महाराष्ट्रा प्राण तडफडला….

नाशिक शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन कोविड रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे प्राणवायू पुरवठा खंडित होऊन तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांत १२ पुरुष आणि १० महिलांचा समावेश असून, या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले. बुधवारी सकाळच्या सुमारास मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नांदुरुस्त असल्याने त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले त्यावेळेस दुरुस्तीचे काम सुरू असताना ऑक्सिजन टाकीचा नादुरुस्त असलेला कॉक पूर्णपणे तुटला. नवीन कॉक बसवून गळती थांबविण्यासाठी २ तासांचा कालावधी लोटला. तोपर्यंत ऑक्सिजन टाकी रिकामी झाली होती. दुपारी २ वाजता पर्यायी टँकर पुरविला गेला त्याद्वारे टाकी भरण्यात आली.

या २ तासाच्या कालावधीत हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठाचा दाब पूर्णपणे कमी झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण हे एका पाठोपाठ दगावण्यास सुरुवात झाली. तब्बल २२ रुग्ण या दुर्घटनेत दगावले. जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या दुर्दैवी घटनेची संपूर्णपणे चौकशी केली जाईल आणि दोषी असणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकीकडे ऑक्सिजनअभावी नाशिकच नव्हेतर, राज्यभरात रुग्णालयांत बेड मिळत नसताना दुसरीकडे मात्र उपलब्ध ऑक्सिजनची गळती होऊन रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ आल्याने व्यवस्थेची हलगर्जी समोर आली. या घटनेच्या उच्चस्तरीय चाैकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

नाशिक शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात एकूण १५७ बेडची क्षमता असून, हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरलेले आहे. १३१ रुग्ण ऑक्सिजन व १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यातील ६३ रुग्ण गंभीर होते. रुग्णालयात महिनाभरापूर्वीच ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली. ही टाकी ऑक्सिजनने भरताना नोझल तुटल्याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळती सुरू झाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.

तोपर्यंत रुग्णांचे प्राण कंठाशी आले होते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे तंत्रज्ञ आणि पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी रुग्णांचे नातेवाईकही कोविड कक्षात धावले. डॉक्टर्स, कर्मचारी आणि नातेवाइकांनी छातीवर दाब देऊन रुग्णांना पम्पिंग करून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक रुग्ण अगदी नातेवाइकांसमोर दगावले.

रुग्णालयातील या दुर्घटनेनंतर प्रत्येक जण आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी धावपळ करू लागला. महापालिकेने गंभीर रुग्ण तातडीने हलवण्याची तयारी केली. येथील पाच रुग्ण अन्यत्र स्थलांतरित केल्याने ते बचावले. चार रुग्णांना बिटको रुग्णालयात तर एकाला समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे या धावपळीतही पाच जणांचे प्राण वाचवण्यात यंत्रणेला यश आले. परंतु, व्यवस्थेने योग्य वेळी काळजी घेतली असती तर हकनाक बळी गेलेच नसते, अशा संतप्त भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

ऑक्सिजन टाकीची गळती कशी झाली, असा प्रश्न या दुर्घटनेनंतर केला जात असून, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकीतून वेपोरायझरमध्ये द्रवरूप ऑक्सिजन पाठविण्यासाठी असलेल्या पाइपलाइनला गळती लागली. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सकृतदर्शनी आढळल्याचे सांगितले. या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेने तातडीने शहरात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीच्या तंत्रज्ञांना पाचारण केले. त्यांनी तातडीने त्या ठिकाणी वेल्डिंग करून गळती थांबविली. पण, तोपर्यंत २४ रुग्णांनी प्राण गमावले होते. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे तर नाशिक महापालिकेनेही पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या रुग्णालयाच्या तळमजल्यावर काही ऑक्सिजन सिलिंडर असल्याचे कळल्यावर कर्मचारी व नातेवाईक ते घेऊन कक्षात धावले. दरम्यानच्या काळात दुर्घटनेची माहिती कळताच जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून तातडीने पंधरा जम्बो सिलिंडर या रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही ऑक्सिजनचा
पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने या धावपळीत २२ रुग्णांचा मृत्यू झाला.

नाशिक ऑक्सिजन टॅंक गळती दुर्घटना प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 304 (अ) खाली सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करायचे काम सुरू होतं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटलं आहे. तर नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या तपासासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण तपास व्हावा तसेच भविष्यात अशी घटना कधीही घडू नये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील ही समिती देईल असे टोपे यांनी सांगितले. या समितीमध्ये डॉक्टर, प्रशासक आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे असंही ते म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये 150 रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन टाकीमधून गळती झाल्याने अर्धा तास इथला ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याचं समजतंय. त्या वेळात 22 जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, असं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं.

टेक्निकल इंजिनियर पाठवून लिकेज थांबवलंय. 25 टक्के ऑक्सिजन शिल्लक आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे 22 लोक दगावले आहेत. ऑक्सिजनवरच्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालतं. पण व्हेंटिलेटरवर असलेल्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालत नाही. चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटलं आहे.

हा तांत्रिक विषय आहे. एका ठिकाणहून लीक झालं, त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि अपघात झाला. आता वेल्डिंग करत आहोत. हा प्रॉब्लेम लवकरच सुटेल. मी डॉक्टर आहे, मला तांत्रिक गोष्टी कळत नाही, अशी प्रतिक्रिया झाकिर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन राऊते यांनी दिली. रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण होते, 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते अशीही माहिती त्यांनी दिली.

नाशिकची ऑक्सिजनची रोजची मागणी 139 मेट्रीक टन इतकी आहे, तर रोज 84 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतोय. मृतांचा हा आकडा 30 ते 35 होऊ शकतो, असा आरोप शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केलाय.

रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांचे नातेवाईक आक्रोश करताना दिसत आहेत. दोन तासांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने आमच्या कुटुंबीयांना प्राण गमवावे लागले असं त्या परिसरातील नातेवाईक म्हणत आहेत. नाशिकमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्देवी आहे. हे अतिशय व्यथित करणारं आहे. अन्य रुग्णांना मदत पुरवून त्यांना आवश्यक असल्यास योग्य ठिकाणी हलवण्यात यावं. आम्ही याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करतो”, असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नाशिकमध्ये झालेली घटना ही हलगर्जीपणामुळे आहे असं माजी खासदार किरीट सौमय्या यांनी म्हटलं. “नाशिकच्या रुग्णालयात एवढा रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा अनियमित झाल्याने झाला आहे. मी नाशिकला 22 मार्च रोजी भेट दिली होती. म्युनिसिपल कमिशनर आणि सिव्हिल सर्जन यांना मी इशारा दिला होता. हलगर्जीपणासाठी ठाकरे सरकार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी मागणी करतो. हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेली कोव्हिड हत्या आहे,” असं माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.

“नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील घटना धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून बावीस जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यातली ही आठवी घटना आहे. कुठे शॉर्ट सर्किट होतं, रुग्ण दगावतात. याची चौकशी, अहवाल, कारवाई कशाचा कशाला पत्ता नाही. तातडीने याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अन्य रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळायला हवी,” असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

नाशिकची घटना व्यथित करणारी आहे. मृतांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मृत रुग्णांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सगळे सहभागी आहोत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ही अतिशय दुर्देवी घटना आहे. याप्रकरणी सखोल चौकशी अहवाल आम्ही घेऊ. आम्ही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही असं अन्न आणि औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन तब्बल २२ रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेचे पडसाद गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातही उमटण्याची चिन्हे आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना आवश्यक उपचार व सुविधा देण्यात सरकारी प्रशासने कमी पडत असल्याकडे आणि अव्यवस्थापनाकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील महिला वकील स्नेहा मरजाडी यांनी केली असून त्याविषयी पुढील सुनावणी झाली आहे. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला या घटनेविषयी उत्तर द्यावे लागले.

देहरादून शहरातील राजकीय दून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री एकाच वेळी अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे ऑक्सिजन लाईनमध्ये प्रेशर वाढल्यानं रुग्णांना पुरवठा करण्यास समस्या जाणवली. अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांसोबत संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दून हॉस्पिटलच्या सूत्रांनुसार, मंगळवारी रात्री जवळपास १०० पेक्षा अधिक रुग्णांना एकाच वेळी ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटपासून लाईन सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच नियोजन केले. एकाच वेळी ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावर ताण आला. त्यामुळे रुग्णांना गरजेप्रमाणे ऑक्सिजन पुरवणं हॉस्पिटल पुढे समस्या निर्माण झाली. आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं कळताच मेडिकल स्टाफने अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यानंतर प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संचालकांशी संपर्क साधला. रात्री उशीरा तज्ज्ञांसोबत मिळून स्टाफने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सगळ्या लाईन तपासल्या आणि पुरवठा सुरळीत केला. याठिकाणी डॉक्टर म्हणाले की, जर वेळीच मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजनची व्यवस्था केली नसती तर नाशिकसारखी दुर्घटना घडली असती.

नाशिकमध्ये जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा डॉक्टर्स, वॉर्डबॉय आणि परिचारिकांची एकच धावपळ उडाली. ऑक्सिजन पुरेशा दाबाने मिळावा, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. जे १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, त्यांची अवस्था सर्वाधिक
बिकट होती. तसेच ऑक्सिजनवर असलेल्या १३१ पैकी सुमारे निम्मे रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांनादेखील ऑक्सिजनची नितांत आवश्यकता होती. अचानक उद्‌भवलेल्या या पेचप्रसंगामुळे रुग्णालयातील सर्व रुग्णांकडून डॉक्टरांचा पुकारा होऊ लागला. अत्यवस्थ रुग्णाजवळ थांबून पम्पिंग करण्याशिवाय त्यांना काहीच करण्यासारखे उरले नव्हते. ज्या रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या परिसरातच थांबून होते, त्यांनी तातडीने आतमध्ये धाव घेत आपल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली.
कुणी डॉक्टरांच्या नावाने हाक मारतोय, कुणी एखाद्या वॉर्डबॉयचा हात धरून त्याला आपल्या पेशंटजवळ येण्याची विनंती करतो, कुणी सिस्टरसमोर रडतोय, ओरडतोय.. सर्वत्र अंदाधुंदी, गोंधळ माजल्याचे हृदयद्रावक चित्र हॉस्पिटलमध्ये दुपारी साडेबारापासून सुमारे दोन तासांहून अधिक काळ सुरू होते.

श्रद्धांजली

ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेने अतिव दुःख झाले आहे. कुटुंबातील सदस्यांना गमावणाऱ्या नातेवाइकांप्रति संवेदना व्यक्त करतो आणि इतर सर्व रुग्णांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो.

  • रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

नाशिक येथील रुग्णालयातील ऑक्सिजनगळतीची दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात जीवितहानी झाल्यामुळे व्यथित झालो आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी शोक व्यक्त करतो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नाशिकमधील अपघाताची बातमी ऐकून मी दु:खी झालो आहे. यात ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, त्यांच्या नुकसानीबद्दल संवेदना. इतर सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

नाशिकमध्ये निरपराध रुग्ण दगावल्याने तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना शोक संवेदना व्यक्त करतो. बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो.
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

ऑक्सिजनगळतीची दुर्घटना धक्कादायक, मन हेलावणारी आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. या दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न आहे.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे २२ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे.

मध्यरात्री साडेतीन वाजता विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण 39 रुग्ण उपचार घेत होते. प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमधील एसीचा स्फोट झाल्यानं ही भीषण आग लागली. त्यानंतर आयसीयूतील 4 रुग्ण आणि नर्सिंग स्टाफ बाहेर आले. तर सर्व नॉन कोविड रुग्ण सुखरुप असून त्यांना इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे.

वसई-विरार महापालिकेच्या महापौरांनी बोलताना सांगितलं की, “मध्यरात्री 3 वाजून 13 मिनिटांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आयसीयूमध्ये 17 रुग्ण होते. दुर्दैवानं त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. रुग्णालयातील एसीची स्फोट झाल्यामुळे आग लागली.

संपादकीय

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *