योगवर्गामुळे जुळला गोतावळ्याचा योग , योग साधनेने पळाले सर्व रोग..

कंधार तालुक्यातील डोंगराळ , कड्या कपाऱ्याचा ग्रामीण भाग म्हणून ओळख असलेल्या मन्याड खोऱ्यातील पानशेवडी येथील भूमिपुत्र असलेले नीळकंठ बापूराव पाटील मोरे म्हणजे माझ्या आईचे चुलत बंधू . तसेही माझ्या आईला सख्खा भाऊ नसल्यामुळे नीळकंठ मोरे सह सर्व त्यांचे बंधुच माझ्यासाठी सख्खे मामा त्यामुळे तसा आमचा गोतावळा जुनाच…

त्यामुळे मी माझ्या आईच्या स्मरणार्थ राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून फुलवळ येथे ऑक्टोबर २०१६ ला येथील श्री. बसवेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात सलग सात दिवस मोफत योग-प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि याच जुन्या नातेसंबंधाचा फायदा घेत माझे मामा तथा आपले सर्वांचे योग शिक्षक , योगगुरू आदरणीय नीळकंठ मोरे सर यांना प्रमुख मार्गदर्शक निमंत्रित केले होते. तेंव्हा दररोजच्या शिबिराला १५० ते २०० महिला-पुरुष , लहान-थोर योगसाधकांची उपस्थिती राहत होती. या सात दिवसाच्या शिबिरासाठी नीळकंठ मोरे सर हे कंधारहुन भल्या पहाटे स्वतःच्या पदरचे पेट्रोल खर्च करून शिबिराला उपस्थित राहत असायचे.

या योग शिबिराच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रातून प्रकाशित झाल्या आणि तेंव्हा पासून नीळकंठ मोरे ची फुलवळ व परिसरात एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि फुलवळ पंचक्रोशीत सर्वत्र योगगुरू मोरे सर हे नाव प्रचलित झाले. ६ ऑक्टोबर हा माझ्या आईचा स्मृतिदिन असल्याकारणाने २०१६ पासून सलग तीन वर्षे आम्ही फुलवळ येथे मोफत योगशिबिराचे आयोजन केले. त्यावेळी नीळकंठ मोरे सर हे आपली निःस्वार्थ सेवा बजावत भल्या पहाटे फुलवळ येथील योगशिबिराला उपस्थित राहायचे. फुलवळ परिसरात दिवसेंदिवस मोरे सर आणि योग प्राणायामची लोकप्रियता वाढत गेली आणि मोरे सर आता केवळ माझेच मामा राहिले नसून या भागातील प्रत्येक योगसाधकांचे ते जणूकाही मामाच बनले कारण रस्त्यात भेटलेला प्रत्येक योगसाधक मग तो पुरुष असो की ,महिला असो का लहान मुलं असोत ते सर्वचजण त्यांना मामा योगगुरू याच नावाने हाक मारू लागले.

सलग तीन वर्षाचे फुलवळ येथील योगशिबिर पूर्ण करून चौथ्या वर्षाचे योगशिबिराचे नियोजन चालू असतानाच फुलवळ अगोदर आपल्या मायभूमीत म्हणजे पानशेवडी येथे योगशिबिराला सुरुवात करावी या हेतूने मोरे सरांनी पानशेवडीला योगशिबिराचे आयोजन केले होते,आणि त्यानुसार दोन वर्षांपूर्वी भल्या पहाटे कंधारहुन फुलवळ मार्गे पानशेवडीला जात असताना फुलवळ शिवारात त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला जबर मार लागल्यामुळे ते जागीच कोसळले आणि त्रासाने विव्हळत मदतीसाठी भाचा म्हणून पहिला फोन त्यांनी मला केला . त्याच क्षणी मी धावत गेलो आणि मोरे सरांना व त्यांच्या गाडीला त्या खड्ड्यातून बाहेर रोडवर काढले, त्यानंतर फुलवळ येथीलच एका वाहन चालकाला फोन करून बोलावून घेतले आणि नीळकंठ मोरे सरला कंधार येथील जाधव हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर भगवानरावजी जाधव सर यांच्याकडे उपचारासाठी त्यांना दाखल केले , त्यानंतर डॉक्टर साहेबांनी ही क्षणाचाही विलंब न करता उपचार सुरू केले असता एक्सरे काढल्यानंतर पायाचे हाड फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा प्रथोमोपचार करून डॉ.जाधव यांनी मोरे सरांना पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर केले. मग आम्ही लगेच नांदेडला जाण्याची तयारी केली आणि योगायोग नांदेडला ज्या डॉक्टर कडे उपचारासाठी गेलो ते डॉ.अशोक मुंडे हे नीळकंठ मोरे सरांचे वर्ग मित्रच निघाले. त्यामुळे पुढील उपचार सोयीचे गेले.

येथील उपचारानंतरही पाय दुरुस्त झाला नसल्याने आणि त्रास जास्तच होत असल्याने पुन्हा त्यांना पुणे येथील तज्ञ डॉक्टर कडे उपचारासाठी दाखल केले , तेथे त्यांच्या पायाचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि आता कुठे नीळकंठ मोरे सरांनी हळूहळू आपल्याला पायावर चालायला सुरुवात केली. पण काही केल्या त्यांच्यातला योगगुरु काही केल्या त्यांना गप्प बसवत नव्हता आणि त्यांची निःस्वार्थ सेवा त्यांना नेहमीच सांगत होती की ऊठा नीळकंठराव या कोरोना सारख्या महामारीच्या काळात तुमच्या योगसाधकांना तुमच्या योग शिबिराची आणि तुमच्या सकारात्मक मार्गदर्शनाची आजघडीला अत्यंत गरज असून आजपर्यंत जी तुम्ही निःस्वार्थ सेवा सर्वांना दिली त्याचच फलित म्हणून तुम्ही आज तुमच्या पायावर उभे आहात, एवढ्या मोठ्या अपघातातुन सावरला आहात तेंव्हा तीच सेवा पुन्हा चालू करा आणि भयभीत झालेल्या लोकांना या महामारीतून सावरण्यासाठी मदत करा , असा अंतर्मनाचा आवाज त्यांच्या कानचाळी पडला आणि पुन्हा एकदा जोशपूर्ण उत्साहाने मोरे सर जनसेवेसाठी सज्ज झाले.

या कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सचा वापर करावा म्हणून आणि आपल्याच नेहमीच्या लोकांबरोबरच परिसरातील व योगावर प्रेम करणाऱ्या योगसाधकांना योगाचा लाभ कसा करून देता येईल याकरिता ३ एप्रिल २०२१ पासून ऑनलाईन गुगलमीट च्या माध्यमातून दररोज पहाटे योगवर्ग सुरू करण्याचा संकल्प केला. तेंव्हा या ऑनलाईन योग वर्गाचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून पुन्हा आम्ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून तशा बातम्या प्रकाशित केल्या. आणि त्याचाच फायदा की काय म्हणावे आजघडीला कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील तर योग साधक या ऑनलाईन योगवर्गाला जुळलेच परंतु संबंध महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक योगसाधक या योगशिबिराला जॉईन झाले आहेत, आणि दररोज योगवर्गाचा लाभ घेत आपापले आरोग्य सुरक्षित ठेवण्यात यशस्वी होत आहेत.

पेशाने शिक्षक असलेल्या नीळकंठ मोरेचा गेले अनेक दिवसांपासून वेळेवर पगार होत नाही वरून हा दवाखान्याचा खर्च , घर खर्च एवढा सगळा लोड असताना ही मोरे सर दैनंदिन जीवनात अत्यंत उत्साही राहून जीवन जगतात आणि आपल्या सर्वांना ही उत्साहवर्धक जीवनाचे डोस देतात. म्हणूनच तर म्हणतोय योगवर्गामुळे जुळला गोतावळ्याचा योग , योग साधनेने पळाले सर्व रोग..

एक योग साधक…

या योगवर्गाचा स्वतः मला तर लाभ झालाच परंतु मी आईच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या योगवर्गाचा बहुतांश फुलवळवासीयांना निरोगी राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. आजही अनेक योगसाधक फुलवळ येथे योगशिबिर आयोजित करा अशी मागणी करत होते.

परंतु कोरोना चा काळ आणि मोरे सरच्या पायाच्या अडचणी मुळे ते शक्य नसल्याने आजघडीला ऑनलाईन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले असल्याने अनेकजण या ऑनलाईन वर्गातही सामील झाले आहेत.

माझ्या आपल्या सर्वांना एक भावनिक आवाहन आहे की सध्याची परिस्थिती खूपच नाजूक असून आजघडीला माणूस तळहातावर मरण घेऊन जीवन जगत आहे. तेंव्हा कुठलाही आणि कसल्याही प्रकारचा गर्व न बाळगता हसतखेळत जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने आपापल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्वतःसाठी नाही तरी आपल्या पाठीमागे असलेल्या परिवाराचा विचार करून तर का होईना आपणही सुरक्षित राहा आणि कुटुंबातील लोकांना ही सुरक्षित ठेवा , त्यासाठी नित्यनेमाने योग प्राणायाम करा आणि निरोगी राहा.

धोंडीबा बाबाराव बोरगावे फुलवळकर

मो. 9960004399 & 9890001899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *