनंद घेत असते. हा अनुभव किती दिव्य असतो. पंजा स्त्रीच्या खुशीत एखादं फूल उमलत नाही तरीही ती एखाद्या बागेची अर्थात अनेक फुलांची काळजीपूर्वक देखरेख करणारी माळी होते. जसे की मदर टेरेसा. तसेच इतरही भरपूर स्त्रिया आहेत ज्यांनी स्वतःचे मातृत्व या पद्धतीने सिद्ध करून दाखविले आहे.
” नारी जीवन झूले की तरह
इस पार कभी उस पार कभी,
खरंच आहे कि हे नारी जीवन झोक्या सारखेच तर आहे. कधी हा हिंदोळा तिला स्वर्गीय सुखाची अनुभूती देतो तर कधी नरक यातना पण डगमगेल ती कशी ही नारी, अगदी दैनंदिन जीवनातच पाहणा मोलमजुरी करणाऱ्या आणि स्त्रियांचे पती हे व्यसनी असतात पण आपल्या चिल्या पिल्ल्या साठी ही माय माता रणरागिनी च्या अवतारात उभी राहते.
स्त्री-पुरुष ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण निसर्गासोबत प्रकृती आहे तर शिवा सोबत शक्ती. त्यामुळे एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावं तिच्याकडे एक माणूस म्हणून बघा, तिलाही थोडासा सन्मान द्या. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण समाजाकडून एका स्त्रीने केलेली ही एक माफक अपेक्षा. शेवटी एकच
हमारी नही चिंगारी है.
धन्यवाद
सौ भाग्यश्री अभिजीत राव जोशी लालवंडी कर कंधार.