हे आता कुठेतरी थांबले पाहिजे!

मागास लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करण्याची या व्यवस्थेतील काही मुजोर जातींची जन्मजात कुप्रवृत्ती जात नाही. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे दोन समाजात काही कारणांवरून तणाव निर्माण झाल्याची घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष केल्याच्या कारणावरून दुसऱ्या समाजातील तरुणांनी जातीय द्वेषातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित समाजाने केला. त्यानंतर आरोपींवर झालेल्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यानंतर गावाने दलित समाजावर बहिष्कार घातल्याची घटना घडली होती.

गावात दोन समाजात तणाव झाल्यानंतर मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी दलित समाजासाठी बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या दलित तरुणांकडून डेअरीत दूध खरेदी देखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला. तसंच निधन पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडेही घेण्यास मज्जाव करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सदरील घटनेचा वृत्तांत सांगताना दलित समाजातील तरुण दीपक बळवंते याने सांगितले की, गावात द्वेष भावनेतून मध्यरात्री आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आहे. रोहिपिंपळगाव या गावात असाच एक प्रकार १५ वर्षांपूर्वी जयंतीची रॅली काढण्यावरून झाला होता. त्यावेळीही अशाच प्रकारचा मज्जाव केल्याची आठवण एका तरुणाने सांगितली. जुनीच खोड आहे या गावची. भिमजयंती करू दिली नव्हती यांनी 8/10 वर्षा पुर्वी. मग आम्ही बुध्दजयंती केली तयारीनिशी उपपोलीस अधिक्षक बॅनर्जी होते तयारीला दोन चार गुंडाना असा जबरदस्त मार दिला होता की, सगळे शेतात जाऊन बसले होते. ते जयंती झाल्यावरच घरी परतले होते.

आता बहिष्कार काळात दोन दिवसांपूर्वी शेजारील एका वृद्ध व्यक्तीच्या निधनानंतरही गावातील लोकांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडे व अन्य साहित्य उपलब्ध होऊ दिलं नाही. हा अमानुषतेचा कळस नव्हे काय?

‘गावात दोन समाजात या प्रकारचे वितुष्ट कधीही नव्हते. फक्त दलित तरुणांनी मुदखेड येथील जयंती झाल्यानंतर गावात येऊन शिवीगाळ करत आमचा वीज पुरवठा का खंडित केला, असं म्हणत आमच्यावर राग व्यक्त केला. त्यामुळे गावात थोडा तणाव निर्माण झाला. तरीही बाहेरगावाहून येणाऱ्या नेत्यांनी आमच्या गावात येऊन कुठल्याच प्रकारचा तणाव निर्माण करू नये अशी माझी विनंती आहे,’ अशी प्रतिक्रिया गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद दौलतराव शिंदे यांनी दिली आहे.

याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीत गावातील दोन्हीही समाजाची बैठक घेऊन समाजातील वितुष्ट दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढे सामोपचाराने आपापसातील वाद मिटवून घ्यावेत असेही प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी सांगितले.

आझाद पार्टीचे राहुल प्रधान म्हणतात, नांदेड़ जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे बौद्ध समाजावर बहिष्कार टाकल्याबाबत आज भेट दिली. दि.27/4/2021 रोजी करण केळकर याच्या तक्रारीवरून 3 जणांविरोधात ऐट्रॉसिटी दाखल केली होती. आमच्या विरोधात ऐट्रॉसिटी का दाखल केली म्हणून बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यात आला. यात किराणा, पिठाची गिरणी, दूध डेअरी व इतर रोज लागणारी दळण वळणाची साधने देणे बौद्ध समाजाला पुर्णपणे बंद केले होते.

मी या घटनेची पार्श्वभूमी आणि संपुर्ण माहिती नांदेड़चे SP सर आणि ASP सर या दोघांना काल रात्री दिली. त्यामुळे त्यांनी आज सकाळी गावात शांतता कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत बहिष्कार टाकलेल्यांनी दिलगिरी व्यक्त करून सर्वकाही सुरळीत चालू करणार असल्याचे मला बौद्ध समाजाने सांगितले आहे.

तरीही मी मा.जिल्हाधिकारी सर, एस.पी. सर या दोघांना फोन करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी मा.जिल्हाधिकारी सरांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करू आणि पिडीत समाजाला न्याय देऊ, असे आश्वासन दिले आहे.

सामाजिक कार्यकर्ते कनिष्क सोनसळे म्हणतात, रोही पिंपळगाव येते बौद्ध वस्तीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे! मेडिकल दिलं जात नाही, किराणा दिलं जात नाही! नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येते जातीयवाद्यांनी बहिष्कार टाकला आहे. बौद्ध तरुणांवर हल्ला केल्यावर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही झाल्यावर हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. दोन महिन्यापासून बौद्ध याठिकाणी अंधारात राहत आहेत! जाहीर निषेध न्याय मिळालाच पाहिजे! अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत वंजारे या विषयावर मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात की ज्या गावात बहिष्कार घातला जातो त्या गावाला पुरविण्यात येणाऱ्या शासकीय सुविधा व योजना बंद केल्या पाहिजेत. तसेच ज्या समुहावर हा बहिष्कार घालून जीवनावश्यक वस्तू वा सुविधा बंद केल्या जातात त्या प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. असे केल्याने ज्यांच्याकडे पूर्वापार काळापासून संसाधने उपलब्ध आहेत. ज्या वस्तू, दुकाने, सेवा, प्रतिष्ठाने यांच्या जोरावर बहिष्कार घातला जातो, ते निष्प्रभ होतील.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे बहिष्काराचे कार्यक्रम हाती घेतले जातात. मागास समाजाच्या हीनदीन मानसिकता, कमजोरी, लाचारी लक्षात घेता क्रुर पद्धतीचे अन्याय अत्याचार घडतात. देशभरातही तशा अनेक घटना घडलेल्या आपण पाहतो. अहमदनगर नंतर नांदेड हा मागासवर्गीयांवर अत्याचार करणाऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर येऊ पाहत आहे. काही विशिष्ट कालावधीनंतर अशा घटना घडतातच. कंधार तालुक्यातील घोडज येथे अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर गावातील स्वतःला सवर्ण समजल्या जाणाऱ्या एका जातीच्या माणसांनी अरेरावीची भाषा करीत आणि दांडगाई करीत अतिक्रमण केल्याची घटना घडली आहे. ज्या लोकांना आधीच्या कित्येक पिढ्या समता, न्यायासाठी संघर्ष करावा लागला त्यांच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे, हे आता कुठेतरी थांबले पाहिजे!

संपादकीय

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *