कुरुळा सर्कल मध्ये ३२ गावांत उघड्यावरच अंत्यसंस्कार.

कुरुळा ; विठ्ठल चिवडे

मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे.मृत्यूने सर्व समस्यातून मुक्तता होते.आयुष्यातल्या सर्व संघर्षाची समाप्ती मरणानंतर होते अशी सर्वसामान्यांची धारणा असते.असे जरी असले तरी कुरुळा सर्कल मध्ये मरणाच्या दुःखापेक्षा सरणाची चिंता अधिक असल्याचे चित्र आहे. मृत्यूनंतरही उपेक्षा कायम असल्याने उघड्यावरच उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

कुरुळा जिल्हा परिषद गटात जवळपास ३२ गावांचा समावेश होतो.काही मोजकी चार दोन गावे वगळली तर आजही अनेक गावात मृत्यूनंतरही यातना भोगाव्या लागतात.मृत्यूचे दुःख तर असतेच परंतु त्याहीपेक्षा वेदनादायी प्रवास हा अंत्यसंस्काराचा असतो असा गावकऱ्यांचा अनुभव.उघड्यावरच अंत्यक्रिया कराव्या लागत असल्याने कुटुंबियासह नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.पावसाळ्यातील अंत्ययात्रा तर अग्निदिव्यच असा येणाऱ्या जाणाऱ्यांचा अनुभव.मरशिवणी,उमरगा,सोमठाणा, पोखर्णी, दैठना,बोळका,वहाद,मोहिजा,महालिंगी,कारतळा,हटक्याळ,हिप्परगा,नंदनशिवणी,हाडोळी,नागलगाव,नेहरूनगर, गुंटूर,गुट्टेवाडी,दिग्रस(बु.) यासह आदी वाडी तांड्यावर स्मशानाची वानवा आहे. कुरुळा आणि दिग्रस ही मोठी लोकसंख्या असलेली गावे असून येथे विशिष्ट समाजाकरिता स्मशानशेडचे बांधकाम झाले आहे परंतु त्यात शवदाहिनी नसल्यामुळे असून खोळंबा अशीच परिस्थिती आहे.कुरुळ्यात सार्वजनिक हिंदू स्मशानभूमीबाबतही पेचप्रसंग उद्भवत असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.इतरही गावात जागेची समस्या उद्भवत असून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतीनी पुढाकार घेणे गरजेचे असून त्याकरिता पाठपुरावा केल्यास प्रशासनाच्या मदतीने हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो.

दिग्रस स्मशानभूमीत उकंड्याचे साम्राज्य:


दिग्रस स्मशानभूमीत शेडबांधकाम तर झाले आहे परंतु शवदाहिनी नसल्यामुळे प्रेतावर शेडच्या बाहेरच अंत्यसंस्कार करावे लागतात.स्मशानभूमीला उकंड्याचे स्वरूप आले असून इथे मोठ्या प्रमाणात नागरी कचरा टाकला जातो यामुळे स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.अंत्ययात्रेस येणाऱ्या नागरिकांना घाणीतूनच मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *