डॉ. प्रतिभा जाधव यांच्या ‘अस्वस्थतेची डायरी’ या नवीन वैचारिक लेखसंग्रहांचे डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केलेले समीक्षण….(माजी अध्यक्ष,अ.भा. मराठी साहित्य संमेलन)

बहुसांस्कृतिकतेचे मूल्यभान असणारी ‘अस्वस्थतेची डायरी’

*’अस्वस्थतेची डायरी’ (प्रथम आवृत्ती फेब्रु.२०२१, संवेदना प्रकाशन,पुणे)* हा डॉ. प्रतिभा जाधव यांच्या दैनिक ‘सकाळ’ मधील स्तंभलेखनाचा लेखसंग्रह वर्तमानातील अंतरंगी वास्तवाची सुंदर कलाकृती आहे. ‘विचारधन-अंतर्नाद’ या सदरातील ५९ लेखांची ही मालिका जीवनचिंतनासह समाजाविषयी भाष्यही करताना दिसते. काही लेखातून डॉ. प्रतिभा जाधवांच्या चरित्राचे अंशत: दर्शनही घडते.


डॉ. प्रतिभा जाधव प्राध्यापिका, लेखिका, कवयित्री, वक्ता, सूत्रसंचालक आणि एकपात्री कलावंत असल्याने त्यांच्या व्यक्तित्वाचा परिप्रेक्ष बऱ्यापैकी व्यापक आहे. हिंदी-मराठी संदर्भांना पचवणारी त्यांची लेखन शैली समाजाच्या ज्वलंत व जिव्हाळ्याच्या प्रश्नासंबंधी वस्तुनिष्ठ चिंतन मांडते. डॉ. आंबेडकर ते सुरेश भट आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ते बाबुराव बागूल अशा विविध जातधर्मातील धर्मातीत मानदंडांना पेलून नेणारी अव्वल प्रतिभा डॉ. प्रतिभा यांना प्रसन्न झालेली आहे. म्हणूनच बहुसांस्कृतिकतेचे मूल्यभान या संपूर्ण लेखनात पानापानावर अभिव्यक्त झालेय.
डॉ. प्रतिभा जाधवांच्या सांस्कृतिक समृद्धीच्या साक्षी ‘अस्वस्थतेची डायरी’मध्ये ठायी ठायी अनुभवताना संकुचित जाणिवेत जगणारा वाचक निदान हे लेखन वाचताना तरी जातधर्मनिरपेक्ष अनुभूती घेऊ लागतो. त्यामुळे त्या लेखनाची प्रेरणा व स्वरूप प्रासंगिक असले तरी त्यामधील आशयसूत्राच्या मांडणीचा गाभा चिरंतनत्वाचे अमृत पेरून जातो. लेखिकेचा लेखन परिप्रेक्ष केवळ प्रांत आणि देशापुरता मर्यादित राहत नाही. समुद्रकिनारी रेतीत निष्प्राण पडलेला ‘आयलान’, पेटलेल्या व्हिएतनाममध्ये बॉम्बगोळ्यामुळे कातडी सोलवटलेल्या विवस्त्र देहाने पळणारी नऊ वर्षाची चिमुरडी ‘नापार्म गर्ल’ अशा अनेक आंतरराष्ट्रीय घटना-प्रसंगांची अर्थपूर्ण नोंद या लेखनात आढळते.


‘अस्वस्थतेची डायरी’ या लेखसंग्रहातील ‘चिरायू लोकशाहीसाठी’ आणि ‘आपण संविधानाची बाराखडी गिरवू या!’ असे लेखन अस्सल राष्ट्रभक्तीची साक्ष देते. लोकशाही मूल्यांच्या पूजेतच या लेखनाचे मूल्य उजळून निघते. कारण संविधानाचे अधिष्ठान लेखिकेच्या भूमिकेने कौटुंबिक, सामाजिक व शैक्षणिक संस्कारातून स्वीकारले आहे. म्हणूनच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सांस्कृतिकतेची उदात्त तात्त्विकता या लेखनाचा अंतरात्मा बनली आहे.
स्त्रियांवरील अत्याचार हा आपल्या समाजाची खास ओळख बनलेल्या काळात डॉ.प्रतिभा स्त्रीत्वाच्या कैवारात उतरतात. स्त्रीवरील अन्यायाचा पाढा वाचताना त्या दहावीच्या वर्गात पेपर लिहिणाऱ्या रिंकू पाटीलवरील रॉकेल टाकून पेटवण्याच्या घटनेची आठवण करून देतात. एकतर्फी प्रेमातून भर चौकात सुर्‍याने भोसकलेल्या अमृता देशपांडेचे स्मरण करतात. दिल्लीची दुर्दैवी ‘निर्भया’, पत्रकार दामिनी, खैरलांजीची प्रियंका व तिची आई सुरेखा, कोपर्डीची श्रद्धा, तंदूरकांडात जाळलेली दिल्लीची नयना, भवरीदेवी, बिल्किस बानो, अॅसिड हल्ल्यातील लक्ष्मी, अन्यायग्रस्त फुलनदेवी अशा असंख्य बळींच्या निवडक प्रतिनिधींची या लेखनातील नोंद डॉ. प्रतिभा यांना अस्वस्थ करतेच पण वाचकांनाही अस्वस्थ करून सोडते.
विशेष म्हणजे पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या या महिला विविध जात-धर्म व प्रांत-प्रदेशच्या आहेत पण लेखिका त्यांच्यात पक्षपात न करता स्त्रित्वाच्या वेदनेची सत्यकथा सांगू पाहते. म्हणूनच ‘भय इथले संपत नाही’ हे शीर्षक या लेखाच्या अंतरंगी वास्तवाला पूर्णतः न्याय देते. ‘स्त्रियांनी स्वतःमधील कला-कौशल्याचा शोध घ्यावा आणि चौकटीबाहेरचे काही चांगले करू धजावणाऱ्या बाईला आयुष्याचं सोनं करणारा परिसही सापडतो असा आशावादी विचार डॉ. प्रतिभा जाधव यांनी मांडला आहे. अर्थात ‘नारी तूच कस्तूरी’ असा आत्मविश्वास जागवणारा अनुभवसिद्ध सिद्धांत त्या रुजवू पाहतात. स्त्रीच्या अर्थपूर्णतेची वास्तवातील सत्यकथा ‘ती’ या लेखात अर्थपूर्ण ठरलीय. भाषेतील स्त्रीलिंगी संदर्भ एकूण सांस्कृतिक संचित घेऊन या लेखनात अवतरले आहेत. हा लेख विचार आणि भाषा सौंदर्याने विशेष नटलेला आहे.
‘मैतरणी गं मैतरणी’ कुठ हरवलीस?’ अशा नाट्यात्मक शीर्षकाचे विद्याताई बाळ यांच्या निधनाच्या दु:खात अभिवादन करणारे पत्र प्रचंड बोलके आहे. स्तंभलेखनाच्या पारंपरिक आकृतिबंधाची वाट मोडून डॉ. प्रतिभा पत्राच्या वाङमयीन रूपाचा जाणीवपूर्वक अवलंब करतात. कारण विद्याताई बाळ यांच्या स्त्रीवादी ऐतिहासिक कर्तुत्वाची नाळ अंगभूत सामर्थ्यासह लेखिकेशी जुळली असल्याने ‘विचार व भावना अभिव्यक्तीसाठी पत्राचाच आकृतीबंध उपयुक्त ठरतो. विद्याताईंची ‘लेक’ म्हणून लेखिकेचा माणुसपणसाठीचा लढा चालू असल्याची साक्ष प्रचंड आश्वासक आहे.
स्त्रीत्वाच्या संदर्भाने डॉ. प्रतिभा जाधव भरभरून बोलतात. त्यांच्या लेखणीच्या प्रत्येक शब्दातून स्त्रीविषयक कळवळाच पेरला जातो. ‘कळ्या कोवळ्या खुडताना’ या लेखात लेखिकेने शब्दबद्ध केलेल्या स्त्रीवरील अत्याचाराच्या तिन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. पतीपासून वेगळी झालेली बिहारची अल्पवयीन आई बाळंत होऊन मांसाच्या गोळ्याला वेश्यागृहात सोडून गेल्याची वार्ता किती भयानक? यासंबंधी लेखिकेचा प्रश्न काळजाला भिडतो, त्या म्हणतात, “कुणाच्या विश्वासावर इतकी शांत निजली असावी ती चिमुरडी?आईनेच आपल्या लहानगीचा सौदा केला होता यासारखं वाईट काय असावं?’’ प्रश्नांची मालिका मोठी आहे.

१) जन्मत: पोरकी झालेली ही लेकरं, यांचा काय दोष ?
२) नाती एवढी कचकड्याची झालीत ?
३) आपल्याच काळजाचा तुकडा असा कसा तोडून टाकतात ही माणसं?
लेखिकेच्या प्रश्नांनी वाचक हैराण होतो, कारण अशा मूलभूत प्रश्नांच्या उत्तरात समाज व संस्कृती मौनात गेली आहे.
स्त्रीप्रश्नांचं सम्यक आकलन मांडताना डॉ. प्रतिभा अत्यंत सूक्ष्म तपशील देतात. त्यांची भूमिका कोणत्याही संदर्भाने बाधित वा संकुचित न ठरता सत्याचे प्रतिपादन करते. त्याची काही उदा. पुढीलप्रमाणे-
१) जातधर्म कोणताही असो, प्रत्येक समूहातील स्त्री ही ‘दलित’च असते.
२) ‘बाईचा सन्मान, आदर राखणं, तिला व्यक्ती म्हणून स्वीकारणे’ हीच खरी ‘मर्दानगी.’
३) लोकशाहीचे खरे मारेकरी हेच आहेत.
४) सारे प्रश्न माणसानेच निर्माण केलेत आणि ‘माणूस’च ते सोडवू शकतो.
५) आजही समाजात शोषित स्त्रीलाच अपराधी म्हणून संबोधलं जातं, तिची वेदना समजून घेतली जात नाही.
६) निरीक्षण आणि अनुकरणातून जे संस्कार होतात ते आयुष्यभर टिकतात.
७) भारतातील पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांसाठी नेहमीच मारक ठरलीय.
वरील चिंतनसुत्रांची मालिका फक्त एकाच लेखातून अनुभवताना लेखिकेच्या प्रज्ञेसंबंधीचा स्वाभाविक गौरव अटळ ठरतो. विचारगर्भ सुत्रांची मांडणी लेखिका हौसेखातर करीत नसून त्यांच्या लेखनशैलीचा तो अंगभूत सहज अविष्कार आहे. भिंतीवर सुभाषित म्हणून कोरावीत अशी शेकडो चिंतन सूत्रे या ग्रंथाच्या पानापानावर भेटतात, हे विचारवैभव मला समाधान देते.
आपल्या अश्रूंचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या डॉ. प्रतिभा जाधव ह्या जगावेगळ्या लेखिका आहेत. रडण्यात ‘माणुसपणा’चा जिवंतपणा अनुभवणारी ही प्रतिभावंत लेखिका खोट्या प्रतिष्ठेपासून लाखो मैल दूर राहते. हेच या लेखिकेचे व तिच्या लेखनाचे खरखुरे सामर्थ्य आहे. लेखिकेच्याच शब्दात सांगायचे तर- ‘आसू अच्छे होते है, जिनकी आंखों से बहे वही तो सच्चे होते है!’ अश्रु कमकुवतपणाची खुण ठरत नाहीत. शहाण्या माणुसपणाचे अश्रू सत्याच्या बांधिलकीतून गळताना संस्कृतीचा विकासच होतो. यात लेखिकेच्या अश्रुंचे मूल्य शोधावे लागते. अश्रू हे विधायक कृतीची प्रेरणा ठरतात. लेखिकेची करुणा रडकी नाही, वांझ नाही. या कारुण्याचा थेट संबंध बुद्धाच्या करुणेशी जुळतो. पण लेखिकेचा बुद्ध केवळ बुद्धिष्टांचाही नाही तर विश्वातील सर्वच मानवकल्याणकारी महापुरुषांच्या जीवन समर्पणाचा सारांश या व्यापक-उदात्त बुद्धतत्वात सामावलेला आहे. म्हणूनच लेखिकेने सत्याच्या अधिष्ठानावर अश्रूंची शब्दपुजा बांधलीय.
मृत्यूच्या भयाने अनेक प्रतिभावंत तो विषयच टाळून लिहीत राहतात. पण डॉ. प्रतिभा जाधव मृत्यूचे वास्तव तटस्थपणे तरीही संवेदना जागृत ठेवून आकलन करू लागतात. त्यातूनच महापुरात बोटीतील सतरा लोकांच्या वाहून जाण्याची सत्यघटना त्या ‘अस्वस्थतेची डायरी’त सांगू पाहतात. त्यातही मृत आईच्या कुशीतील दोन महिन्याचं मृत बाळ आणि काळजात चर्रर्र झाल्याची प्रतिक्रिया विशेष लक्ष वेधून घेते. आठ वर्षाच्या निरागस आर्यनची कोवळी कातडी जाळताना-सोलताना धर्माच्या ठेकेदारांनी सिद्ध केलेलं क्रौर्य आणि केरळातील भुकेला मनोरुग्ण मधू चोरून भात खातो म्हणून जमावाने निर्दयीपणे केलेला त्याचा खून म्हणजे लेखिकेने समाजातील विकृतीची जिवंत उदाहरणेच जणू दिली आहेत. विकृतीचे दर्शन हा लेखिकेचा आवडता छंद नाहीच, त्यापाठीमागचे अमानुष क्रौर्य लेखिकेला असह्य होते. सभोवतालच्या अघोरी, अन्यायकारक प्रसंगांनी त्या गलबलून जातात आणि पळवाट न शोधता या विकृत प्रवृत्तीच्या निषेधार्थ त्या लेखनास प्रवृत्त होतात. दुर्दैवी-निष्पाप जिवांबद्दल लेखिकेच्या काळजात कणव आहे. त्यांच्या बुद्धिवादात कायम बुद्धत्व आहे, म्हणून त्यांचे शब्द वेलबुट्टयांना बाद करून करूणरसाने न्हाऊन प्रकटतात. समाजमनातील व्यापक करुणा जागृत व्हावी हा त्यांचा ध्येयवाद असतो. शोषितांच्या कैवारातील जागतिक व भारतीय असे सर्वच मानदंड लेखिकेच्या पार्श्वभूमीत एकात्म असतात. म्हणून तर शंबुक, एकलव्य, बिरसा यांच्या इतिहास-सिद्ध प्रवाहात लेखिका रोहित वेमुला आणि डॉ. पायलची सार्थ नोंद करतात.
डॉ. प्रतिभा जाधव यांची वैचारिक भूमिका पक्की आहे, ती प्रगल्भ आहे. शिवाय एकाच महापुरुषाच्या जात-धर्माला बांधील न राहता ती फक्त आणि फक्त सत्याचाच जयघोष करते. त्यामुळे एकधर्म, एकजात, एक महापुरुषवादी संकुचित विचार प्रवाहाची बाधा लेखिकेच्या वैचारिक भूमिकेला झालेली नाही. जात-धर्माच्या अनाठायी अस्मिता-अहंकारात पेटून नवशिक्षितांची पुन्हा नवी वर्णव्यवस्था निर्माण झालेल्या काळात कोणत्याही संकुचित व करंट्या पक्षपाती संदर्भाची बाधा डॉ. प्रतिभा जाधव यांच्या लेखनाला झाल्याचे दिसत नाही. कारण त्यांचा बुद्धिवाद पारदर्शी असून वस्तुनिष्ठ सत्याची निष्ठावंत बांधिलकी त्याने स्वीकारली आहे. ‘ब्राह्मणी-अब्राह्मणी’ व ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ अशा विषारी वजाबाकीच्या वाटण्या पेटलेल्या वर्तमानात लेखिका विवेकनिष्ठ भूमिका बजावते. अभिजन-बहुजन असा दोन्ही प्रवाहातील वाचक, श्रोते व प्रज्ञावंतांबद्दल त्या भरभरून जिव्हाळ्याने लिहितात. त्यांच्या अस्सल माणसांचा गोतावळा सेक्युलर आहे, या भूमिकेचे मूल्य श्रेष्ठ आहेच.


आपल्या वडिलांच्या आठवणीत रमलेल्या लेखिकेचे सत्यकथन उत्कट भावनांनी चिंब भिजून वाचकांपर्यंत पोहचते. त्यांच्या वडिलांचा रागीट चेहरा, कडक शिस्त, मुलांच्या अभ्यासासह इतर संदर्भाने असणारे त्यांचे बारीक लक्ष या सर्व तपशीलातून अस्सल ‘बापमाणूस’ जीवंत होतो. मोठी स्वप्ने दाखवून प्रयत्नवादाचे बळ देणारे ‘दादा’, ‘खूप शिका नाव काढा’ म्हणणारे व ‘लै खस्ता खाल्ल्याची’ वेदना पेरणारे ‘दादा’, आक्काच्या साखरपुड्यात ओक्साबोक्शी रडणारे ‘दादा’, ‘फणसा’सारखे असूनही ‘आग्यामोहळ’ जाणवणारे ‘दादा’ अशी अनेक रुपे लेखिका त्यांच्या अनुभूतीतून मांडतात. त्यामुळे लेखिकेचे व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य स्पष्ट होते.
बालवाडी ते पदवीपर्यंतचा शैक्षणिक प्रवास नाशिक शहराच्या साक्षीने घडताना लेखिकेची जडणघडणही त्याच पर्यावरणात झाली आहे. ग्रामीण भागातील नोकरीच्या निमित्ताने आलेल्या अनुभवातून बुरसटलेली मानसिकता, स्त्री-पुरुष भेद, जात-धर्माची विषमता, अंधश्रद्धा या सर्व कुरूप वास्तवाचा अनुभव घेणे भाग पडले. अर्थात सुंदर-सुखद अनुभवसुद्धा नाशिकच्या सहजीवनातील गोडवा सिद्ध करतात. सारांश स्तंभलेखनातून अंशतः आत्मचरित्राचे काही रंग अधून मधून व्यक्त होतात.
डॉ. प्रतिभा जाधव प्रचंड भावनाशील आहेत, म्हणून तर सलील कुलकर्णी यांच्या ‘लपवलेल्या काचा’मधील लेख वाचताना त्यांचे डोळे टचकन भरून आले ! ते पुस्तक भिवंडीच्या ज्येष्ठ पत्रकार जगदीशकुमार पाठारे यांनी लेखिकेस भेट दिले होते. त्याच क्षणी ‘हुंदका आवरून’ डॉ. प्रतिभा त्यांना फोन करून मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात. ‘अस्वस्थतेची डायरी’तील लेखांचे नियमित वाचक रत्नागिरीचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.राजीव सप्रे यांच्या प्रतिक्रियांचे ऑडिओदेखील त्या जपून ठेवतात. बाबाराव मुसळे, प्रेमानंद गज्वी अशा लेखकांची पत्रे जपणाऱ्या लेखिका डॉ.प्रतिभा अनेकविध व्यक्तिरेखासंबंधीचा अनुबंध सुंदररित्या रेखाटतात. त्यात सांस्कृतिक संचित दडलेले आहे आणि मुख्य म्हणजे ही लेखक-वाचक मंडळी एकाच जात-धर्माची किंवा एकाच प्रवाहातील नाहीत. हे श्रेय अर्थात लेखिकेसह इतरांचेही तेवढेच आहे. डॉ. प्रतिभा जाधव यांना वाचनाची आवड आहेच, महाराष्ट्रभर प्रबोधनकार्य पेरणाऱ्या या प्रतिभावंत प्राध्यापिकेला ‘मित्र’ व मार्गदर्शक म्हणून ग्रंथ उपयुक्त ठरतात. म्हणून तर त्यांचं स्वतःचं ग्रंथालय आहे. सहज ओघात आलेले हे व्यक्तिगत जीवनाचे संदर्भ लेखिकेच्या स्वकथनाची नाळ सिद्ध करतात.
त्यांच्या अंशत: चरित्राचे काही संदर्भ करूणरम्य आहेत. ‘नॉट रिचेबल होण्यापूर्वी’ हा लेख मृत झालेल्या जिव्हाळ्याच्या नात्यातील आदरणीय व्यक्तींचे अनुबंध स्पष्ट करतो. ‘आनंद निकेतन’चे अरुण ठाकूर, “भेटू निवांत” म्हणून न भेटताच कायमचे निघून गेलेले यशवंत पाठक, सानेगुरूजी कथामालेचे दत्तादादा हेलसकर, समता सैनिक दलाचे केतन पिंपळापुरे, विद्रोही कवी-कार्यकर्ता कैलासदादा पगारे, कवी विलास पगार, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे या आत्मीय स्नेहभावनेने जुळलेल्या व्यक्तींचे मृत्यू लेखिकेच्या सहन करण्यापलीकडचे आहेत. या सर्वांचे फोन आता ‘नॉट रिचेबल’ झालेत. लेखिकेची ही अंतरीची वेदना वैयक्तिक स्वरूपाची असली तरी तिचे सांस्कृतिक मूल्य व्यापक सामाजिकता सिद्ध करणारे आहे. कारण ‘आनंदनिकेतन’, सानेगुरुजी कथामाला, समता सैनिक दल, विद्रोही कवी कैलास पगारे, यशवंत पाठक, डॉ.गंगाधर पानतावणे या सर्वांचे बहुसांस्कृतिक संचित संबंधित व्यक्तींच्या मृत्यूने अनाथ झालेय. याच उदात्त भावनेचा व्यक्तिगत अनुबंध लेखिकेने अधोरेखित केला आहे. लेखिकेचा हा बहुधार्मिक गोतावळा त्यांच्या वैचारिक भूमिकेचे वैभव सिद्ध करतो आणि त्यांची वेदना काळजाच्या लांबी-रुंदीचा विस्तार सांगते.
‘ते बालपण हवेसे’ या लेखातील बालपणी अनुभवलेली दिवाळीची लगबग, रांगोळीने खुलणारे घर, पाच बहिणींचे एकाच ताग्यातील नव्या फ्रॉकवरील बालपणीचे आनंदी मिरवणे, वर्षातून एकदाच क्लिक होणारा फॅमिली फोटो, शेजाऱ्यांकडून येणारी-जाणारी फराळाची ताटं असा दिवाळीचा थाट आजही लेखिकेच्या मनःपटलावर तसाच ताजा आहे. ‘अन ओठी शुभ्र हसू चांदण्यांचे’ या लेखात लेखिकेने वर्णन केलेल्या संसारी आयुष्यातील जगातील सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे लेखिकेसाठी तिचे घर आहे. तेच त्यांचं स्वतंत्र विश्व! घरातील विशिष्ट जागेतील ‘निवांत क्षण’ लेखिकेस अप्रूप वाटतात. संपूर्ण घर मालकीचं असलं तरी वर्तमानपत्राच्या वाचनापासून निशुबाळाला मांडीवर थोपटत बसण्याची खास विशिष्ट जागा लेखिकेसाठी जिव्हाळ्याची आहे. लेखन-वाचन, नियोजनासह शांतता अनुभवण्याच्या या जागेचा लळा लेखिकेच्या शब्दवैभवाने जीवंत व श्रीमंत झाला आहे.
समृद्ध व्यक्तित्व लाभलेल्या सुसंस्कृत डॉ. प्रतिभा जाधव यांचे पुस्तकप्रेम अतुलनीय आहे. ‘ये प्यार ना होगा कम’ हा संपूर्ण लेखच ग्रंथप्रेमाची अनुभूती मांडतो. विशेष म्हणजे संपूर्ण लेख प्रेमप्रकरणामुळे कुतूहल निर्माण करतो. लेखिकेने दिलेले रेशीम नाते, प्रेमात पडण्याचं वय, प्रेमाची प्रेरणा, आभाळात भरारी घेण्याचं सामर्थ्य, रोमॅंटिक वाटणं, त्याचं ‘खासमखास’ असणं हे सर्व संदर्भ प्रियकराचेच वाटतात. पण हा प्रियकर कोणी पुरुष व्यक्ती नसून तो ‘मितवा म्हणजे मित्र’ पुस्तक असल्याचे जेव्हा लेखिका स्पष्ट करते तेव्हा माझी स्वत:चीही दांडी उडाली. या नाट्यपूर्ण गौप्यस्फोटामुळे वाचकाला सुखद धक्का बसतो. अर्थात पुस्तकालाच ‘मितवा’ मित्र, तत्त्वज्ञ व वाटाड्या संबोधून त्याच्या प्रेमात जीवन समर्पित करणाऱ्या लेखिकेच्या जगावेगळ्या प्रेमाचा सांस्कृतिक गौरव अपरिहार्यच ठरतो.
लेखिकेची संवेदनशीलता गरीब, श्रमिक, भिकारी, शोषित माणसाच्या वेदनेशी एकनिष्ठ राहते. त्यांच्या लेखणीला दु:खाची जाण आहे. म्हणूनच ‘भाकरी वाढ’ म्हणून आवाज देणारा ‘चिमुरडा’ त्यांच्या लेखनात स्थान मिळवतो. बाळ, तान्हा, लेकरू, चिमुरडा अशा कोवळ्या वयातील बालरूपात ही लेखणी वात्सल्य भावनेने चिंब भिजते. म्हणूनच लेखिकेचे मातृत्व केवळ त्यांच्या जन्मदात्या मुलांपुरते मर्यादित राहत नाही, तर त्यांच्या मातृत्वाचा सहज विस्तार सर्वच दुर्दैवी बालकांपर्यंत भिडतो. अर्थात त्यांच्या उदात्त मातृत्वाचा वात्सल्यभाव समाजातील, देश-विदेशातील सर्व जात-धर्माच्या शोषित-पीडित वेदना भोगणाऱ्या स्त्री-पुरुषातील माणसापर्यंत पोहचतो. असे मातृत्व मला सदैव वंदनीयच!
जगातील सर्वांची धावपळ, स्पर्धा, शह-काटशह ही भाकरीसाठीच असण्याचं वैश्विक सत्य लेखिकेने समर्थपणे पचवलंय. हा भाकरीचा चंद्र शोधत फिरणाऱ्या ऊसतोडणी कुटुंबाची सत्यकथा आत्मीयतेने या लेखात लेखिकेने साकारली आहे. मासिक पाळीच्या महिलांना काम देण्यास कुचराई करणारे कंत्राटदार, खाड्याच्या दिवसाचा पाचशे रुपये दंड हा बुडीचा व्यवहार टाळण्यासाठी अनेक गरीब महिलांनी गर्भाशय काढल्याची सत्यकथा काळीज कापत मेंदूचा भूगा करते. परिणामत: शरीराच्या तक्रारी, वजन वाढणे, आयुर्मान कमी होणे या दाहक सत्याला या उसतोडणीच्या मजूर कुटुंबांना सामोरे जावे लागते. या लेखामध्ये लेखिकेने अनेक नव्या संदर्भानी माहिती दिल्यामुळे ऊसतोडणी मंजुरांच्या शोकात्म अंतरंगाचे भयाण दर्शन घडते. ‘निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कसे चालेल?’ हा लेखिकेचा प्रश्न महत्वाचाच ठरतो. तसेच जगण्याच्या लढाईत स्वतःहून मरणाच्या जवळ जाण्याची ही कुठली रित?’असे बिनतोड प्रश्न उभे करून लेखिकेने मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाची पुण्याई नकळत पेरून ठेवलीय. श्रमिक कष्टकऱ्यांच्या कैवारातील लेखिकेची ही तळमळ व भूमिका संत बसवेश्वर ते महात्मा गांधी या श्रममूल्याचे महत्व विशद करणाऱ्या प्रवाहाशीही संवादी ठरते.
वर्तमानपत्रातील बातमी वाचून लेखिका ‘सुन्न आणि भून्य’ झाल्याचे नमूद करताना ‘नकोशी’ची शोककथा उलगडत जाते आणि लेखिकेची संवेदनशीलता सच्चेपणासह अक्षरबद्ध होते. ‘अनैतिक’ संतती म्हणून टाकून दिलेला दुर्दैवी जीव अनेक प्रश्नांची निर्मिती करतो. हे संपूर्ण लेखनच भावोत्कटता आणि वैचारिकता या दोन्ही संदर्भानी ओथंबून गेलेले आहे. प्रश्नांची नोंद लेखिकेने ताकदीने केलीय पण समाज आणि संस्कृती जिथे निरुत्तर झाली तिथे डॉ. प्रतिभा जाधव कोणते उत्तर देणार? अर्थात या ज्वलंत प्रश्नांची मांडणी कारुण्याच्या मुशीतून झाल्याने त्याचे महत्व आहेच! संस्कृतीला उत्तर शोधावेच लागेल. कारण मौनी संस्कृती लाखो कोवळ्या जिवांच्या ‘पापात व शापात’ विकसित होणार कशी?
समाजातील वेगवेगळ्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर डॉ. प्रतिभा जाधव आपले स्वतंत्र भाष्य करतात. त्यांची दृष्टी सूक्ष्म तपशिलावरही स्थिरावते. उकिरड्यावरचं अन्न खाणारी झोपडपट्टीतील लहान लेकरं बघितली की, लेखिकेच्या काळजात चर्रर्र होतं. उंदरांनी ढोलीत नेलेलं धान्य काही आदिवासी मिळवतात आणि उंदराचं कालवण भाकरीसोबत खाऊन भूक भागवतात. अहिर मासा म्हणून पकडलेल्या विषारी सापाचं कालवण लेकरांना भरवल्यानंतरची शोककथा डॉ. प्रतिभा गांभीर्याने सांगतात.
तर्कशुद्ध आणि बुद्धिप्रामाण्यवादी अभ्यासक आजवर मी असंख्य अनुभवलेत पण टोकाची संवेदनशीलता व भावनेची अस्सल अकृत्रिम उत्कटता वैचारिक मांडणीत अभिव्यक्त करणाऱ्या दुर्मिळ प्रतिभावंतांच्या यादीत डॉ. प्रतिभा जाधव यांचे नाव अग्रक्रमाने नोंदवावे लागेल. या संपूर्ण स्तंभलेखांच्या संग्रहात लेखिकेच्या काळजातील वेदना आणि संवेदनांचा वाटा निर्णायक आहे. त्यामुळे लालित्यपूर्ण लेखनाचे सौंदर्य सहज शैलीतून अटळपणे अवतरले आहे. लेखिकेचा मूळचा पिंड वस्तुनिष्ठ बुद्धीवादी भूमिकेचा असल्याने लेखनाची मूस सत्याशी सातत्याने एकनिष्ठ राहते. अशा दुहेरी गुणवत्तेचे स्तंभलेखन फारच दुर्मिळ आहे. म्हणूनच स्तंभलेखकांच्या एकूण मराठी प्रवाहातील कामगिरीच्या इतिहासात वेगळ्या वैशिष्ट्यांची लेखिका म्हणून डॉ. प्रतिभा जाधव यांच्याकर्तृत्वाचा सन्मान अपरिहार्य ठरतो. लेखिकेच्या संवेदनशील लेखनाच्या काही साक्षी पुढील प्रमाणे –
१) तीन रुपये मजुरीमागितली म्हणून दोघी बहिणींवरअत्याचार करून झाडावर लटकवलेले मृतदेह पाहिले‘आर्टिकल १५’ चित्रपटात आणि आसवांचा बांध फुटला.
२) ‘आर्यावर्त’मधल्या तान्ह्या बाळाला आईपासून विलग केलं तेव्हाही अशीच धाय मोकलून रडले.
३) अरुणा (शानबाग) गेली तेव्हाही आतून उचंबळून आलं.
४) भैय्यालाल भोतमांगेंचा निर्विकार चेहरा तर मला नेहमीच रडवत आलाय.
वेगळ्या व नावीन्यपूर्ण लेखनशैलीचा उत्तम नमुना म्हणून ‘हे हात सुगंधी होवोl’ हा लेख मुळातून जरूर वाचावा. तसेच ‘सावित्रीबाईंना तिच्या लेकीने लिहिलेलं पत्र’ सुद्धा श्रेष्ठ वाङमयाची गुणवत्ता सिद्ध करणारे लेखन आहे. ‘अक्षर वाटेवरली मोठ्ठी माणसं’ खूप भावली. ‘संवाद श्वास माझा’ अधोरेखित करणारा आत्मविश्वासात्मक आवाज विसंवादी जगात निर्णायक महत्वाचा ठरतो. ‘ध्येयाच्या दिशेने’ वाटचाल करताना ‘निंदक’ आणि हेवादावा करणाऱ्या विकृत प्रवृत्तीचे लोक भेटणारच. पण आपले यश हीच आपल्या ध्येयपूर्तीची साक्ष मानून अनुभवाच्या शहाणपणाने जगणे समृद्ध करणे महत्वाचे ठरावे! ‘गंध हरवल्या गोष्टी’ तील लेखिकेचे सुंदर व समृद्ध बालपण मन मोहून टाकणारे आहे. ‘प्रिय कविते’ च्या संबंधाने व्यक्त झालेले लेखिकेचे मनोगत आशयसूत्रांच्या मुल्यात्मकतेने मन व बुद्धीला एकाच वेळी प्रभावित करते. लेखणी व कागदाचे ‘विश्वासू’ नाते इथे जीवंत झालेय. कोणत्याही झेंड्याकडे मेंदू गहाण न टाकता लेखिका विवेकाच्या ध्वजाला समर्पित आहे. त्यांचा विश्वास माणसांना तोडण्याएवजी जोडण्यावरच अधिक आहे.
डॉ. प्रतिभा जाधव यांची भाषाशैली सर्वांगसुंदर आहे. त्यांची भूमिका वैचारिक मूल्यांच्या बांधिलकीत रमत असली तरी त्यांची शैली लालित्यपूर्ण आहे. सौंदर्यवती भाषेचा प्रभाव अर्थातच वाचक मनावर पडतोच!
उदा – १) आत्मविश्वासाने वावरणारी प्रत्येक बाई अपार सुंदर असते.
अर्थात लेखिका स्त्रीसौंदर्याच्या रूळलेल्या निकषांना बाद ठरवून स्वतःचा विश्वास व स्वकर्तृत्वाचा ध्यास यांनाच निर्णायक महत्व देणे.
२)‘रडायचं की लढायचं? ह्यापैकी लढण्याचा पर्याय केव्हाही योग्यच!’
अर्थात, रडण्याची अपरिहार्यता स्वाभाविक मानूनसुद्धा ‘लढण्या’ चा मार्गच अधिक योग्य असल्याचा लेखिकेचानिर्वाळा त्यांच्या जीवनासक्त संघर्षवादी जगण्याचे मूल्य सिद्ध करतो
३) ‘पण आव्हानं आहेत म्हणून जगायला मजा येते असं नेहमीच वाटतं.’ अर्थात आव्हाने पेलण्याची व पचवण्याची क्षमता लेखिकेच्या अंतरंगात जरूर आहे.
‘अस्वस्थतेची डायरी’तील लेखांचे शीर्षक अर्थपूर्ण आणि नाट्यपूर्ण आहेत. उदा. ‘काळीजनाती’, ‘बळी’, ‘भूक’,’ती’ अशा एकाच अर्थपूर्ण शब्दाच्या शीर्षकातून आशयघन सूत्रांची मांडणी केल्याचे जाणवते. तसेच ‘माणसं जगलीच पाहिजेत!’, ‘संवाद श्वास माझा’, ‘इतिहास कुणालाच माफ करत नसतो’, ‘ही विषारी वर्तुळं भेदू चला’, नारी तूच कस्तुरी, ‘हार नको-निर्धार हवा’ यासारख्या शिर्षकातून बुलंद आशावादाची पेरणी दिसते. भोंदू मेंदू, पोस्ट पेस्ट कंट्रोल अशा शीर्षकातून शब्दचमत्कृतीचे नाट्य जाणवते. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी…’, ‘गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी’, ‘भाकरीचा चंद्र शोधताना’ ही शीर्षक मालिका मराठी लोकप्रिय काव्यपरंपरेतील सुभाषितवजा काव्य ओळींचा स्वीकार करताना दिसते. ‘ये प्यार ना होगा कम’, ‘बोल के जबां अबतक तेरी है…’ हे हिंदी शीर्षक डॉ.प्रतिभा यांच्या अभ्यासाचा हिंदी भाषिक अनुबंध स्पष्ट करतात. पाच-सहा शीर्षकांचा अपवाद वगळता या संग्रहातील ५०-५२ लेखांची शीर्षके अर्थपुर्णता व नाट्यत्मकतेसह शैली आणि शब्दकळा या संबंधाने प्रचंड भावणारी आहेत. मराठी स्तंभलेखनाच्या इतिहासात हा विक्रम दुर्मिळ असण्याचा माझा निष्कर्ष आहे.
‘अस्वस्थतेची डायरी’तून डॉ. प्रतिभा जाधव यांचे चिंतनशील गद्यलेखन व्यक्ती, प्रसंग, आठवणी, वृत्ती-प्रवृत्तीविषयक अभिव्यक्तीत बऱ्याच वेळा काव्यात्मतेची अनुभूती होते. त्यांच्या भाषाशैलीसंबंधाने काव्यात्म गद्य वाचण्याची सुवर्णसंधी वाचकांना मिळतेय त्यामुळे हळव्या मनाचा नितळ पारदर्शी तळ रुबाबदार व श्रेष्ठ विचारांसह या लेखनातून साकार केला आहे. याशिवाय गद्याच्या निवेदनात अधूनमधून आशयसूत्राची गरज म्हणून काही स्वरचित कवितासुद्धा या लेखनात भेटतात. एक अस्सल कवयित्री म्हणून त्यांचा ठसा स्वतंत्र कवितासंग्रहात उमटतो पण त्याची झलक या स्तंभलेखनात अधूनमधून अनुभवता येते.
उदा. १) वावरता माणसात मज माणूस कळाया लागला
वाटेची कोणी लेक तिज मादी गणाया लागला
२) न मानता हार निर्धार करावा,
अपयशावरी प्रयत्नाने वार करावा
३) तू गं पाय रोवून ठाक उभी खचण्यापरी
निनादो चौफेर जयघोषाची तुझ्या तुतारी
४) ही काळीजनाती कसली
धाग्याने प्रेमाच्या विणली
घट्ट किती हे बंध
जेथे होतात दृढ नाती
डॉ.प्रतिभा जाधव यांच्या लेखनात लालित्य आणि वैचारिक सामर्थ्याचा सुंदर संगम झालाय. त्यामुळे भाषा व आशय संबंधाने दुहेरी सौंदर्याची पखरण अनुभवता येते. त्याची काही प्रातिनिधिक उदा. पुढीलप्रमाणे-
१) रिफ्युजी ठरवली गेलेलीही माणसं अन त्यांच्या जीवावर उठलेलीही माणसंच!
२) मुलगा आमच्यापेक्षा देशाचा अधिक होता.
३) मुळात काही मोठी माणसं सुमार विचारशक्तीस पेलवणारी नसतात.
४) जगण्यातील सर्जनशील, सकारात्मक बदल म्हणजे आपले जिवंत असणे असते.
५) परिवर्तनाची, प्रबोधनाची, सत्याची वाट अवघड असते पण कोणत्याच काळात चूक नसते हे उमगलंय.
कुणाचा दावा कोणताही असो, दैनिक सकाळ चहाच्या पहिल्या घोटासोबत वाचल्याशिवाय निदान पुणेकरांची ‘सकाळ’ उजाडतच नाही. त्याच ‘सकाळ’च्या परिवारात डॉ. प्रतिभा जाधव यांचा अनुबंध ‘अंतर्नाद’ स्तंभलेखनाने कायमचा जुळलाय. ‘सकाळ’च्या स्तंभलेखन परंपरेचे अनेक मानकरी आपापल्या क्षमतेने व शैलीने मराठी वाङ्मय विश्वात आजवर सन्मानित झालेत.
एकूण स्तंभलेखनाच्या इतिहासात अनेक लेखकांचे योगदान मोठे आहे. तसाच ‘सकाळ’ दैनिकाच्या परिप्रेक्षातील स्तंभलेखकांचा गोतावळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाजीराव भोसले, अरुण टिकेकर, विजय कुवळेकर, श्रीपाद, भालचंद्र जोशी, श्रीराम पवार, उत्तम कांबळे, सदानंद मोरे, संदीप रासेकर यांची स्तंभलेखनातील कामगिरी वैचारिक अंगाने सिद्ध झालीय. अर्थात प्रत्येकाचे वैचारिकतेचे व शैलीचे वेगळेपण स्वयंसिद्धच आहे. कारण शिवाजीराव भोसले यांचे स्तंभलेखन महापुरुषांच्या चरित्रावर ‘दिपस्तंभा’वर, डॉ. ह.वि. सरदेसाईंचे वैद्यकीय विषयावर, श्रीराम पवारांचे राजकीय वास्तवावर तर उत्तम कांबळेंचे सामान्य सामाजिक घटकांवर लिहिलेले होते.
लालित्यपूर्ण लेखनाची वाट अधोरेखित करताना संतोष शेणईंचे ‘मोगरा फुलला’, विजय कुवळेकरांचे ‘पैलू’, प्रवीण दवणे यांचे ‘थेंबातलं आभाळ’, मल्हार अरणकल्ले यांचे ‘पहाटवारा’, ना. म. जोशींच्या ‘बोधकथा’ यांच्या स्तंभलेखनाची नोंद अपरिहार्य ठरते. अर्थात ‘सकाळ’ वृत्तपत्रातील स्तंभलेखकांच्या यादीत महिलांची नावे कमीच आढळतात. त्यात निलांबरी जोशी, श्रुती पानसे, सायली पानसे आणि डॉ. अरुणा ढेरे यांच्यानंतर डॉ. प्रतिभा जाधव यांच्या नावाची सन्मानपूर्वक नोंद करावी लागेल. विशेष म्हणजे ‘सकाळ’च्या वैचारिक स्तंभलेखनाची व ललित स्तंभलेखनाची अशी दोन्ही प्रवाहांची कलात्मक एकात्मता मला फक्त डॉ. प्रतिभा जाधव यांच्या ‘अस्वस्थतेची डायरी’मध्ये अनुभवता आली.
प्रज्ञावंत प्रतिभाताईंचे अभिनंदन व शुभेच्छा!


-डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष,अ.भा. मराठी साहित्य संमेलन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *