आ. रावसाहेब अंतापूरकर गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले!

देगलूर बिलोली मतदार संघाचे विधानसभा सदस्य आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतुन देगलुर बिलोली मतदारसंघातील गंभीर रुग्णांना देगलुर बिलोली तसेच नांदेड या ठिकाणी नेण्यासाठी आमदार निधीतून पाच रुग्णवाहिका मंजुर केल्या होत्या. त्या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर साहेब व जितेशजी अंतापुरकर विविध यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णवाहिका देगलूर तालुक्यातील मरखेल, हणेगाव, शहापुर तसेच बिलोली तालुक्यातील सगरोळी, लोहगाव या ठिकाणी असणाऱ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय जलदगतीने हा निर्णय स्व.आ.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी घेतला होता. या निर्णयाचे समाजमनातून स्वागत होत आहे. गरजू रुग्णांना प्राण वाचवण्यासाठी आवश्यक त्या सेवा वेळेत मिळण्यासाठी या सुविधेचा खूप फायदा होणार आहे.

     काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे १० एप्रिल रोजी शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. परंतु संपूर्ण जनता आदल्या दिवशी दुपारपासूनच अस्वस्थ झाली होती. त्यांचे सुपुत्र जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी ९ एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजता ही घटना घडल्याचे फेसबुक वरुन जाहीर केले होते.  सामान्यांशी नाळ जोडलेला आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. एरवी साधा नगरसेवक म्हटलं तरी त्या नेत्याच्या श्रीमंतीचा थाट डोळे दिपवणारा असतो. मात्र, रावसाहेब अंतापूरकर यांनी कधीही बडेजाव न मिरवता शेवटपर्यंत आपला साधेपणा जपला. एवढंच काय दोनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांचा मुक्काम शेवटपर्यंत भाड्याच्या घरातच होता. 

कोरोनाच्या काळातही अंतापूरकर यांच्या कामात खंड पडला नव्हता. अगदी शेती- बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

साधारण 25 दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 12 दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रावसाहेब अंतापूरकर यांना मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. दरम्यानच्या काळात त्यांना हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता.

सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील जयंतराव उर्फ रावसाहेब अंतापूरकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.

नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

     आता त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसने युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पद देऊन राजकारण सुरू केले आहे. मात्र, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी रावसाहेब अंतापूरकर यांचा दशक्रिया विधी होतो न होतो तोच जितेश हे भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर प्रचार चालविला होता.  

तसेच देगलूर बिलोली मतदार संघात रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त होणाऱ्या जागेसाठी येणाऱ्या काही महिन्यांत पोटनिवडणूक होईलच या अपेक्षेने इच्छुक उमेदवारांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. परंतु जितेश यांच्यामागे माजी मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि सहानुभूतीची लाट पाहता काँग्रेसजनांना हा विजय सोपा आहे असे वाटते आणि जितेशच येणार अशी त्यांची भावना आहे. या संदर्भाने ना. अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीकडून ही पोटनिवडणूक काँग्रेसच लढविणार असल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

या घडामोडींमुळे आता माजी आमदार सुभाष साबणे हे सजग झाले आहेत. त्यांच्याही कार्यकर्त्यांनी देगलूर बिलोलीचा दावेदार- दमदार आमदार अशी विशेषणे लावत हालचाल सुरू केली आहे. कारण काँग्रेसच्या बैठकीत ही जागा शिवसेनेला मिळणार नसल्याचे निश्चित झाल्यानंतर सुभाष साबणे यांच्या मनपातील घालमेल वाढली आहे. पंढरपूरचा इतिहास ताजा असल्यामुळे अनुसूचित जातीच्या या राखीव मतदारसंघात भाजपशिवाय पर्याय नाही असे त्यांना वाटत आहे. पंढरपूरमध्ये विजयी झालेले समाधान आवताडे हे २०१४ मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. २०१९ मध्ये त्यांनी महायुतीविरोधात बंडखोरी केली होती. भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचे निधन झाल्याने आवताडे यांच्या उमेदवारीचा पर्याय खुला झाला. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली. देगलूरमध्ये अंतापूरकर यांचे चिरंजीव असतील. माजी आ. सुभाष साबणे यांच्या संदर्भाने त्यांचाही निवडणुकीचा कार्यक्रम पंढपूरच्या आवताडेसारखाच आहे. फक्त साबणे यांनी बंडखोरी केली नव्हती किंवा तशी गरज उद्भवली नव्हती. देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आणि महाविकास आघाडीचे उणेदुणे काढून विजयाचा मार्ग आखता येईल असे साबणे यांना वाटणे साहजिकच आहे. तेव्हा कदाचित त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग सुकर होईल आणि ते लढतीलही परंतु पंढरपूरची पुनरावृत्ती होईलच हे आत्तातरी सांगता येत नाही.

संपादकीय

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *