अंजू घाऱ्या डोळ्याची ,कुरळ्या केसांची ,गोबरे गोबरे गाल असणारी गोंडस मुलगी होती .ती एका छोट्या गावात राहायची. तिचं घर गावापासून थोडस दूर अंतरावर होतं .घर छोटं होतं पण ,आजूबाजूला खूपच झाडी होती. घराजवळ तलाव होता .पावसाळ्यात तो तलाव तुडुंब भरायचा आणि पाणी खळखळ वाहत असायचे .खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज तिला खूप आवडायचा. ती आईला म्हणायची ,
“आई चल ना .आपण खळखळणारे पाणी पाहून येऊया.”
पण तिची आई तिला थांबवायचीआणि म्हणायची
“जास्त पाऊस पडला की, पाण्याजवळ लगेच जायचं नाही. पाऊस शांत झाला की ,आपण जाऊ.”
तिच्या घरासमोर असणाऱ्या मोठ्या आंब्याच्या झाडावर एक मोर नेहमी येऊन बसायचा. कधीकधी लांडोर सुद्धा त्याच्यासोबत असायची. अंजुला ते खूप भारी वाटायचं .काही दिवसांनी तिला झाडाखाली पडलेल्या पालापाचोळ्यात एक अंडे दिसले. तिच्या घरी आईने कोंबड्या पाळल्या असल्याने तिला कोंबडीचे अंडे कसे असते? हे माहीत होते. बऱ्याच वेळेला तीच कोंबडीची अंडी घरात गोळा करून ठेवायची. पण हे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठे होते .तिने ते अलगद उचलले आणि घरात आईला दाखवायला घेऊन आली आणि म्हणाली
” आई ,ये आई हे बघ किती मोठे अंड आहे हे,कशाचे असेल गं?.”
आईने ते अंडे हातात घेतले आणि ती म्हणाली
“अगं बाळा हे कोंबडीचे अंडे नसून मोराचे अंडे आहे.
अरे वा खूपच छान झाले की, लांडोर आपल्या इथे अंडे घालून गेली.” अंजु लगेच म्हणाली
अंजुच्या आईने ते अंडे घरांमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवून दिले. पुढे काही दिवसांनी कोंबडी अंडी ऊबवण्यासाठी बसवल्यावर त्या अंड्यामध्ये हे मोराचे अंडे त्यांनी ठेवून दिले. थोड्या दिवसांनी मोराचे सुंदर पिल्लू बाहेर आले .ते पिल्लू कोंबडीच्या पिल्लापेक्षा थोडे मोठे होते. पण कोंबडी आपल्याबरोबर त्या पिलाला सुद्धा फिरवायची. त्यालाही किडे पकडायला शिकवायची. ते ही त्यांच्याबरोबर थोडे थोडे दाणे खायचे. असं रोजच चाललं होते. अंजू तर या पिलाची खूपच काळजी घ्यायची. तिच्या मदतीला तिचा दादुही असायचा. एक दिवस काय झाले. त्या पिलाच्या डोक्यातून छोटा छोटा तुरा बाहेर डोकावू लागला.तिने ते पहिले. अंजू लगेच उड्या मारू लागली .
“आई अगं पाहा ना ,या पिलाच्या डोक्यातून काय बाहेर येत आहे.?”
त्यावर तिची आई म्हणाली,
” हा मोर आहे आणि याच्या डोकीवर तुरा येतो आहे.”
खरंच म्हणत तिने जोरात टाळी वाजवली.
“आता याला पिसारा पण येणार. रंगीत रंगीत पिसारा .किती छान दिसतो ना आई. कधी होईल हा मोठा ?आणि कधी पिसारा फुलवून हा नाचेल .”?
त्यावर आई म्हणाली,
” तू जशी मोठी होशील तसाच मोरही मोठा होईल .तू आधी लहान होतीस आणि आता पहिलीमध्ये शाळेत जातेस. तू थोडी मोठी झालीस .तसाच मोरही मोठा होईल.”
जेव्हा ती शाळेत जायची तेव्हा, शाळेत या मोराच्या गोष्टी आपल्या मैत्रिणींना आणि तिच्या बाईंना सांगायची. त्यांनाही अंजूच्या मोराची गोष्ट खूप आवडायची. मोर जसा मोठा झाला तसा तो झाडावर जाऊन बसू लागला .दिवसभर तो आजूबाजूच्या शेतात फिरू लागला .पण रात्रीच्या वेळी त्याच झाडावर येऊन बसू लागला. काही दिवसांनी मोराला सुंदर पिसारा आला.अंजू आणि दादूचा आनंद गगनात मावेना.
” आई बाबा किती सुंदर दिसायला लागला आपला मोर. त्याला आता छान छान पिसारा आलाआहे .”
म्हणत ती मोराकडे कौतुकाने पाहू लागली.
एक दिवस आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेले. ढगांचा गडगडाट सुरु झाला. पाऊस येतो आहे असं वाटू लागले. अंजूच्या आईने बाहेरच्या सामानाची आवराआवर केली. गोठ्यात जनावरे बांधली. कोंबड्या खुरुड्यात ठेवल्या. तेवढ्यात पावसाचे थेंब पडू लागले. आणि मोर झाडाखाली पिसारा फुलवून थुई थुई नाचू लागला .अंजू मोठ्याने ओरडली.
” अरे दादू तो बघ मोर ,पिसारा फुलवून नाचतोय .किती छान ना.”
आणि लगेचच ती गाणे म्हणू लागली.
” नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच .”
नाचणाऱ्या मोराची गोष्ट लगेच तिने शाळेत जाऊन सांगितली .त्या दिवशी खूप मोठा पाऊस पडला .सर्व ओढे-नाले खळखळ भरून वाहू लागले. अंजुच्या घराजवळच्या तलाव भरून वाहू लागला. तलावात काही दिवसांनी वेगवेगळे पक्षी आले .बदक, बगळा, राजहंस, कोकीळ, इ.खूप सुंदर पक्षी होते .ते पाहण्यासाठी दूरवरून लोक या तलावावर यायचे. एक दिवस अंजुच्या बाईनी शाळेची सहल तलावावर पक्षी पाहण्यासाठी आणली .तिने आपल्या मित्र-मैत्रिणींना आपलं घर आणि तलावातील येणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगितली. तिने तिच्या आईला आपल्या शाळेतील मुलांची ओळख करून दिली. असे किती छान दिवस चालले होते. तिच्या शाळेजवळ वेगवेगळी झाडे लावली होती. त्या त्या झाडांची सर्वजण मुलं निगा राखायचे. अंजू ही त्या मुलांना मदत करायची. आईकडून वेगवेगळ्या बिया ती शाळेत घेऊन यायची .तिची पहिली संपत आली तोपर्यंतच कोरोना आला.रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शाळा बंद केल्या. शाळा बंद शिक्षण सुरू झाले. मोबाईलवरच अंजुला आपल्या बाई आणि मैत्रिणींची भेट होऊ लागली .तिला आता घरी राहणे नकोसे झाले होते . पण काय करणार ?नाईलाज होता .बाईंनी सर्वांना एक उपक्रम दिला. सर्वांनी घराजवळ झाडांची लागवड करायची. घरच्या अभ्यासाबरोबर तिने काही फुलझाडांची व फळझाडांची लागवड आईबाबांच्या मदतीने केली .तिचा दादू आणि ती त्या झाडाची निगा राखू लागली. जेव्हा ऑनलाइन क्लास होई तेव्हा ,ती मोठी होणारी झाडे आपल्या सर्व वर्ग मित्र-मैत्रिणींना दाखवू लागली. पिसारा फुलवून नाचणारा मोर ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांना दाखवला. अंजूची झाडे पाहून तिच्या वर्गातील इतर मुलांनीही झाडांची लागवड केली. ती ही अंजुसारखी वृक्ष लागवडीच्या कामात गुंतली.अशाप्रकारे उदास झालेली मुले पुन्हा कामाला लागली.
लेखिका-रंजना सानप
जि. प.शाळा सुर्याचीवाडी
ता. खटाव, जि. सातारा
मोबाईल नंबर-९०४९५४८३२३