कुरुळ्यातील समस्या निराकरणासाठी प्रशासनाचा पुढाकार..;कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी घेतला प्रत्यक्ष भेटीतून आढावा.

कुरुळा ; विठ्ठल चिवडे

आपल्या वेगवेगळ्या कार्यशैलीतून आणि प्रशासन आपल्या गावी या बहुचर्चित अभिनव उपक्रमातून सर्वांच्या सुपरिचित बनलेले कंधार तहसीलचे तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी ता.१२ रोजी कुरुळा गावास प्रत्यक्ष भेट देऊन विविध समस्या जाणून घेत स्वतः पुढाकार घेतला असून निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचनाही केल्या आहेत.

कुरुळा गाव आणि समस्या अस जुनंच समीकरण आहे.त्यातल्या त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तर समस्यांचे माहेरघरच आहे की काय? असा प्रश्न नेहमीच भेट देणाऱ्यांना पडतो.विविध समस्यांनी नेहमीच चर्चेत असलेले कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा एकदा पायाभूत सुविधांअभावी चर्चेत आले असून इमारतीत प्रवेश करताच प्रांगणात वृक्षाविना उजाड आणि मोकळ्या जागेला सामोरे जावे लागते.तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधाची वानवा आहे.निवासस्थानांची होणारी पडझड पाण्याची टंचाई यासम अनेक समस्या निदर्शनास येत आहेत. ही गंभीर बाब तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी पाहताक्षणीच उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण जाधव आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान तात्काळ दुरुस्त करून पाण्यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच कमी पाण्यावर वाढणारे कडुनिंब,वड,पिंपळ,करंजी यासारख्या वृक्षांची ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन लागवड करावी,कोरोना लसीकरण संदर्भात डॉ.प्रवीण जाधव यांचे विशेष कौतुक करत जनजागृतीसाठी परिश्रम घ्यावेत आशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी उपसरपंच शिवदर्शन चिवडे,ग्रा.प.स.बालाजी पवळे,बळवंत मरशिवणे,शिवराज मरशिवणे यासह इतर प्रशासकिय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *