राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन रुग्णवाढीचे आकडे आता ५० हजारांहून अधिक वाढत आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात एक भयाण वास्तवाची जाणीव करुन देणारी एक घटना सात दिवसांपूर्वी घडली आहे. करोनामुळं दगावलेल्या ८ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, अजूनही करोनाचा संसर्ग रोखण्यास शासनाला यश येत नसल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे करोनामुळं १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. यापैकी सात रुग्ण हे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील असून एक रुग्ण सावरगाव कोविड सेंटरमधील आहे. करोनामुळं मृत्यू झालेल्या या ८ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ अंबाजोगाई नगरपालिकेवर आली.
नगरपालिकेच्या पथकानं एकाच रुग्णवाहिकेतून हे आठही मृत्यदेह स्मशानभूमीत आणले. त्यानंतर एकाच सरणावर आठ मृतदेह ठेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या दोन नातेवाईकांना येवेळ पीपीई कीट घालून उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मृतांमध्ये १ महिलेचा समावेश असून इतर रुग्ण ६० वर्षांपुढील होते. कोरोना विषाणू संसर्गाचं भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामुहिक संसर्ग होतोय. अहमदनगरच्या अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. तर, दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अहमदनगर येथील अमरधाममध्ये असच ह्दयद्रावक चित्र समोर आलं असून अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभरात एकुण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आलंय. अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावली. अहमदनगरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे या घटनेपर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. चंद्रपूरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. अशा परिस्थितीमुळे स्मशानभूमीत एकाच वेळी अनेक चिता जळताना दिसत आहेत.
कोरोनाशी दोन हात करताना जी व्यक्ती अखेरचा श्वास घेते ती कुणाचे वडील, कुणाची आई, भाऊ, बहीण किंवा आणखी कोणी जिवलग असते. मात्र, जेव्हा त्यांना स्मशानभूमीत आणले जाते तेव्हा मात्र, तो निव्वळ एक मृतदेह असतो. कारण, एक-दोन नव्हे तर अनेक मृतदेह एकाच वेळी स्मशानभूमीत आणले जात आहेत. अशा परिस्थिती येथे भावनेला स्थान नसते. आणलेल्या मृतदेहांची त्वरित विल्हेवाट लावायची असते. कारण पुन्हा दुसऱ्या मृतादेहांची खेप येथे आणायची असते. ही स्थिती आहे चंद्रपूर शहरातील स्मशानघाटाची. कोरोनाने माणसांपासून मानवी संवेदनाच हिरावून घेतली आहे. आणि आपण यावर काहीही करू शकत नाहीत. चंद्रपूरच्या स्मशानभूमीत दररोज 15 ते 20 मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. सकाळपासून सुरू झालेल्या चितेच्या ज्वाला शमतच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती किती बिकट झाली आहे, याचे हे द्योतक आहे.
स्मशानभूमीत एकाच वेळी अनेक चिता जळताना दिसत आहेतआरोग्य यंत्रणा कोलमडली, मृत्यू वाढले -जेव्हा राज्यभरात कोरोनाचे रूग्ण चिंताजनकरित्या वाढत होते. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र, ही संख्या फक्त दोन आकडी होती. मात्र, राजकीय अनास्था आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेळीच ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. रूग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. तरीही त्यांना बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड देखील मिळेनासे झाले आहेत. बेड नाही म्हणून रूग्णांना चोवीस तास वाहनात बसवून तर गंभीर रूग्णाला उघड्यावर झोपावे लागत आहे. याचा परिणाम म्हणजे मृत्यूदरात अचानक वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे दररोज दोन ते तीन मृत्यू होत होते. आता हीच संख्या सरासरी 15 ते 16 पर्यंत पोचली आहे. भंगारमध्ये निघालेल्या शववाहिका घ्याव्या लागल्या सेवेत – चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत केले जातात. पूर्वी येथे एकाच वेळी सात ते आठ मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. मात्र, अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने एकाच वेळी 20 जणांचा अंत्यविधी उरकता यावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या भंगारमध्ये निघालेल्या शववाहिकेला पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी सेवेत घेण्यात आले आहेत. सध्या मनपाचे 20 कर्मचारी मृतदेहांना हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत घेऊन जाणे, त्यांचा अंत्यविधी उरकता यावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या भंगारमध्ये निघालेल्या शववाहिकेला पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी सेवेत घेण्यात आले आहेत. सध्या मनपाचे 20 कर्मचारी मृतदेहांना हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत घेऊन जाणे, त्यांचा अंत्यसंस्कार करणे, या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
शववाहिकेसाठी काही वेळ ठरवण्यात आला आहे. मृतादेहांची निश्चित संख्या झाल्यावर शववाहिका बोलवली जाते. तत्पूर्वी नातेवाईकांना मृतकांचे अंत्यदर्शन घडवले जाते. कारण स्मशानभूमीत नातेवाईकांना येण्याची परवानगी नाही. एकाच वेळी एका खेपेला शववाहिकेत सात-सात मृतदेह आणले जातात. त्यामुळे स्मशानभूमीत नातेवाईकांना मुभा दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच कोरोनाच्या प्रसाराचा धोकाही वाढतो. केवळ मृताच्या एकाच नातेवाईकाला चिताग्नीजवळ जाण्याची परवानगी आहे. मनपाचे मुकादम हजारे सांगतात की, ते सकाळी स्मशानभूमीत येतात आणि मध्यरात्री घरी जातात. गेल्या काही दिवसांपासून हे नियमीत झाले आहे.
गतवर्षी शिक्रापूर (ता. शिरुर) येथे यापूर्वी प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे एका कोरोना बाधित मृत महिलेचा मृतदेह ४ दिवस रुग्णवाहिकेत पडून असल्याचा प्रकार घडलेला असताना आता चक्क शिक्रापूरमध्ये कोरोना बाधित मृत व्यक्तीचा अंत्यविधी केल्यानंतर मृत व्यक्तीची अंत्यविधी नंतरची शिल्लक असलेली राख व हाडे ४ दिवस तसेच पडून असल्याचे समोर आले होते. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका कोरोना बाधित मृत व्यक्तीचा प्रशासनाकडून शिक्रापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला होता. त्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार केला त्यावेळी ग्रामविकास अधिकारी देखील उपस्थित होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देखील देण्यात आलेली होती. मात्र, त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या कोरोना बाधित व्यक्तीची राख व हाडे ४ दिवसांपासून स्मशानभूमीत पडून राहिली असून स्मशानभूमी परिसरामध्ये कोरोना बाधित व्यक्तीच्या अंत्यविधी करताना वापरण्यात आलेले हॅन्ड ग्लोज देखील तसेच उघड्यावर पडून होते. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. स्मशानभूमीत अखंड प्रेते जळत आहेत. त्यामुळे अनेक मृतदेह अग्निसंस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. हे चित्र आता ग्रामीण भागातही दिसत आहेत. जागा नसल्याने उघड्यावरच स्मशानभूमीत आणि जवळपास परिसरात जिथे जागा मिळेल तिथे अग्निसंस्कार केले जात आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर यापुढेही अनेक गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर अनेक लोकं मरत राहतील. प्रत्येक घरात एक दोन माणसे मरतील. गल्ल्या ओसाड पडतील. अर्धेअधिक किंवा गावच्या गावं स्मशानभूमी बनतील. निष्काळजीपणा, अपूरी आरोग्य साधने, यंत्रणा यामुळे आणि उपचाराअभावी हे सगळं घडेल.
गंगाधर ढवळे ,नांदेड
संपादकीय