नांदेड
कधीकाळी अवचित भेटीला येणाऱ्या कर्टुले, कुंजरनाय, सुरणघोळ, शेवगा तरोडा, केणा, सुरकंद, चुच या रानभाज्या एकाच जागेवर सहज उपलब्ध झाल्याने ग्राहकांना कोविड -19 च्या वातावरणातून अस्सल नैसर्गिक जैवविविधतेच्या जवळ जायची संधी मिळाली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून घरोघरी असलेल्या आजीच्या बटव्यातील ही औषधगुण संपन्न व नैसर्गिक संपदा पुन्हा भेटीला आल्याने स्वाभाविकच याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी अधिक पसंती दिली. आदिवासी दिनाचे औचित्य साधत या एकदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, बाळासाहेब कदम, आरती सुखदेव, पोखरणी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.देविकांत देशमुख आदि उपस्थित होते. सेंद्रीय, नैसर्गिक अर्थात विषमुक्त फळ भाजीपाल्यांना आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. नांदेड जिल्ह्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या विविध रानभाज्या अधिक प्रमाणात आहेत. या रानभाज्या ग्राहकांपर्यंत पोहचणे आवश्यक असून कृषी विभाग आणि आत्मा यांचे अधिकारी यापुढेही विविध छोटेखानी उपक्रम घेतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. महिन्यातील निवडक दिवसासाठी सेंद्रिय, नैसर्गिक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी एखादे विक्री केंद्र कसे सुरु करता येईल, याचाही आम्ही विचार करु असेही ते म्हणाले.या महोत्सवात40 पेक्षा अधिक प्रकारच्या फळ व रानभाज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या होत्या. दोन तासात सुमारे दोनशे ग्राहकांनी भेट दिली.
विविध तालुक्यातील शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले होते. यात गंगाधर मारोतराव हनमानगे, जनार्दन विठ्ठल पाटील, प्रकाश कद, बंडू परसराम जाधव, विठ्ठल नारायण लष्करे, दत्ता दिगंबर खानसोळे, अंबिका महिला बचत गटाच्या संचालिका अनिता गणेश पाटील, वसुधा गोल्ड गांडूळ खत प्रकल्प बळवंतराव पोळ, आत्मनिर्भर किसान उत्पादक कंपनीचे दत्ता पाटील, केशव हनुमंते, समृद्धी कृषी महिला मंडळाचे सौ. वनिता साहेबराव मोरे, अमोल सावंत, संदीप डाकुलगे, भगवान इंगोले, सचिन इंगोले, कैलाश हनमंते, गजानन पावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते