सवत रंडकी झाली पाहिजे….!

आज संपूर्ण जग एका भयान विक्राळ महामारीतुन जात आहे. जागोजागी यमराज टपून बसला आहे. या भयान महामारीने संपूर्ण मानवजातीलाच (तोंड झाकूण)एकमेकांना तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलेलं नाही? जवळचे नातलग, मित्रमंडळी क्षणात आपल्यातून निघून जात आहेत. आपण मात्र केविलवाण्या, असह्य व हतबल चेहरा घेवून दुरुनच श्रद्धांजली वाहतोय. भारतात या महाकाय राक्षशी महामारीने कराल व विराट रुप धारण केलेले आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र या महामारीने संपूर्ण ग्रासला गेला आहे.

या रोगामुळे गरिब, कामगार, शोषित, पिडीत व शेतमजूर यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आलेला आहे. त्यांच्या समोर रोजी रोटीचा प्रश्न पडलेला आहे. टीचभर खळगी भरण्यासाठी रानोमाळ फिरणारे सर्व गरिब कुटुंब नजर कैदेत असल्या सारखे घरात कोंडून घेतलेले आहेत.

या भयान परिस्थितीत महाराष्ट्रातील तमात पक्षांचे राजकीय नेते खरे तर एकत्र यायला पाहिजे. पण महाराष्ट्रात व आपल्या देशात असे होताना दिसत नाही. विशेष करून महाराष्ट्रात विरोधी पक्ष सशक्त आहे, कमजोर नाही. वर केंद्रात त्या पक्षाची सत्ता आहे. याचा उपयोग त्यांनी जनतेच्या भल्यासाठी करायला पाहिजे पण असे होताना दिसत नाही. विरोधी पक्षांचे नेते फक्त सरकार कसं पडेल याचीच वाट पाहात आहेत. हे चालू शासन कसं व कधी सत्ता गमावेल यासाठी विरोधी पक्षातील मोठे नेते वेगवेगळ्या युक्त्या शोधत आहेत. त्यांना फक्त सरकार पाडायचं आहे का? जनतेच्या सुख दुःखांशी यांचा काही संबंध येत नाही का? फक्त टिकाचं करण्यापुरते विरोधी पक्ष असतात की काय? तुमच्या योजना शासनासमोर मांडा. सताधाऱ्यांचा नाकात वेसन घाला. नुसतं शासन पाडण्याची धमकी न देता महाराष्ट्राच्या जनतेला मदत करा शासन तुमचचं येईल.

विरोधी पक्ष मजबूत असणे हे सुदृढ लोकशाहीचं द्योतक आहे. पण मला प्रश्न पडतो. सत्ताधारी व विरोधी पक्षांना खरंच जनेतेची काळजी आहे का? जेव्हा सत्ताधारी विरोधी बाकावर होते तेव्हा; ते जनतेचे प्रश्न आगदी गळा फाडून मांडायचे. शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. गरिबांना मदत मिळाली पाहिजे. शेतक-यांना विमा भेटला पाहिजे. एकरी पंचविस हजार मदत शेतक-यांना मिळाली पाहिजे असे ओरडणारे नेते सत्तेत आल्यावर या गोष्टींचा सरळ सरळ त्यांना विसर पडला. मग जे सत्ताधारी होते ते विरोधात आले व त्यांनी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार मदत द्या म्हणून सांगाय लागले. खरंचं आजच्या विरोधी पक्षाला महाराष्ट्रातील जनतेची काळजी राहीली असती तर ते आज जे मागणी करत आहेत ते सतेत असताना त्यांना करता आली नसती का? पण बोलाचेच भात अन् बोलाचीच कडी. पक्ष कोणताही असो सरकार कोणत्याही पक्ष्याचे असो यांना जनतेच भलं करायचचं नाही. खरचं एखाद्या पक्षाला सत्याची चाड राहिली असती तर त्यांचं शासन केवळ घोषणाबाजी न करता केवळ भरघोष मदत जाहिर न करता प्रत्यक्ष आमलबजावणी केली असती, तर येणारं सरकार ती मदत कमी करूच शकले नसते. पण यांना फक्त जनतेला फसवायचं आहे.

सध्याचं विरोधी पक्ष फक्त हे दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे की फक्त आम्हीच जनतेचे वाली आहोत; पण सतेत आल्यानंतर जनतेला दिलेलं शब्द हे कधीच पाळत नाही. फक्त बोलके शंखच आहे हे सर्व पक्षांचे नेते…….

आजची महाराष्ट्रातील परिस्थिती भयावह आहे. या परिस्थितीत कोणत्याही पक्षांने राजकरण करू नये असे मला वाटते. तमाम जनता भयभीत आहे आणि महाराष्ट्रतील राजकीय पक्ष हे एकमेकांविषयी द्वेषांचे राजकारण करत आहे. कोणी सरकार पाडण्याचं तर कोणी सरकार पडण्याची वाट पहात आहेत. या लोकांना जनतेचं देणंघेणं नाही. हे सर्व संवेदन शुन्य व चांगल्या भावना गमावून बसलेले राजकारणी आहेत. जनता भयान संकटात भरडली जाते आणि राजकीय पक्ष गिधाडासारखी एखादं राजकीय सावज भेटते का यासाठीच घिरट्या घालत आहे. एखादी गोष्ट घडली की सत्यता न पहाताच न पडताळताच त्याला आरोपीचा पिंजऱ्यात उभं करून जेवढी बदनमी करता येते तेवढी करत आहेत. बरं ते येवढ्यावरच न थांबता आता पुढे कोणाचा नंबर लागणार आहे यांची ही भविष्यवाणी करत आहे. येवढं व्देषाचं राजकारण यापूर्वीच्या संकट काळात कोणीही अनुभवलेलं नसेल.

खरं तर सताधारी असो की विरोधी पक्ष असो या संकटाचा काळात एकत्र यायला पाहिजे. विरोधी पक्षांकडे काही योजना व उपाय असतील तर ते शासना समोर सादर केले पाहिजेत. शासन ऐकत नसेल तर जनेतेच्या कोर्टात सादर केले पाहिजेत. पण आशी कोणती ही योजना न देता न आखता हे एकमांकाचे उखाळ्यापाखाळ्या काढण्यातच दंग आहेत. खेडे गावात एक म्हण आहे “एक मागची शेळी पुढच्या शेळीला म्हणते, अगं तुझं सगळंच उघडं आहे सगळे बघालेत बघ लवकर झाकून घे” पण तिचंही उघडंच आहे हे तिला कळत नाही. आशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येते. आपण भारतीय आहोत. भारतीय संस्कृतीत वाढलो. ही संस्कृती आपण आचराणत आणतोत व आणावी असे हे नेते सार्वजनिक सभेत बेंबीच्या देटापासून ओरडून सांगतात; पण पुराणातील वागे पुराणातच आहेत नाही का?

सध्या सत्ताधारी असलेला पक्ष मागील सत्ताधा-यांनी काहीच केलं नाही असा आरोप करतात. असा आरोप सध्याला दिल्ली पासून गल्ली पर्यंत केला जातो. कोण केलं कोण केलं नाही ही जनता जाणुन आहे पण सध्याला एक प्रथाच पडली आहे. चांगलं तेवढं माझं व वाईट घडलं की ती चूक मागच्या शासनाची आहे. यात माझं शासन निर्मळ आहे. हे घडतेय कसं बघा…..

एका गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. सत्ताधारी सरपंच पडला व नविन निवडून आला. आता हा नविन सरपंच छान पैकी कारभार करू लागाला पण दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वंच म्हणतात माजी सरपंचानं काहीच केलं नाही. त्याच बरोबर गावातील लोकही आता मागील माजी सरपंचाविषयी रंगीत गोष्टी सांगतात. प्रत्येकजण काही तरी तक्रार घेवून नविन सरपंचाकडे येतात. काहीजण म्हणतात, “सरपंच साहेब माझं धुरा फोडला फलाण्यानं.” मग आजी सरपंच लगेच म्हणतो , “जरूर त्या माजी सरपंचाचं हे कारस्थान आहे.” कोणी म्हणतो,”सरपंच साहेब, माझ्या शेतात तमक्यांन जनावरं सोडले.” त्यावर सरपंच म्हणतो, “हं हे ही जरूर माजी सरपंचाचं काम आहे.”आता आजी सरपंचाला त्या गोष्टीचा एवढा सराव झालं की कोणी काही चांगली वाईट तक्रार केली तरी तो लगेच म्हणायचा,”हं हे ही जरूर त्या माजी सरपंचाचं काम आहे.” एके दिवशी आजी सरपंचाच्या नोकराने पळतपळत येवून सांगितलं,” साहेब तुमच्या पत्नीला मुलगा झाला आहे.” पण सरपंच सवयी प्रमाणे म्हणाला,” हं हेही जरूर माजी सरपंचाचं काम आहे.”

सध्याला देशात, महाराष्ट्रात तरी असंच राजकारण चालू आहे. प्रत्येक पक्षात दुसऱ्या पक्षातील नेत्या विषयी आगदी ठासून व्देष भरलेला आहे. खरं तर प्रत्येक आजी माजी मंत्र्यांनी पदाचं मान राखलं पाहिजे. मग ते पद लहान असो की मोठा. आजी माजी यांनी एकमेकांचा मान राखून काम केले पाहिजे; पण येथे खऱ्या लोकशाहीचा कारभारी, लोकशाहीचा राजाला हे राजकारणी लोक एकमेकांचं व्देष करत विसरले आहेत. यांच्या सत्तेच्या ललसेपोटी जनता संकटात भरडली जात आहे. या भयान संकटात सत्ताधारी व विरोधी पक्ष एक कलमी कार्यक्रम राबवत आहे. ते म्हणजे “नवरा (सामान्य जनता) मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे” महाराष्ट्राच्या तमाम जनतेकडून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्याना विनंती आहे की व्देषाचं, सत्तेच्या लालसेचं राजकारण बाजूला सारून महाराष्ट्राच्या जनेतला अधार द्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद उपभोगलेले सात आठ आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांनी राजकारण कक्षेचा बाहेर पडून काम केलं तर या कराल संकटातून बाहेर कसे पडू याचं मार्ग, नियोजन व उपाय करता येईल. असं करून गोरगरिब जनतेला संकटाच्या बाहेर काढता येईल.

नेता कोण? जो जनतेला योग्य अचूक मार्ग दाखवतो (Who leads the people on right path) व त्या रस्त्यावरून मार्गक्रमण करून जनतेची भरभराट करतो तो खरा नेता.

महाराष्ट्र जनतेच्या वतीने विनंती करण्यात येते की सत्ताधारी पक्ष, सर्व विरोधी पक्ष व आजी माजी मुख्यामंत्री, उपमुख्यमंत्री ,मंत्री, आमदार व खासदार यांनी एकत्र येवून सध्या चाललेलं राजकीय नाटक बंद करून या भयान संकटात लोकांना भावनिक व आर्थिक आधार देवून नविन उभारी द्यावी, हीच अपेक्षा………

M.R.RATHOD

राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली “
काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड – ६ ९९२२६५२४०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *