वर्षातील एप्रिल महिना हा वर्षातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदोत्सवाचा महिना मानला जातो. ह्याच महिन्यांमध्ये प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. याच प्रज्ञासूर्याच्या तेजाने सारे जग उजळून निघाले. हाच या महानायकाच्या जयंती उत्सवाचा महिना होय. जणू या ज्ञानभास्करा मुळेच एप्रिल महिन्याच सोनं झाल आहे. आणि म्हणून या महिन्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व प्राप्त होते. जसे या महिन्यामध्ये जन्माला येणारं मूल भाग्यवान समजलं जाते. या महिन्यांमधील जन्माचा एक वेगळाच आपणास अभिमान असतो.
अगदी हेच भाग्य घेऊन जन्माला आले ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर ढवळे. पाच एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस. कंधार तालुक्यातील कुरूळा या गावात आयुष्यमती विष्णूबाई व सूर्यकांत ढवळे या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सूर्यकांत ढवळे शिक्षण क्षेत्रात नोकरी असल्यामुळे त्यांचं घराणं सुशिक्षित होते. म्हणून त्यांच्या घरी सुसंस्कृत वातावरण होते. सरांचे वडील आंबेडकरी विचारांचे. त्यांचे कुटुंब बुद्धाची विचारधारा जोपासना करणारे. मुळात कुरूळा हे गाव धम्म चळवळीचे एक केंद्र आहे. त्यामुळे लहानपणापासून त्यांच्यावर या विचारधारेचे संस्कार पडलेले होते. विहारमध्ये जाऊन वंदना घेणे, जयंती उत्सवात सहभाग घेणे, भाषण कला, काव्यगायन सुप्त गुण त्यांनी लहानपणापासूनच अंगिकारली.
त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल कुरूळा येथे झाले, तर पुढील शिक्षणासाठी ते अहमदपूर या ठिकाणी गेले. आणि पुढे आपली जीवनाची सुरुवात शिक्षकी पेशाने केली. शिक्षक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. तसाच तो समाजाचा अभियंताही असतो. ग्रामीण भागात त्यांचे बालपण गेल्यामूळे समाजातील चालीरीती, रुढी परंपरा यांचा जवळून संबंध आला. आणि ह्याच उनीवा भरुन काढण्याची त्यांना भावी संधी मिळाली. देशाचा आदर्श नागरिक घडविण्याचा मार्ग सापडला. त्यामुळे येथूनच त्यांच्या समाज कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. समाजाचा आणि त्यांचा एकदम जवळचा संबंध आला. समाजातील विषमता, विकृती, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा या गोष्टी त्यांच्या मनाने टिपल्या. काही काळ त्यांनी बामसेफमध्ये काम केले. ही एक कर्मचाऱ्यांची संघटना.त्यातून संघटन, प्रबोधन ,कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.हे नेटाने त्यांनी कार्य केले.
पुढे शाळेत अध्यापन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला. त्यांनी शाळा स्तरावर बालसाहित्य संमेलन आयोजित केली. त्यात विद्यार्थ्यांना व्यासपीठ तयार करून दिले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला. विविध उपक्रम राबवून शाळेचे नाव उंचीवर नेऊन ठेवले. यामुळेच आजही पालकांमध्ये त्यांची लोकप्रियतेची छबी उठून दिसते. यातूनच त्यांच्या मधील साहित्यिक जन्माला येऊ लागला. सुयोग असा झाला की त्यांच्या सहचारिणी पंचफुला ढवळे ह्या शिक्षिका असून त्याही कवयित्री आहेत. असं म्हणतात की, प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते. हे नक्कीच. आणि म्हणूनच की काय ढवळे सरांचा ‘साहित्यरथ’ हा गतिमान झाला. त्यांची लेखणी समाज मनाचा ठाव घेऊ लागली. समाजाच दुःख, समाजातील उणीवा , जातिभेदाच्या भिंती , समाजातील अंधश्रद्धा, विषमता, शिक्षणाविषयी जागृती,वर्तमानातील भेडसावणाऱ्या समस्या आणि सोबतच आंबेडकरी विचारांची धुरा पाठीशी घेवून त्याची लेखणी तलवारीच्या पात्या सारखी तळपत होती आणि अन्यायावर विद्रोही प्रहारकरुन गतिमान होत होती.तर आजही प्रतिभावंत शब्द वाचकांना भुरळ पाडत आहेत.
सरांनी विविध स्तरावर संमेलन आयोजित केले. वेगवेगळ्या संमेलनामध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. नांदेड येथे भरलेल्या अखिल भारतीय आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या आयोजन समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी आपली भूमिका यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमात मोठमोठे साहित्यिक, प्रसिद्ध विचारवंतांनी हजेरी लावली होती. अशी तीन संमेलने त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजित केली आहेत. महात्मा संत कबीर समता परिषद नांदेड तर्फे संमेलनाचे आयोजन करून विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तबगार व्यक्तीसाठी पुरस्काराचे आयोजन करून त्यांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये ही त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. आंबेडकरी साहित्य संवर्धन परिषद, नागपूर या ठिकाणी मोलाची भूमिका बजावली. अक्षरोदय साहित्य मंडळ, आणि सप्तरंगी साहित्य मंडळ नांदेड या मार्फत यांनी आपली ‘काव्यचळवळ’ जनमानसापर्यंत पोहोचली. एवढेच नाहीतर ‘युगसाक्षी’ ऑनलाइन न्यूजचे संपादक म्हणूनही ते काम पाहतात.
नवोदितांसाठी एक व्यासपीठ तयार व्हावे, लेखक ,कवी यांची निर्मिती व्हावी, समाजात प्रबोधन व्हावे, जागृती घडून यावी, यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक पोर्णिमा ही ‘काव्यपौर्णिमा’ म्हणून साजरी केली .आज पर्यंत सतत तिन्ही ऋतूत त्यांनी 39 साजऱ्या केल्या. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी सुद्धा आहे. आणि ते तितकेच अभिनंदनीय आहे. याबरोबरच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही सुरूच असत. हे कार्य ही त्यांची नोंद घेण्यासारखे आहे . आजही भूत, पिशाच आणि आत्मा गोष्टी मानसाला भेडसावत असतात.पण कवी ढवळेंनी यासाठी आगळावेगळा उपक्रम राबवला. आणि स्मशानभूमी मध्ये अमावस्या व पौर्णिमेला रात्री कवी संमेलन आयोजित केले. आणि जनमानसांच्या मनातून भुताकेताची भीती नाहीशी केली.हा त्यांचा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवला,हे विशेष.
कंधार हे तालुक्याचे शहर.या शहराला बौद्धकालीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. येथेच भुईकोट किल्ला आहे. जे कंधार नगरीचे भुषण आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करताना किल्ल्यामध्ये कवी ढवळे सरांनी ‘काव्य दरबाराचे’ आयोजन केले. त्या निमित्ताने काव्य रसिकांना या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्याची संधी प्राप्त झाली. एवढेच नाहीतर संत तुकडोजी महाराज यांची जयंतीसुध्दा या किल्ल्यात साजरी केली. ढवळे सरांचे सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे. सध्याचा कोरोना महामारीचा काळ आहे. पण सरांनी मागील कोरोना काळात लाॅकडॉऊन असताना वीटभट्टीवरील काम थांबलेल्या हातांना मदत आणि भुकेल्यांना घास भरवला. पद्मशाली सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजू लोकांना धान्याचे कीट देऊन मदत केली. उत्तरप्रदेश, बिहार, बाहेर राज्यातून येणारे कामगार त्यांना भरपूर मदत केली. त्यांना धान्य वाटप, जेवन, फळे देवून ‘कोवीड योद्धा’ म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली.
सरांच्या साहित्य प्रवास बद्दल सांगताना त्यांचा काव्य सागर खुप मोठा आहे. तो महाराष्ट्र भर पसरलेला आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील आदर्श म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, ऋषीकेश कांबळे, नामदेव ढसाळ, विनायक ढवळे, प्रशांत वंजारे, अनुरत्न वाघमारे यांचा उल्लेख करता येईल. त्यांचे प्रकाशित असलेले साहित्य ‘प्रित आणि प्रहार’ तसेच ‘अग्नीध्वज’ तसेच संपादकीय,शोधनिबंध, अग्रलेख, ग्रामीण कथा,ललित वर्तमानपत्रातून नेहमी प्रसिद्ध होत असतात..असा अष्टपैलू , बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि शब्द सामर्थ्याची गंगा म्हणजे साहित्यिक गंगाधर ढवळे त्यांच्या तेजस्वी विद्रोही लेखणीला आणि त्यांच्या भावी दिर्घायू आयुष्यासाठी त्यांच्या जन्म दिनी मनस्वी मंगलमय कामना…..
- बाबुराव पाईकराव
डोंगरकडा, ता. कळमनुरी
मो. 9665711514