कंधार दि. 8मार्च (प्रतिनिधी)
आजच्या युगातील महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेतली असून पुरुषाच्या बरोबरीने त्याहीपेक्षा सरस पणे महिला काम करत आहेत याचेच एक ज्वलंत उदाहरण कंधार तालुक्यातील आंबुलगा येथील शेख तरन्नुम या मुलीची संरक्षण दलातील बी.एस.एफ. मध्ये निवड झाली आहे. असे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त प्रियदर्शनी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संरक्षण दलातील बीएसएफ मध्ये निवड झालेल्या शेख तरनुम या मुलीचा सौ. वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य सौ. राजश्री शिंदे,सौ.शामा पाटील,सौ. मीरा श्रीसागर,श्रीमती प्रतिभा खैरे, शेख यास्मिन, सौ.मनीषा कुरुडे,आदी सह मुलींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना सौ.वर्षाताई भोसीकर म्हणाल्या की आजच्या या आधुनिक काळामध्ये महिला या पुरुषाच्या बरोबरीने राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य, संरक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये देखील महिलांचा मोठा वाटा असतो,असे असताना देखील आजही ग्रामीण भागामध्ये व शहरी भागांमध्ये स्त्रियांवर अनेक अत्याचार होत आहेत यासाठी महिलाविषयक कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे यासाठी महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये 50% आरक्षण मिळाले पाहीजे आजच्या प्रसंगी महिलांना मी एकच आव्हान करते सध्याचा कोरोना चा काळ आसून या काळामध्ये आजपर्यंत आपण आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली आहे यापुढे सुद्धा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून आपण स्वतः आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे असे सौ.वर्षाताई भोसीकर यांनी आवाहन केले व शेख तरनुम ला भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सौ. राजश्री शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. शामा पाटील यांनी केले.