यावर्षी खरीप हंगाम वेळेवर सुरू होण्याची अपेक्षा आहे हवामाना खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पुरेसा व सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे .कंधार तालुक्यातील बळीराजा आता पेरणीसाठी सज्ज होत असून शेत शिवारात पुर्वमशागतीच्या कामांना वेग आला असून उन्हाळी पिकाची काढणीही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे येत्या पंधरवड्यात पिक काढण्याचे काम पूर्ण होईल व मशागतीचे काम पूर्णत्वाकडे जाईल.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना खालील बाबींचा कटाक्षाने अवलंब करावा.
सोयाबीन बियाणेची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करा
सोयाबीन बियाणे विकतचे असो वा घरचे पेरणीपूर्वी या बियाण्याची उगवणक्षमता चाचणी अवश्य करा.बारदान्याचा पोत्याला पाण्यात भिजवून या पोत्यावर पेरणीसाठी वापरावयाचे बियाण्याचे १०० दाणे ओळीत ठेवून पोत्याची गोल गुंडाळी करावी दोन दिवसांची उगवलेल्या बियाण्याची मोजणी करावी१०० बियांपैकी ७० बियां उगवल्यास एकरी ३० किलो तर ६५ बियां उगवल्यास एकरी ३५ किलो बियाण्याचा वापर करावा.
बिज प्रक्रिया करूनच पेरणी करावी
। सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे आहे.पिकाचे किड रोगांपासून संरक्षण होण्यासाठी,उगवण चांगली होण्यासाठी बियाणे प्रक्रिया अतिशय महत्त्वाचा घटक आहे.सोयाबीन बियाण्यास रासायनिक बिज प्रक्रिया करण्यासाठी ३ग्रॅम बावीस्टीन किंवा थायरम तर जैविक प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा,रायझोबियम,स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) याची बिजप्रक्रिया करावी.रायझोबिअमच्या वापराने सोयाबीनच्या मुळावरील गाठी हवेतील नत्र शोषून पिकाला नत्राचा पुरवठा करतात व जमीनीत नत्र स्थिरीकरण करतात.पीएसबी मुळे पिकाला स्फुरदाची उपलब्धता वाढते.पेरणीपुर्वी बिज प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी पेरणीपूर्वी करावी.
पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा.
बरेच शेतकरी बांधव शेताची मशागत ट्रॅक्टरद्वारे करत असल्याने मोठ्या प्रमाणावर जमीन भुसभुशीत होते अशा जमिनीत सोयाबीनची पेरणी करताना १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय सोयाबीनची पेरणी सुरू करू नये तसेच पेरणी ही पाच सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
रूंद वरंबा सरी पद्धतीनेच सोयाबीन पेरा
सोयाबीन पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी या पद्धतीने केल्यास बियाणे वापरात १५ ते २० टक्के बचत होते त्याचबरोबर उत्पादनातही १५ ते २० टक्के वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यात मागील खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीने पेरणी केली होती पानभोसी, चिंचोली ,पेठवडज , कंधार,यासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी या पद्धतीने पेरणी करत सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेतल आहे.
बीबीएफ पेरणी यंत्र गावात उपलब्ध नसेल तर ५ फणी ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्राचं मधलं फण बंद करून पेरणी करावी जेणेकरून चार तासानंतर एक तास रिकामं राहिल या तासात बळीराम नांगराच्या साह्याने सरी पाडून घ्यावी जर ७ फणी ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्र असेल तर यातील मधलं फण बंद करावं जेणेकरून प्रत्येक ६ तासानंतर एक तास रिकामं राहील व या तासात पेरणीनंतर बळीराम नांगराच्या साह्याने सरी पाडून रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करता येतो. याशिवाय पेरणीपूर्वी गादीवाफे तयार करून अशा गादीवाफ्यावर किंवा सऱ्या पाडून सर्ऱ्याच्या दोन्ही बगलेस सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड केल्यास बियाण्यात बचत होते व उत्पादनात भरीव वाढ होते.
सोयाबीन पिकास रासायनिक खतांचा पेरणीपूर्वी अथवा पेरणीबरोबर वापर करावा या पिकास एकरी ४ किलो गंधकाचा वापर करावा.कुठल्याही परिस्थितीत सोयाबीन पिकाला युरीयाचा दुसरा डोस देऊ नये.
सोयाबीन पिकात आंतरपीक घ्या
ज्या शेतात खरीपाच्या नंतर रब्बीचे पीक घेता येत नाही अशा क्षेत्रांमध्ये सोयाबीन पिकात तुरीचे ४:२ किंवा ६:२ या प्रमाणात पेरणी करावी.
कापूस, ज्वारी या पिकात मुग, उडीद,तुर या पिकाचं आंतरपीक घ्यावं