देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सीजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे. यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे : पीएसए (प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सिजन युनिट मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे.
आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये याचे आशादायी परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या दाबाने 93% ते 96 % शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सीजन उत्पादन साध्य करता येते. या ऑक्सीजन वायूचा उपयोग विद्यमान कोविड रुग्णालयांमध्ये तसेच येऊ घातलेल्या कोविड -19 विशेष सुविधा केंद्रांमध्ये ऑक्सीजनचा अविरत पुरवठा करण्यासाठी कोविड उपचारासंबंधीत गरजा भागविण्यासाठी केला जाऊ शकतो.
नायट्रोजन युनिट ऑक्सिजन युनिटमध्ये कसे रूपांतरित केले जाऊ शकते? ” याविषयी या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे आयआयटी मुंबईचे अधिष्ठाता (संशोधन आणि विकास) प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेल्या नायट्रोजन संयंत्र रचनेची योग्य जुळवाजुळव आणि कार्बन ते झोलाइटमधील रेण्वीय चाळणी बदलून हे केले गेले आहे. कच्चा माल म्हणून वातावरणातील हवा शोषून घेणारी अशी काही नायट्रोजन संयंत्रे भारतभर विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळे हे प्रत्येक औद्योगिक युनिट आपल्या नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या संयंत्रात रूपांतर करू शकेल,अशाप्रकारे, सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत हे आपल्यासाठी सहाय्य्यकारी ठरू शकते, “असेही अत्रे यांनी नमूद केले. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स आणि स्पॅन्टेक इंजिनिअर्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
आयआयटी मुंबईच्या रेफ्रिजरेशन आणि क्रायोजेनिक्स प्रयोगशाळेमधील नायट्रोजन सयंत्र सुविधेतील पायाभूत सुविधांचा वापर करून त्याचे ऑक्सिजन संयंत्रात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेचे मूल्यांकन करण्यासाठी स्पॅन्टेक इंजिनियर्सनेआवश्यक घटक प्रयोगशाळेत स्थापित केले. प्रयोगासाठीची ही रचना तीन दिवसात विकसित करण्यात आली आणि वर नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीच्या चाचण्यांनी आशादायी परिणाम दर्शविला. या प्रकल्पातील सहयोग आणि भागीदारीबद्दल, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित शर्मा यांच्यासह स्पॅन्टेक इंजिनियर्सचे प्रवर्तक आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी (1970 बॅच) श्री. राजेंद्र तहिलियानी, स्पॅन्टेक इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राज मोहन आणि तळमळीने काम करणारेइतर सदस्य यांचे प्रा. मिलिंद अत्रे यांनी आभार मानले आहेत .
अनेक अडचणींचा सामना करत हा प्रायोगिक प्रकल्प वेळेत यशस्वी केल्याबद्दल चमूचे अभिनंदन करताना अमित शर्मा म्हणाले की, “आयआयटी मुंबई आणि स्पॅन्टेक इंजिनियर्स यांच्याशी भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे आणि सध्याच्या ऑक्सीजन संकटात देशाला मदत करण्याच्या दृष्टीने अस्तित्त्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून आपत्कालीन ऑक्सिजन निर्मितीसाठी एक अभिनव उपाय शोधायला हातभार लावत आहोत. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अशाप्रकारच्या भागीदारीमुळे आत्म-निर्भर भारताच्या दिशेने आपली वेगाने वाटचाल होऊ शकते.” आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभासिस चौधरी यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि सांगितले की, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील अशाप्रकारची भागीदारी आपल्या देशाच्या वाढीसाठी आणि यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यानं लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे... हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत... त्यामुळे एकूणच देशात गंभीर वातावरण आहे. अशात अनेक दिग्गज मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी व ऑक्सिजन सिलेंडर दान केले जाणार आहेत.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं ‘Mission Oxygen’ या उपकरर्मात सहभाग घेतला आहे आणि त्यानं स्वतः १ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानं इतरांनाही या चळवळीत हातभार लावण्याचं आवाहन केलं आहे. तो म्हणाला,”कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही सध्याच्या तासाची गरज बनली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहून दुःख होत आहे. २५०+ अधिक युवा उद्योजकांनी मिशन ऑक्सिजनची सुरूवात केली आहे. त्याच्या माध्यमातून ते निधी गोळा करून ऑक्सिजन खरेदी करणार आहेत आणि देशातील हॉस्पिटल्सना दान करणार आहेत.”
सचिननं त्याच्या पोस्टमध्ये त्यानं किती मदत केलीय हे जाहीर केलं नसलं तरी इंग्रजी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार त्यानं १ कोटी दान केल्याचे समजते. सचिननं नुकतीच कोरोनावर मात केली आणि या व्हिडीओत त्यानं त्याचाही उल्लेख केला. तो म्हणाला,”मागील महिना माझ्यासाठी खडतर होता. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मी २१ दिवस आयसोलेट झालो.’तुमच्या प्रार्थना व शुभेच्छा, माझ्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या प्रार्थना व शुभेच्छा आणि डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ… त्यांनी माझ्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि मला बरं केलं. या सर्वांचे खूप खूप आभार. ”
महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आली आहे. राज्यात दररोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. राज्याला ऑक्सिजनचा सर्वाधिक तुटवड्याला सामोरं जावं लागत आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलेय. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला होता तेव्हा राज्यात सॅनिटायझरची कमतरता होती. तेव्हा राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करुन कोरोना विषाणू संसर्गाच्या लढ्यात योगदान दिलं होतं.
राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होतोय. देशभरात कोरोनाचा हाहा:कार सुरु असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. “कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसऱ्या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या”, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
“राज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनच्या बाबत परिपूर्ण असलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. “राज्याला सध्या 1715 टन ऑक्सिजन लागत आहे. तेवढं पूर्ण ऑक्सिजन पुरवलं जात आहे. रेमडेसिवीरचा वापर मर्यादित प्रमाणात करा. आज दहा ते पंधरा हजार इंजेक्शन गरजेपेक्षा कमी पडत आहे. पण त्याचा अनावश्यक वापर करुन त्याचा रुग्णांचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी”, अशी सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज २९ एप्रिल रोजी दिवसभरात तब्बल 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. गेल्या चोवीस तासात तब्बल 771 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 68 हजार 537 रुग्ण बरे झाले. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट तर येऊच नये पण आपण आधीच मोठ्या प्रमाणावर आॅक्सिजनची निर्मिती केली पाहिजे. त्यासाठी महान दानशूर दात्यांची गरज आहे.
संपादकीय
गंगाधर ढवळे,नांदेड