कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल! भाग : एक

                      स्मशानभूमीत प्रेते दहनाच्या प्रतिक्षेत आहेत. राकट नव्हे, कणखर नव्हे हा देश मुडद्यांचा देश बनत चालला आहे. सर्वत्र जगण्याच्या अनिश्चितकालीन भांबावलेपणावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. स्मशानभूमी सतत धुमसत आहे. शवांच्या आगमनापूर्वी स्मशानभूमी रचलेल्या सरणांनी मरणांचे अलंकार घालून नटू लागली आहे. एकाच सरणावर अनेक प्रेते असे आगतिक समीकरण जुळून येऊ लागले आहे. जळत्या प्रेतांनी धैर्यशील मनेही जळू लागली आहेत. सगळीकडे ‘त्राही माम: त्राही माम:’ अशी परिस्थिती उद्भवली आहे. माणसांची राख होत असतांनाच भावभावनांचीही दयनीय अवस्था होते आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. कोरोनाची तिसरी लाटेची भिती दाखवण्यात येत असली तरी ती नक्कीच थोपवता येईल. 
                       गेल्या काही दिवसांपासून कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने वारंवार केंद्र सरकारला फटकारले आहे. राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवून आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा शाश्वत उपाय आहे. त्यातून तिसरी लाट थोपवली जाऊ शकते. अनेक मृत्यू रोखले जाऊ शकतात. हजारो कुटुंबाचे मानसिक त्रास कमी केले जाऊ शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पण ही लाट नेमकी कधी येणार, याचा प्रादुर्भाव किती काळ असेल, यातून कसे सरंक्षण करायचे याबाबत अद्याप काहीही सांगतले जात नाही.  देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वजण त्रस्त आहेत. ही लाट ओसरण्याची चिन्हं दिसत नाहीत. असे असतानाच कोरोनाची तिसरी लाट देखील धडकणार आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. पण ही लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल असं देखील सांगितलं जात आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-१९  संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणा कोलमडून गेली. त्यातच, तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे.  कोव्हिड-१९ ने देशभरात हाहाःकार माजवला आहे.  ही लाट नाही, त्सुनामी आहे. या शब्दात डॉक्टर परिस्थितीचं वर्णन करत आहेत. देशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गाने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. 


                 राज्यात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट झपाट्याने आली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. यातील काहींना कोरोना सदृश लक्षणही जाणवत नाहीत. पण तरीही त्यांना लागण झाल्याचे उघड होत आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना सर्वप्रथम लस देणे गरजेचे आहे. पुढील सहा महिन्यात लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसरी लाटेचा प्रभाव कमी होईलच. अनेक राज्यांनी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे गंभीर परिणाम आपण भोगत आहोत.  संसर्ग इतक्या झपाट्याने पसरेल याचा अंदाज नव्हता. व्हायरसचा नवीन स्ट्रेन तीव्रतेने संसर्ग करणारा आहे. विषाणूचं मूळ रूप बदललं का हे शोधण्यासाठी अधिक संशोधन करावं लागेल. आपण फार कमी जिनोम सिक्वेंन्सिंग करतोय. कुठला स्ट्रेन पसरतोय याचा अभ्यास करावा लागेल.  राज्यातून दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला ओसरण्यास सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला गेला.  पण, लाट ओसरणं लोकांवर अवलंबून आहे. लोकांनी मास्क घालायला पाहिजे. राज्यात कडक निर्बंध लाऊनही रुग्ण सापडत आहेत आणि मृतांची संख्याही वाढतच आहे. 

                     कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते. पण जेव्हा ती येईल तेव्हा ती किती धोकादायक असेल, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. कोरोनाचे रुपांतर सतत होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार असायला हवे. कोरोनाची लस प्रभावी आहे. पण त्यात अजून कशी सुधारणा करता येईल, यावर संशोधन सुरु आहे. थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती सर्वाधिक असते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यापूर्वी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. तसेच पुढील काळात तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. परंतु देशात याच कालावधीत फारशी गंभीर परिस्थिती नव्हती. त्यामुळे हा दावा सपशेल खोटा ठरला. कोरोनाची दुसरी लाट मार्चपासून महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये कहर पसरवताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीदेखील महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 
                  कोरोनाची तिसरी लाट ही तीन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून आहे. यातील पहिला घटक म्हणजे लसीकरण, दुसरा आहे महाप्रसारक, तिसरा विषाणूच्या नव्या प्रकारांचा  शोध घेणे. म्हणजे सर्वात आधी येत्या डिसेंबरपर्यंत आपल्याला कोरोना लसीकरण करावे लागेल. त्यानंतर दुसरे म्हणजे आपण महाप्रसारकांना व त्यांच्या प्रसाराला किती रोखू शकतो ? तिसरे म्हणजे आपण नव्या उत्परिवर्तित विषाणूंचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. भारत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच कोव्हिड-१९ ची तिसरी लाट येणार असल्याचं केंद्र सरकारनंही स्पष्ट केलं आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाययोजना करावी लागेल. त्यात संपूर्णत: लसीकरणाची दृढमूल योजना आखावी लागेल. सद्याची परिस्थिती पाहता ते कठीणच आहे.  दुसर्‍या लाटेतून बाहेर पडण्यासोबत आपल्याला कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्या लागतील. तसेच कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आक्रमक रणनीती तयार करण्याची गरज आहे. खेडोपाडी आपल्याला चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. यासंदर्भाने पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागेल. त्या कमी कालावधीत उभाराव्या लागतील.

                 कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एक महत्त्वाचं हत्यार आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याने देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. रोगप्रतिकारशक्ती किंवा लशीमुळे विषाणूवर दवाब निर्माण होतो. यातून तो निसटण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण तयारी केली पाहिजे. सद्य:स्थितीत लशीचा विषाणूविरोधात चांगला प्रभाव दिसून येत आहे. पण येणाऱ्या काळात विषाणू बदलल्याने लशीतही बदल गरजेचे असतील. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशभरात पाच नवे जीन आढळून आले आहेत. त्यात एक दुहेरी उत्परिवर्तकही आहे. तज्ज्ञांच्या मते, हा   रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा असल्याने याचा प्रसार तीव्र वेगाने होत आहे. याची संसर्ग क्षमताही खूप जास्त आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढली की विषाणूला पळण्यासाठी जागा मिळत नाही. मग हा विषाणू नवीन रस्ते शोधून काढतो. त्यामुळे त्याची संसर्ग क्षमता जास्त असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लसीकरण वाढलं तर नवीन प्रकारचे पर्याय तयार होतील. आपल्याला त्यासाठी तयार रहावं लागेल, असंही ते सांगतात.  तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती गंभीर असेल हे पाहावं लागेल. याचं कारण, विषाणूंचे उत्परिवर्तन होत राहणे हे आहे. महाराष्ट्रात दुहेरी उत्परिवर्तन, तर बंगालमध्ये तिहेरी उत्परिवर्तनाच्या अवस्थेत आढळून आला आहे. नागपूरात कोरोना विषाणूमध्ये पाच प्रकारचे उत्परिवर्तन आढळून आले आहेत. 

               तिसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त गंभीर पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल असा अंदाज आहे. तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे. किती लोकांचं लसीकरण होईल. त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे अवलंबून असेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यू कमी होण्यास मदत होईल.  तिसरी लाट येण्याची सूचना मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने खबरदारीची उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना ही एक २०२० साली आलेली एक महामारी होती. कोरोना आता संपला, लस पण आली  आहे. मग काय बिनधास्त फिरा! आता काही काळजी नाही, या बेफिकिरीमधून जनता चौखूर उधळली . ना तोंडावर मास्क ना शारीरिक अंतराचे  पालन. सर्वत्र कोरोना गेल्याचे दृश्य दिसत होते.  पण हीच मानसिकता आणि अतिआत्मविश्वास आपल्यावरच उलटला.  हे अत्यंत भितीदायक चित्र होते. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध राज्यात त्याचे बरे वाईट परिणाम दिसू लागले. नवी दिल्लीत दुसरी आणि तिसरी लाट आली. तर गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आदी राज्यात दुसरी लाट हळू हळू सुरू झाली. कारण कोरोना संपूर्णपणे गेला नव्हता. नष्ट झाला नव्हता. त्यांने या काळात आपल्यासारख्या नव्या विषाणूंना जन्म दिला. 

                 महाराष्ट्रचा विचार केला तर  गतवर्षी राज्यात जवळपास सर्व मुक्त झाल्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले. पण ते करताना नियमांची सरळसरळ पायमल्ली होत होती. कोरोनाचे सौम्य रुग्ण दवाखान्यात येत होते तसे गंभीर रुग्णही येत होते. रुग्णांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करीत होते. रेमडेसिवर किंवा प्लाझ्मा दिल्याने रुग्णाना फरक पडतो, हे डॉक्टरही मानत असले तरी इंजेक्शनची गरज ज्या पद्धतीने निर्माण झाली तेवढ्याच तीव्रतेने बाजारात मागणी वाढली. रेमडेसिवरचा काळाबाजारही होऊ लागला. या इंजेक्शनवरुन राजकारणही तापले. रेमडेसिवरचे जसे इतर घातक परिणाम दिसून येतात तसेच प्लाझ्मा देऊनही रुग्णांच्या फायद्याचे ठरणारे नाही, तरीही आपण त्यामागेच धावतो आहोत. उलट प्लाझ्मामुळे नवा विषाणू शरीरातच जन्माला येतो. ही वेळ येते त्याचे कारण म्हणजे लोकांचा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा हे आहे. आता लस आली आहे मग काळजी नाही ही वृत्ती खूप धोकादायक आहे. कारण जी लस उपलब्ध होणार आहे ती किती प्रभावी आहे आणि ती किती काळ मानवी शरीरात काम करेल याची कोणाला खात्री नाही. मुळात लस आणि औषध यातील फरक अजून जनतेला समजला नाही.‌ लस ही त्या विषाणूला अटकाव करण्यासाठी शरीरात काम करते. पण तिचा प्रभाव किती काळ राहील याबाबत लस निर्माते ठामपणे सांगू शकत नाहीत. विविध पातळ्यांवर कसोटीस पात्र ठरून मग ही लस तयार होते.हा विषाणू त्याचे मूलभूत अंतर्गत बदल करतो ज्याला जेनेटिक चेंजेस म्हटले जाते. त्यामुळे त्याची लक्षणे ही नेहमी बदलत असतात. सध्या जी लस विविध कंपन्या तयार करत आहे त्यामध्ये संशोधन करताना विषाणूच्या कोणत्या लक्षणावर अभ्यास केला आहे हे पाहणे महत्वाचे ठरते. रशियाने स्फुटनिक नावाची लस घाईघाईने बाजारात आणली पण ती यशस्वी ठरली नाही. सद्या भारतात लसीकरण सुरू आहे तरीही तज्ज्ञ तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करीत आहेत. 

                 दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या प्रत्येक थेंबासाठी रुग्ण व्याकूळ झाले होते. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने काहींना प्राण गमवावे लागले. कुठेही बसून आॅक्सिजन घेण्याची रुग्णांवर वेळ आली. अनेक ठिकाणी अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. आॅक्सिजन गळतीमुळे, कमी दाबामुळे किंवा आॅक्सिजनच न मिळाल्याने अनेक रुग्ण तडफडून गतप्राण झाले. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा नाहीत.‌ रेमडेसिवर इंजेक्शन न  मिळाल्याने वा त्याचे राजकारण झाल्याने अतिगंभीर रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण हैदराबाद येथे जात होते. काही अपवाद वगळता सर्वच रुग्ण वारेमाप खर्च करूनही जिवंत परत आले नाहीत. तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती येऊ नये यासाठी प्रत्येक शासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लांट असला पाहिजे. लिक्विड ऑक्सिजन ठेवण्यासाठी टँक असला पाहिजे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स उपलब्ध असल्या पाहिजेत तर, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पहाता, प्रत्येक महापालिका ऑक्सिजनबाबतीत आत्मनिर्भर होईल अशी व्यवस्था झाली पाहिजे. ऑक्सिजन आणि व्हॅन्टीलेटर्सचा साठा पुरेसा आहे का नाही याची खात्री करूनच आपण लढाईत उतरु शकतो. एवढेच नव्हे तर रात्रंदिवस काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे मनोबलही वाढविण्यासाठी गरज आहे. 

                 मोठी जीवितहानी घडवलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर अनेक राज्यांत उतार लागल्याचे दिसत आहे. ही लाट अनेक राज्यांत एक तर सपाट होताना किंवा तिचा आलेख खाली येताना दिसतो आहे. उत्तर प्रदेश, बिहार या फार मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांत गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहे आणि रविवारी त्या संख्येत लक्षणीय घट झाली. पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या सपाट होऊ लागली आहे. महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या हळूहळू स्थिरावत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिलीये. राज्यातील १३ जिल्ह्यात कोव्हिडच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या रचनेत बदल होणं. विषाणूच्या दोन जनुकात बदल झाल्याने याला ‘डबल म्युटेशन’ म्हंटलं जातं. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला हे म्युटेशन चकवत असल्याने संसर्ग तीव्रतेने पसरतो. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यामागे म्युटेशन कारणीभूत आहेत. कोरोना व्हायरसमध्ये झालेलं म्युटेशन खूप धोक्याचे आहेत. यामुळे खूप जास्त फंगल इंन्फेक्शनचे आजार होत आहेत. हा म्युटंट कहर पसरवतोय. कोव्हिड न्यूमोनियासोडून इतरही आजार या म्युटंटमुळे होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डोळे आणि नाकामध्ये संसर्गाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अनेक रुग्णांची या आजारामुळे दृष्टी गेली आहे. आजार जास्त पसरल्याने काहींचे डोळे काढावे लागत आहेत. केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात हे म्युटेशन आढळून आलं आहे. इतर म्युटेशनसारखंच हे एस्केप म्युटेशन आहे. जगभरातील १६ देशात हा नवीन स्ट्रेन सापडला आहे. डबल म्युटंट खूप तीव्रतेने संसर्ग पसरवणारा आहे. हा म्युटंट कोव्हिडविरोधी लशीला प्रतिकार करणारा असू शकतो. लस घेतलेल्यांनाही हा जीन हल्ला करू शकतो.

         – गंगाधर ढवळे, नांदेड.     

      मो. ९८९०२४७९५३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *