योग हा शब्द संस्कृत भाषेतील युज् या मूळ धातूपासून बनलेला याचा अर्थ जोडणे, एकत्र आणणे, मिलन होणे, लक्ष केंद्रित करणे व एकाग्र करणे असा आहे.
आपण सर्वप्रथम भगवद्गीतेच्या अध्याय दुसरा मधील दोन श्लोकांचा विचार करूया.
1) योगस्थःकुरु कर्माणि
सग्डं त्यक्त्वा धनज्जय
सिध्दयसिध्दयोः समो भुत्वा
समत्वम् योग उच्यते [ भगवद्गीता अध्याय २ ओवी 48 ]
सुख दुःखामध्ये मनाचा जाणारा तोल सावरणे किंवा राखणे म्हणजेच योग.
यश आणि अपयश या बद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपले कर्म करणे अशा समभावालाच योग असे म्हटले जाते.
योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परम तत्वावर मन एकाग्र करणे होय.
उदाहरण
1) एका गावामध्ये एक छोटा शेतकरी होता त्याची अर्धा एकर जमीन होती. त्यात त्याने उसाचे पीक घेतले. गुऱ्हाळ घातले व गुळ एकदम बाजारात आणला. या बाजारी गुळाला चांगला भाव मिळाला .त्याला गुळाचे पन्नास हजार रुपये आले .त्यापूर्वी त्याने कधीही एक हजार रुपयांच्या नोटा पाहिल्या नव्हत्या .पन्नास हजारांच्या नोटांकडे पाहून तो मोठ्याने हसू लागला. आयुष्यामध्ये जेव्हा अत्यंतिक सुखाचा क्षण येतो तेव्हा मनाचा तोल जातो.
२) राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला.
एक मनुष्य अपघातामध्ये मरण पावला.कोणीतरी ही बातमी त्याच्या भावाला सांगितली.मानसिक धक्क्यामुळे त्याच्या भावाचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आयुष्यामध्ये जेव्हा अत्यंतिक दुःखाचा क्षण येतो तेव्हा ही माणसाच्या मनाचा तोल जातो.
[ सुख – दुःखामध्ये मनाचा जाणारा तोल सावरणे किंवा राखणे म्हणजे योग. ]
2)
बुध्दियुक्तो जहातीह
उभे सुकृतदुष्कृते
तस्माद्योगाय युज्यस्व
योगः कर्मसु काैशलम् [ भगवद्गीता अध्याय २ ओवी क्र.50 ]
Skill in action is called YOGA
भक्तीपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मा पासून मुक्त होतो म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे.
उदाहरण-
1) शिक्षक अनेक असतात पण एखादा शिक्षक असा असतो की त्याचा तास सुरू झाल्यानंतर शिक्षक व विद्यार्थी एका वेगळ्या भावविश्वामध्ये जातात व वेळेचे भान कोणालाही राहत नाही.हे त्या शिक्षकाचे त्या विषयांमध्ये संपादन केलेले कौशल्य असते.
2) डॉक्टर अनेक असतात परंतु एखाद्याच्या दवाखान्यात आपण गर्दी करतो हे त्या डॉक्टरचे त्याच्या व्यवसायात संपादन केल्याने कौशल्य असते.
दैनंदिन जीवनात कामे आपण मन लावून जीव ओतून केली तर त्यामध्ये आपल्याला कौशल्य प्राप्त होते व ही कर्मा मधील कुशलता म्हणजेच योग.
[ तिसरी व्याख्याः- ]
आत्मा व परमात्मा यांचे मिलन म्हणजे योग.
[ Union of soul with supreme Soul is called YOGA ]
आत्मा व परमात्मा ही संकल्पना समजणे व समजावणे अवघड.
माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न करतो हा माझा पेन आहे पेन म्हणजे मी नव्हे.मी पेनपेक्षा वेगळा आहे.
हा माझा हात आहे.हात म्हणजे मी नव्हे.मी हातापेक्षा वेगळा आहे.
हे माझे शरीर आहे. माझे शरीर आहे म्हणणारा शरीरापेक्षा वेगळा असतो. शरीर पडले तरी तो पडत नाही.त्याला आत्मा असे म्हणतात. या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणजे योग होय.
परमात्मा समजण्यासाठी सागराचे उदाहरण घेता येईल. समुद्रावर लाटा येतात क्षणभर त्यांचे अस्तित्व असते.पुन्हा त्या सागराशी एकरूप होतात. लाट ही पाण्याची बनलेली असते व सागर पाण्याचा बनलेला असतो. लाट म्हणजे आत्मा व सागर म्हणजे परमात्मा.
[ चौथी व्याख्या ]
पतंजली ऋषीनी योगदर्शन मधील समाधिपाद या प्रथम अध्यायामध्ये सुंदर अशी योगाची व्याख्या केलेली आहे.
योगश्चित्तवृत्तिनिरोधः ||
चित्त म्हणजे मनच होय.मनामध्ये शब्द, रूप , रस , गंध व स्पर्श या विषया संबंधी विचार रुपी तरंगे निरंतर उठत असतात.तसेच काम , क्रोध , लोभ , मोह , मद व मत्सर आदी युक्त एक भाव दशा बनत राहते. या चित्ताच्या वृत्तींचा निरोध झाल्यानंतर जी मानसिक अवस्था प्राप्त होते त्यालाच योग म्हणतात. चित्ता मध्ये सतत विचार म्हणजेच वृती किंवा प्रतिक्रियात्मक प्रवाह अखंड चालू असतात.विचार चालू नाही अशी व्यक्ती सापडणेच मुश्कील.मग ती वृती कोणत्याही प्रकारचे असू शकेल. निरोध म्हणजे वृत्ती किंवा विचार कमी करणे विचारांची मालिका खंडित करणे होय. वृत्तीची संख्या कमी कमी करीत आणून अत्यंत सुक्ष्म विषयावर स्थिरावणे किंवा संस्कार मात्र शिल्लक राहणे ही अवस्था होय. यालाच योगात समाधीची अवस्था म्हटले जाते.या चित्तवृत्तीच्या निरोधाच्या अवस्थेत मनावरील संस्कार , बुद्धी ,अहं सर्व काही विलयास प्राप्त होतात.शिल्लक राहतो तो निखळ , निर्मळ , आत्मिक आनंद ,रजोगुण व तमोगुण पूर्णतः लय पावतात. अशी ही एकाग्रतेची अवस्था म्हणजे चित्तवृत्ती निरोधाची अवस्था होय.
[ पाचवी आधुनिक व्याख्या जी सकाळ वृत्तपत्रात वाचन करण्यात आली ]
ती अशी
सबबी सोडून आरोग्यासाठी वेळ काढणे म्हणजे योग होय.
मला जमेल अशा सोप्या पद्धतीने योग म्हणजे काय हे आपणास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
श्री.नीळकंठ बापुराव मोरे
योगशिक्षक
संपर्कः- 9545022390
पतंजली योग समिती कंधार
[ करा योग 🧘♀️🧘♂️ राहा निरोग ] 🙏🌹😷🇮🇳