हा हा म्हणता एक वर्ष निघून गेलं. तरी सर्वजण तोंड लपवूनच ठेवलाव. तोंडाला मुगसं घालून चोरावणी फिरूलालाव. सरळ सरळ तर कोणालाचं ओळखणा गेलाव मग कोणाच्या डोक्याच्या अकारावरून तर कोणाच्या केश रचनेवरून तर कोणाच्या कपाळावरून तर कोणाची शरिर ठेवण पाहून एकमेकाला ओळखूलालाव, बोलूलालाव. पण बोलायच्या वेळी बी भीती वाटूलालीच की. उगीच आपण बोलणऱ्याच्या तोंडाकडं पाहूवाहू बोलूलालाव. हसुलालाव पण बोलताना त्यांनं त्याच्या तोंडावरचं मुगसं काढू नये म्हणून मनातल्या मनात देव बाप्पाल प्रार्थना बी करताव व करूलालाव. खरं सांगा राव असं आपण सर्वच करू लालाव की नाही. तसं नाही केलं तर आपुण संकटात सापडू. आजूबाजूला कोणी शिंकलं, जरासाबी खोकलला की समोरच्याचं थोबाड बघण्या सारखा होवूलालय. बाहेर फिरणारा गडी घरी हेंडागा लावू नये म्हणून घरचे बी परेशान रहातात व परेशान हातं.
निसर्ग लई भरभरून दिलय या मानसाच्या जातीला. लई उपकार हातं या निसर्गाचं आपुल्यावर. हा माणुस फक्त घेण्याचं शिकल्लय पण परत देण्याचं, परतफेड करण्याचं मात्र चक्क इसरूनच गेलं की. निसर्ग जितका भरभरून देतो. मानव जातीचं कल्याण करू पाहातो त्या प्रमाण आपुण निसर्गाला काही बी दिलो नाही. फक्त घेवून फस्त करनं व घाण करणं येवढचं चालू हाय आपलं काम. निसर्गही आता ठरवून ठेवूलालय. ठरवूनच देवूलालय. तो आपुलाला सांगूलालाय ये मानवा म्या तुला लई भरभरून देवूलालो त्याबदल्यात तू माझं फक्त थोडसं रक्षण कर. चार झाडं लाव. माझ्या चिमणी पाखरांचं रक्षण कर. माझ्या उघड्या नागड्या पडलेल्या टेकड्याला, पर्वताला हिरवेगार कर की मी तुलाबी हराभरा ठेवीन, सुखी ठेवीन. दे आणि घेरे बाबा. दुसरं काय बी नको .
पण ऐकतो कोण? सगळेच येथे बुद्धीवान आपण. निसर्ग गेलं खड्यात. निसर्ग किती दिवस सहन करेल तुमी बी इचार करा की. त्यानं त्याचं रौद्र रूप दाखविण्यास सुरवात केलीय बगा आता. कोणी घ्या चक्रीवादळ. कोणी घ्या उंच उंच समुद्राचा लाटा….., कोणी घ्या नदिचा महापूर…., कोणी घ्या अतिवृष्टी.. कोणी घ्या बर्फवृष्टी.. तर कोणी घ्या दुष्काळ… कोणी घ्या घात.. कोणी घ्या अपघात…तरी हा मतलबी माणुस निसर्गाच्या समोर वाकनाच गेलय की. लईच बेरकी हाव आपण.
म्हणून तर हा निसर्ग जरासं त्याचं गोजिरवाणं रुपडं बदलू पहातोय. आपल्याला धडा शिकवू पहातोय. निसर्ग सगळ्यालाच सांगूलालय “बघ मानवा घेत जा व परत करत जा. थोडंसं शिक” पण आपण मठ्ठच की. म्हणून त्याने कोरोनाचं रूप धारण केलय. आपल्याला तोंड बांधून फिरण्याची शिक्षा देवूलालाय. तरी आपण सुदरत नाही. कधी या मानवाला बुद्धी सुचेल व तो वाटेवर येईल म्हणून निसर्गानेच पुन्हा लस तयार करण्याची बुद्धी आपणास दिलीय व लस तयार करण्यास सांगितली. मग हूशार मानवाने कोविड-१९ लस बी तयार केली.
लस घेताना बी भीती. लस घेवून काही माझं बरं वाईट झाल तर? म्हणून मग लस घेण्यावरून राजकारण आगोदर त्यांनां द्या. मग यांना द्या. व त्यांना काही झालं नाही तर मला द्या. या वादात सर्वच आले. दिल्लीच्या मोठ्या राजकारण्यापासून ग्रामपंचायत सदस्या पर्यंत सर्वच आले. मरणाची लई भीती सगळ्यांनाच वाटतेया. पण आपल्याला परतीचं तिकिट तर जन्माबरोबरचं मिळालय की पण आपुण लई भीताव राव मरणाला. मग असचं चालू द्या की. मरणाची भीती नेहमीच ठेवा . माणसाला मरणाची भीती जर नेहमी वाटत असलं तर तो कुकर्म तर करणार नाही. हेंडगा लावत गावात इकडं तिकडं फिरणार तर नाही. म्हणून मरणाची आठवण सगळ्यांनीच ठेवावी.
आता मी बी तुमच्यातल्याच हाव की. मला बी मरणाची लई भीती वाटतेया. दिल्ली पासून गल्ली पर्यंत असचं वाटत असेल नाही का ? मरणाच्या भीतीने मी लस घेवू नये असेच मला बी वाटत होतं . म्हणून मी या”मुंगसं बांधून फिरणाऱ्या” रोगाची लस घेतलो नाही . पण माझ्या मनात बी येवूलालतं आपुण लस घ्यावं. प्रथम मी आपल्या ओळखीचं कोण कोण लस घेतय हेच पाहिलोय. कंधारचे आदरणीय नारायणराव बनसोडे दादा, मुख्याध्यापक अनिल वट्टमवार यांनी लस घेतली. मी दोघांनाही बोलू बोलू विचारलाव कायकाय होतंय खरंखरं सांगा म्हणून. त्यांनी मला म्हणाले भीयायचं नाही लस घ्यायचं. म्या बी फक्का इचार केलो लस घेण्याच. पण पुन्हा आदरणीय गोविंदराव आवचार सरांना बी मी विचारलाव. सर्व जण होवू दया म्हणाले. मी पुन्हा इतर चारचौघाला इचारलो. व काळीज घट्ट करून मनाला हट्ट म्हणत विष्णुपूरीच्या दवाखाण्यात एकदाचं पोहचलो. तेथे लईच गर्दी होती. बरीच मंडळी तेथे लस घेण्यासाठी जमा झालेली होती.
मी इचार करू लागलो यात तर कोणी कोरोना रोगी नसेल? करायलो एक अन होईल दुसरच; पण मी दुसऱ्याशी अंतर राखत एकदाचं नाव नोंदनी करतात तेथे गेलो. माझा मुलगा सोबत होता. तो म्हणला “बाबा तुम्ही बसा.मी नाव नोंदवतो की तुमचं.” माझं अधार कार्ड घेऊन त्यानं नाव नोंदवलं बरं. म्या एका खुर्ची वर जाऊन बसलो. पण मला लई म्हणजे लईच भिती वाटत होती. उगीच वाटत होतं लस घेतल्या नंतर काही…. तेवढ्यात माझा मुलगा म्हणाला, “बाबा या नंबर आला.” मी आत गेलो. एका टेबल जवळ दोन तीन जण बसले होते. ते बी कायी बायी लिहीत बसलेले होते. मी त्यांना विचारलो, “साहेब लस द्या की” त्यापैकी एकजण बोलला, “काका आत मध्ये जा. काळजात धस्स झालं. काळजाची लई धडधड वाडली होती. हातापायाला कापरं सुटलं होतं. माझ्या मुलाने मला आत नेलं. तेथे दोन सिस्टर थांबल्या होत्या. मला त्यापैकी एक ताई बोलल्या,”काका बसा”. मी आज्ञाधारक विद्यार्थ्या प्रमाणे त्यांनी दाखविलेल्या खुर्ची वर बसलो. तिरप्या नजरेने एकदा लसीच्या सुई कडे पाहिलो. तेवढ्यात लस देणारी ताई म्हणाली , “काका हात ढिलं सोडा”. मी पटकन हात ढिलं सोडलं माऊलीनं इतकं हळूवार पणे लस टोचलं की मला ते कळालं बी नाही. मी विचारलो ताई लस दिली का हो.” ती म्हणाली, “हो काका. आता आठ्ठावीस दिवसाने या परत पुन्हा एकदा लस घ्यावी लागते.”
कोविड-१९ लस घेताना अजीबात मला त्रास झाला नाही. तुम्हाला ही होणार नाही.
लस घेतल्या नंतर फारसा त्रास होत नाही. आंग गरम झाल्या सारखे वाटते. डोके दुखते. सुस्ती, आंग जड पडल्या सारखे वाटते. पण देवदुतानी सांगितलेली गोळी घेतली की आंगातील ताप, डोके दुखी, आंग दुखी कसं सगळचं पळून जाते बगा. लस सुरक्षित आहे . कोविड-१९ लस घ्या सुरक्षित व्हा. इतरांना सुरक्षित करा. घरातील सर्वाची काळजी घेताना . तुम्ही ही सुरक्षित रहा.
कोरोनाचे नियम पाळा. कोरानाला पळवा.
राठोड मोतीराम रुपसिंग
” गोमती सावली ” काळेश्वर नगर विष्णुपूरी, नांदेड-६
९९२२६५२४o७.