कंधार;प्रतिनिधी
माहेरून ऑटो खरेदीसाठी पैसे आणण्यासाठी नेहमी मारहाण करणाऱ्या पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा दोरी व स्कार्फने गळा आवळून खून केल्याची घटना. ३१ मार्च रोजी दुपारी बहाद्दरपुरा येथे घडली.मयतचे वडील उत्तम मरीबा कांबळे यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीसात गुरुवारी, १ एप्रिल रोजी पतीसह तिघांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.२ एप्रिल रोजी कंधार येथिल न्यायालयात तिन्ही आरोपींना हजर केले असता तिन दिवसाची कोठडी मिळाली आहे.
कंधार तालुक्यातील पानभोसी येथील दुर्गा उत्तम कांबळे (२१) हिचे बहाद्दरपुरा येथील ग्यानोबा नागोराव गायकवाड याच्याशी काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दुर्गाला एक मुलगी आहे. दोन महिन्यांपूर्वी माहेरहुन ऑटोसाठी पैसे घेऊन ये असा तगादा पतीसह सासरच्या मंडळींनी लावला. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता, मारहाणही करण्यात येत असे.
३१ मार्च रोजी दुपारी पती ग्यानोबा नागोराव गायकवाड (२२), सासरा नागोराव ग्यानोबा गायकवाड (४२) आणि दीर गिरीश नागोराव गायकवाड (१९) यांनी संगनमत करून दुर्गाचा दोरी व स्कार्फने गळा आवळून तिचा खून केला. मयताचे वडील उत्तम कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी, १ एप्रिल रोजी कंधार पोलीस ठाण्यात गु.र.न. ९७/ २०२१ कलम ३०२,४९८ (अ) ३४ दाखल करण्यात आला आहे. तसेच तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.उपविभागीय पोलीस आधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.यू. जाधव पुढील तपास करीत असून बिटजमादार टि.व्ही. टाकरस,नामदेव वानरे,सुनिल पत्रे यांनी घटनास्थळी जावून या कामी परीश्रम घेतले असल्याची माहिती ठाणे अंमलदार ए.एस. आय. कागणे व एस.एस.दिंडेवाड यांनी दिली.