२६ मार्च, डॉ. यशवंत मनोहर यांचा जन्मदिवस!

उर्जेचे वेल्हाळ लपेटून घेऊन अधिकाधिक जगण्याच्या आणि सतत लिहिण्याच्या अनेकोत्तम मंगल कामना!!!


आंबेडकरी साहित्य चळवळीतील बापमाणूस : यशवंत मनोहर

  डॉ. यशवंत मनोहर हे आजच्या सांस्कृतिक आणि साहित्यविषयक जीवनातील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आदिबंध आंबेडकरी कुटुंबाच्या संदर्भात जडवादी असेच आहेत. त्यांचे आयुष्य एखाद्या खुल्या विद्यापीठासारखे आहे. या विद्यापीठाची सौंदर्यवर्धक भाषा त्यांचीच आणि विज्ञानही. विज्ञानवाद, इहवाद, बुद्धीप्रामाण्यवाद हा त्यांचा स्थायीभाव. या त्यांच्या जगण्याच्याच कायम भूमिका. आंबेडकरी निष्ठा हा त्यांचा श्वास. आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी आपल्या भूमिकेशी कधीच प्रतारणा केली नाही.‌ त्यांचा स्वभाव हळवा तसा मिश्किल आणि रागीट तसा तटस्थही. खिलाडूवृत्ती हाही एक महत्त्वाचा गुणधर्म. त्यांच्या स्वभावातील वैविध्यामुळे अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले. आपण सर्वचजण आंबेडकरी कुटुंबाचे सदस्य आहोत, हे ते आवर्जून सांगतात. त्यांनी आंबेडकरवादी साहित्य संकल्पनेला जन्म दिला. नवे सौंदर्यशास्त्र निर्मिले. साहित्यशास्राची स्थापना केली. नवनव्या शब्दांच्या विशालकाय घराचे बांधकाम त्यांनी केले.

हे शब्द त्यांच्या कुटुंबियांसाठीच असतात. ज्यावर त्यांच्या या घरातल्या खाणाऱ्यांची तोंडे अवलंबूनच असतात.‌ एकदा त्यांच्या सर्जनशील मेंदूतून एखादा विचार, शब्द बाहेर पडला की तो त्यांचा नसतोच. तो कुटुंबाचा होतो. वैश्विक होतो. म्हणूनच यशवंत मनोहर यांचे समग्र साहित्य हे ‘मनोहरी साहित्य’ म्हणून उदयाला आलेले आहे. ते नावाप्रमाणे मनोहरी नसले तरी क्रांतदर्शी नक्कीच आहे. सरांच्या साहित्यविश्वातील शब्दसेवनानंतर नव्याने जन्माला आलेले साहित्यिक, विचारवंत हे आंबेडकरी साहित्य, संस्कृती, विचार, भूमिका आणि मनोहरी साहित्याचे सौंदर्यवर्धक रुप घेऊनच लेखन करतांना दिसतात.‌ आता ह्या कुटुंबातील खाणारी तोंडे ही उजेडाचा वारस पेरणारी महाशस्रे होतात.

      यशवंत मनोहर हे आमच्या आंबेडकरी साहित्य चळवळीचे नायकच म्हणून शोभतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या आयुष्याशी संबंधित तत्वज्ञान समजून घ्यावे लागेल. हे तत्वज्ञान बुद्धवादाशी आणि आंबेडकरवादाशी संबंधितच आहे.‌ बहिणींनो आणि भावांनो अशी प्रारंभमांडणी करणाऱ्या प्रज्ञाशील युगसाक्षी प्रतिभेला तत्वज्ञानी कुटुंबाचे नायकत्व विनासायास प्राप्त झालेले नाही. त्यांनी शब्दांची निर्मिती केली आणि अनेकजण त्यांच्या शब्दांवर जीवापाड प्रेम करणारे पाईकराव झाले. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यविश्वाच्या विशाल दृष्टीला अनेकांच्या डोळ्यांनी वाचले, जाणून घेतले. अभ्यासले आणि अनुसरले. त्यामुळे त्यांचा असा हा भला मोठा परिवार निर्माण झाला आहे. २६ मार्च १९४३ साली यशवंत मनोहर यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील येरला या छोट्याशा खेडेगावात झाला. इथेच त्यांच्या आणि या परिवाराचा मूळारंभ झाला. या गावात सर ज्या समुहाचे प्रतिनिधी होते ती गावाबाहेरची वस्ती दारिद्र्याच्या खाणाखुणांनी झाकोळलेलीच होती. गावगाड्यातील अस्पृश्यतेच्या उन्हाळझळांनी होरपळत असतांना आणि सामाजिक जीवन वर्णव्यवस्थेने ओरबाडले जात असताना मनोहर कुटुंबाला एका नव्याच सौंदर्याने झपाटले होते. याच गावातील राजाराम मनोहर नावाच्या सद्गृहस्थाने अशिक्षित असूनही सर्वात आधी बाबासाहेब डोक्यात घेतलेला होता. ज्यांच्या पोटी शेवटचा पूत्र जन्माला आला तो यशवंत मनोहर त्याचे नाव यशवंत ठेवले गेले ही काही साधी बाब नव्हती. नाहीतरी त्यांच्यानंतरच्या कित्येक पिढ्यांवर देववादाचा आणि दैववादांचा किती पगडा आहे आणि तो अजूनही दिसतोच आहे, हे इथे लक्षात घ्यावे लागेल. सरांच्या नावातही उत्क्रांती झालेली आहे. गावातल्या दफ्तरावरुन यश इतकीच नोंद असलेली दिसते. शाळेत त्यावेळच्या खरबडे गुरुजींनी यशवंत अशी नोंद केली. गावातले लोक त्यांना यसोंता किंवा वसंता म्हणत असत. मग पुढे यश- यशा- यसोंता आणि यशवंत हीच ती उत्क्रांती होय.‌

                सर्वात शेवटी जन्माला आलेले शेंडेफळ यशवंत मनोहर ही मुलगी व्हावी म्हणून आईची इच्छा होती. सर दिसायला सुंदर आणि तोंडावळ्याने मातृमुखी जन्माला आले पण मुलगा झाले म्हणून आई दु:खी होती. हा मुलगा मरावा म्हणून ती या बाळाला पाजत नव्हती. जगण्याचा खरा संघर्ष इथूनच सुरुवात झालेला आहे. शाळेत न जाणारा पोऱ्या म्हणून त्यांची ओळख होती. शाळेत जाणे आणि मारकुट्या मास्तरांचा मार खाणे यापेक्षा शाळा टाळून गावभर उनाडक्या करणे किंवा शेतावर जाणे हे कधीही चांगले वाटायचे. शाळेत जाण्याबाबत अनेकवेळा वडिलांनी त्यांना बदडून काढले आहे.  यशवंताने शाळा शिकावी आणि खूप खूप शिक्षण घेऊन बाबासाहेबांसारखं मोठं व्हावं असं राजाराम मनोहरांना वाटत होतं. त्यासाठी एक ऐतिहासिक घटना घडली होती. सरांचे दोन भाऊ रेल्वेत गँगमन होते.‌ त्यांचा दुरवरच्या इतर गँगमनशी नेहमीच संबंध यायचा. गावालगत रेल्वे असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या सरांच्या कुटुंबात रेल्वेनेच बाबासाहेबांच्या चळवळीची वाहतूक केली. त्यावेळी गँगमनच्या समुहात बाबासाहेबांच्या चळवळीची चर्चा व्हायच्या.‌ त्यांच्या या अशिक्षित भावांनी येरल्यात १९४७ च्या आसपास बाबासाहेबांचा निळा झेंडा अंगणात रोवला. गावात जयंती साजरी होऊ लागली. जयंतीनिमित्त छोट्या-मोठ्या सभा व्हायला लागल्या. घरात जनता हे पत्र येत‌ असे, पुढे प्रबुद्ध भारत. त्यांचे हे अशिक्षित पण चळवळे भाऊ शिकलेल्या भावांकडून हे पत्र वाचून घेत असत. अशा पद्धतीने भावांसकट वडिलांच्या डोक्यातही बाबासाहेब शिरले होते. या काळाचा विचार करता तुलनेने महाराष्ट्रात सर्वदूर अजूनही बाबासाहेब पोहचलेही नव्हते. बाबासाहेबांची 'शिका' हीच चळवळ आता यशवंताच्या मागे लागली. सोलापुरी चादरीत गुंडाळून येरल्याच्या जनपद शाळेत आणून आपटल्यानंतरच शिक्षणाच्या संघर्षमय प्रवासास प्रारंभ झाला होता. शाळेची आणि शिकण्याची मूळातच नावड असलेला यशवंता चौथ्या वर्गात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला तेव्हा शाळेच्या खरबडे गुरुजींनी 'याले शिकवा, राजेरामजी. हा फार पुढे जाईल!' असे भाकीत वर्तवून बापाच्या डोक्यात तेलच ओतले होते. काटोलच्या सरकारी शाळेतला आठवीपर्यंतचा शैक्षणिक प्रवास खडतरच होता. पुढे बी. आर. हायस्कूलमधील मॅट्रीक आणि बाबासाहेबांच्या मिलिंद महाविद्यालयातील प्रवेश हा एकंदरीत प्रवास विलक्षणच होता. 

     काटोलच्या शाळेत त्यांनी पहिली कविता लिहिली होती. त्यापुर्वीही सरांनी काही गाणी लिहिली होती. त्या सर्व गाण्यांना चळवळीचाच संदर्भ होता. त्यांचे थोरले भाऊ ती गाणी म्हणत असत. सर हार्मोनियम वाजवत असत आणि दुसरा भाऊ तबला वाजवत असे. सर एक उत्तम चित्रकारही आहेत. आपल्या गाण्यांचे कार्यक्रम त्यांनी त्या काळात गावोगावी फिरून केलेत. ही त्यांच्या काव्यलेखनाची तर सुरुवात होतीच परंतु आंबेडकरी चळवळीचीही सुरुवात होती. औरंगाबादमध्ये शिकतांना उपासतापास काढले. विद्यापिठाने नोकरीनिमित्त डावलल्याच्या घावाने खूप काळ सोबत केली. समरसतेवर आणि सामाजिक समरसता मंचाच्या उद्घाटनावर प्रखर लेखन केले म्हणून औरंगाबादच्या कोर्टात केलेला अब्रुनुकसानीचा दावा तीन-चार वर्षे चालला होता. त्यात वेळ, पैसा गेला आणि मनस्तापही झाला असला तरी आंबेडकरवादी साहित्यातून समरसता तडीपार झाली. या निमित्ताने सामाजिक समरसतेवर त्यांनी तीव्र हल्ले केले आणि छुप्या सामाजिक समरसतावाद्यांचे बुरखे टराटरा फाडले. पँथरच्या चळवळीत सरांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली. एक गाव एक पाणवठा या मोहिमेसाठी उन्हातान्हात दिवसदिवसभर बाहेरगावी, खेडोपाडी फिरुन जीवाचे रान केले. नामांतराच्या चळवळीत नागपुरात मोर्चा काढला. बाबरी मशीद पाडली तेव्हा सरांच्या नेतृत्वाखाली बुद्धिजीवींचा मूक मोर्चा निघाला होता. सावनेरच्या चर्चवर हल्ला झाला तेव्हा तिथे ते दोनदा गेले होते. सभा घेतल्या. लक्ष्मण माने यांच्या धम्मस्वीकार चळवळीचत सक्रीय सहभागी होते. १९८४ ते १९९६ या काळात 'समुचित त्रैमासिक' या नियतकालिकातून एक समयोचित चळवळ चालविली. व्याख्याने देऊन, लेखनाद्वारे आणि लोकांमध्ये कार्य करुन समाजप्रबोधनाचे काम केले. सामाजिक समता समिती, संविधान बचाव समिती अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सामाजिक कार्य केले. आजपर्यंत १३ कवितासंग्रह, २१ वैचारिक पुस्तके, २१ पुस्तिका , २३ समीक्षा ग्रंथ, प्रवासवर्णन, कादंबरी लेखन, ललित लेखन इत्यादी साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. अनेक गौरव ग्रंथ व सरांच्या साहित्यावरील अनेक समीक्षा ग्रंथही प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्या साहित्यातून समग्र आंबेडकरी चळवळच त्यांनी उभी केली आहे. म्हणूनच आंबेडकरी साहित्य चळवळीच्या कुटुंबाचे प्रमुखपद त्यांच्याकडेच जाते.

       एवढेच नव्हे तर जवळपास वेगवेगळ्या चाळीस संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. तर २१ संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. यातून आंबेडकरी चळवळीची प्रमुख विचारधारा पेरण्याचे काम त्यांनी केले आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेची निर्मिती आणि आंबेडकरी विचारवेध संमेलने यांच्या माध्यमातून आंबेडकरी निष्ठा घेऊन भारताच्या भूमीवर मोठ्या मनाने आणि मानाने उभे राहण्याची त्यांची ही एक भूमिका. या संमेलनाच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहतात. यातील पहिल्याच संमेलनात साहित्यिकांच्या प्रतिभा स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला. संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळ भारतभर निर्माण व्हावी अशी त्यांची व्यापक भूमिका आहे. शिवराय ते भीमराय अशी वैचारिक जोडणी त्यांनी केलेली आहे. बुद्धाच्या नीतीसौंदर्याच्या सिद्धांताबरोबरच मानवी न्यायाचा इहवादी सौंदर्यसिद्धांतही त्यांनी मांडला आहे. त्यामुळे रक्ताच्या गोतावळ्यापेक्षा वैचारिक नातेसंबंधांचा गोतावळा फार मोठा झालेला आहे. डॉ. अक्रम पठाण, डॉ. प्रकाश राठोड, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. इंदिरा आठवले, डॉ. भूषण रामटेके, डॉ. अनमोल शेंडे, डॉ. विशाखा कांबळे, डॉ. मंगला कांबळे, डॉ. उज्वला वंजारी, वंदना महाजन, सुनीता झाडे यांसारखे असंख्य मुले-मुली या त्यांच्या परिवारात आहेत.  हेच त्यांचे भले थोरले कुटुंब आहे. घरात जसे ते कुटुंबवत्सल आहेत तसेच या गोतावळ्याचे कुटुंबनायक म्हणून ते फार प्रेमळ आहेत. सर्वच स्तरांतून महाराष्ट्रही त्यांच्यावर प्रेम करतो. आदर बाळगून आहे. झपाटून टाकणाऱ्या त्यांच्या अभिजात भाषा सौंदर्यावर एकूणच त्यांच्या लेखनावर जीव टाकणारे असंख्य वाचक आहेत. सरांनी त्यांच्या साहित्यातून यातनांना, उपेक्षेला, अपमानांना, गळ्यातील हंबरड्यांना आणि डोळ्यातील आसवांनाही सर्जनशील बनवले. त्यांनी वाचकांपुढे जीवनाचे काटेही मांडले आणि फुलेही मांडली. वाचकांची संवेदनशीलता बदलणारे, जीवनासंबंधीचे जबाबदारीचे भान जागवणारे लेखन केले. प्रतिकूलतेविरुद्ध जो संघर्ष केला त्या संघर्षातूनच सर विनम्र झाले आहेत.‌ या विनम्रपणानेच त्यांना बाणेदारपणापासून वा मूल्यनिष्ठेपासून कधीही ढळू दिले नाही.‌ नुकतेच घडलेले सरस्वती प्रकरण उभ्या महाराष्ट्राला माहितीच आहे. ते तडजोडवादीही नाहीत आणि अहंकारीही नाहीत.‌ हस्तीदंती मनोऱ्यात बसून कल्पनेचे इमले बांधणाऱ्यांपैकी ते नाहीत तर रस्त्यावर उतरून वर्तमानाला जाब विचारणाऱ्या साहित्यिकांपैकी एक ते आहेत. 

        यशवंत मनोहर हे आंबेडकरी साहित्याचे जनक आहेत. दलित साहित्य चळवळीने एकूणच मराठी साहित्याला नवी दिशा दिली. नवे शब्द दिले. नव्या पिढीची क्रांतिकारक मानसिकता घडविण्याचे, अन्याय, अत्याचार, विषमता यांविरुद्ध लढण्याचे बळ दिले. परंतु या बळामागे केवळ आंबेडकरवाद आहे हे टाळल्या जाऊ लागले. आंबेडकरी जाणिवेचा लवलेशही नाही ते साहित्य दलित साहित्य म्हणून पुढे येऊ लागले. साहित्यिक स्वत:ला दलित साहित्यिक म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागले. अशा परिस्थितीत दलित साहित्याची आंबेडकरवादी साहित्य अशा नामकरणाची मांडणी पहिल्यांदाच त्यांनी केली. दलित आत्मकथनाला 'आंबेडकरवादी स्वकथन' ही संज्ञाही त्यांनीच दिली. आज हे आंबेडकरवादी साहित्य असे नामांतरण सर्वांनीच स्वीकारले आहे. ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे ते मनोहरी साहित्य परिवाराचेही घटक झाले. आपोआपच हे जनकत्व त्यांना लाभले आहे, हे आपण पाहतोच आहोत. कविता लिहिण्याबाबतही त्यांचे ठाम मत आहे. आपण आंबेडकरी कविता लिहितो म्हणजे काय लिहितो? हस्तक्षेप आणि पर्याय लिहितो. नवनव्याने उगवण्यासाठीची कृती लिहितो.‌ माणूस म्हणून स्वतःचे काही निर्माण करण्याची प्रक्रिया लिहितो. सम्यक होण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा निर्धार लिहितो.‌  कुरुपता स्पष्ट करणारा आणि नष्ट करणारा कार्यक्रम लिहितो.‌ दडपलेल्या, चिरडलेल्या आवाजांसाठी मुक्तीचा प्रबंध लिहितो. माणूस म्हणून परिपूर्णतेने जगू पाहण्याचा प्रयोग लिहितो. हाच संदेश त्यांनी त्यांच्या असंख्य कवितांमधून दिलेला आहे. ते आंबेडकरी साहित्यिकांना जबाबदारीची जाणीव करून देतात.‌ अंधाराला सूर्य शिकवणाऱ्या उजेडाचे साहित्य निर्माण करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. त्याचप्रमाणे समाजात समता आणि न्याय यासाठी चाललेल्या संघर्षाशीही आपले नाते प्रस्थापित केले पाहिजे. आपले साहित्यनिर्मिती ही सुद्धा नव्या जीवनाच्या निर्मितीचेच एक अंग आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

         यशवंत मनोहर यांना अनेक पुरस्कार आणि मान - सन्मान लाभले आहेत. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांतील अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे. विविध विषयांवरील व्याख्यानमाला, चर्चासत्रात सहभाग नोंदविला आहे. मनोहरांच्या साहित्यावरील आठ प्रबंधांना पीएचडी मिळाली आहे. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली वीस जण पीएचडी प्राप्त संशोधक आहेत.  पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते अलिकडच्या प्रशांत वंजारे यांच्यापर्यंत कैकजणांनी सरांच्या साहित्याची समीक्षा केली आहे. एक कवी, समीक्षक, विचारवंत आणि वक्ता म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांची ओळख आहे. अशा जुन्या जाणत्या ख्यातकीर्त आंबेडकरी विचारवंतांने विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आणि साहित्य वर्तुळात खळबळ उडाली. अनेक मते आणि मतांतरे पहायला आणि ऐकायला मिळाली.‌ अनेकजणांनी सरांच्या भूमिकेचे समर्थनच केले. काहीजणांचे पुरोगामी मुखवटेच गळून पडले. तुम्ही नेमके कुणाच्या बाजूचे आहात हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उभा राहिला होता. त्यांनी फारच दैदिप्यमान आणि उदात्त धोरण ठेवून आणि सर्वहिताय मांगल्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पुरस्कार स्वीकारला असता तर काय झाले असते? त्यांच्या कुटुंबाचे काय झाले असते?  तो पुरस्कार स्वत:साठी नव्हे तर त्यांनी तो आपल्या वैचारिक परिवारासाठी नाकारला. तसे झाले नसते तर आपणच आयुष्यभर बाळगलेल्या, जपलेल्या निष्ठांची अत्यंत निर्दयपणे हत्या झाली असती.  त्यांना खरे तर राज्यशासनासह विविध साहित्य संस्था, सामाजिक संस्थांकडून भरगच्च पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना कुठल्याही पुरस्काराची आवश्यकता नाही. कारण ते स्वतःच एक जिवंत पुरस्कार आहेत. हा पुरस्कार मिळविण्याची कितीही पराकाष्ठा केली तरी तो मिळत नाही. आयुष्याचं एकव्रत्ती झिजणं हीच या पुरस्कारासाठीची पात्रता आहे. हा पुरस्कार सरांचे वैचारिक वारसदार योग्य व्यक्तींना प्रदान करण्याची परंपरा निर्माण करतील.

      १९६७ ते २००३ पर्यंत मनोहरांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यामुळे साहित्यिकांसमोरल जळत्या प्रश्नांबरोबरच अध्यापकांपुढील जळत्या प्रश्नांचीही त्यांना जाण आहे. त्यांनी हयातभर समकालीन प्रश्नांवरही भाष्य केले.‌ आजच्या प्रतिभांची जबाबदारी काय आहे यावरची त्यांची भूमिका समजून घेणे इष्ट ठरेल. चळवळीचा वैचारिक प्रवाह नदीच्या पाण्यासारखाच असतो. तो कुणासाठी थांबत नाही.‌ आपल्या जगण्याचे प्रयोजन समजले की जळत्या प्रश्नांचीही आपल्याला जाणीव होते. प्रश्न कधीच संपत नसतात. ते नव्याने पुढे येतात. कोरोनाने काळासमोर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आजचा काळ पिसाळलेला आहे.‌ तेव्हा अशा परिस्थितीत खूप खबरदारीच घेणे आवश्यक असते. त्यांचे आता कुठेही जाणे नाही आणि घरी कोणाला येऊही देणे नाही.‌ ते आपल्या काळजांना सांगतात की, तुम्ही सर्वच जपा परस्परांना. काळजी घ्या काळजीपूर्वक. काळजीच मग स्वतः काळजी घेणारांची काळजी घेते.  मुलांना घराबाहेर अजिबात पडू देऊ नका! असा जिव्हाळ्याचा सल्ला ते देतात. अकालीच चळवळीतील अनेक महनीय माणसं कायमची निघून गेली; जाताहेत. सरांची या सर्वच बाबतीत काळजी वाटते. २६ मार्च हा त्यांचा वाढदिवस. सरांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात त्यांच्याच घरी दिवसभर चालणारा 'काव्यपौर्णिमा' हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आजही नांदेड शहरात दर महिन्याच्या पौर्णिमेला 'काव्यपौर्णिमा' हा कार्यक्रम आयोजित केला जातो. सर्वत्र त्यांचे चाहते आहेत.‌ महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातही त्यांचे साहित्य पोहोचले आहे.‌ त्यांना मानणारा गोतावळाच निर्माण झाला आहे. नुकताच 'अग्निपरीक्षेचे वेळापत्रक' हा त्यांचा तेरावा काव्यग्रंथ वाचकांच्या भेटीला आला आहे. वयाच्या ७८ व्या वर्षीही ते लिहित आहेत. साहित्याची न थांबणारी चळवळ ते चालवत आहेत. आता त्यांनी रससिद्धांत, लयसिद्धांत, मानुषतेचा सौंदर्यसिद्धांत, देशीवादाचा सिद्धांत पूर्णतः खोडून काढण्याच्या आणि सर्वहिताय सौंदर्यसिद्धांताची उभारणी करण्याच्या कामात त्यांनी स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले आहे. त्यांनी यापुढेही खूप खूप लिहावं.‌ आमच्यासाठी लिहावं, त्यासाठी स्वत:ला जपावं अशी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. 


   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *