केंद्र सरकारच्या वतीने 14 एप्रिल हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर; भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती समारोह

दिल्ली,:येत्या 14 एप्रिलला भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुटी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे.

डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 14 एप्रिल, 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, 1881 च्या सेक्शन 25 च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्र सराकरने देखील गेल्या वर्षी 14 एप्रिल हा राष्ट्रीय हॉलिडे जाहीर केला होता.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता.

प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *