पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग;कुरुळा आणि दिग्रस महसूल मंडळात चित्र

कुरुळा ; विठ्ठल चिवडे

खरिपाच्या पेरण्या अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या असून शेतकऱ्यांची शेतीकामासाठी लगबग वाढली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण अर्थचक्र कोलमडले असून खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे परंतु खरीप हंगामच जगवणारा असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आता वेग आल्याचे चित्र आहे.

कुरुळा आणि दिग्रस महसूल मंडळात कोरडवाहू शेती क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची मदार खरीपावरच आहे.खरीप हंगामाचे पूर्वनियोजन करत शेतकऱ्यांनी कंबर कसली असून मशागतीच्या कामांना वेग आला आहे.ट्रॅक्टर व बैलांच्या साहाय्याने नांगरणी, वखरणीची कामे अंतिम टप्यात आली असून काडी-कचरा वेचनी करून जमिनी पेरणीसाठी सज्ज होत आहेत.मागील सलग दोन हंगामातील अतिवृष्टीमुळे हाती येणाऱ्या पिकाची नासाडी झाली त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी एकंदरीत परिस्थिती बनली आहे.बँकांनीही कर्जाच्या बाबतीत हात आखडते घेतले,अनेकांना कर्ज नाकारले यामुळे महागडी खते बियाणे खरेदी हा शेतकऱ्यांसमोर यक्षप्रश्न बनला आहे.अचानक झालेली खतांची व बियाणांची दरवाढ शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणारी असून त्यातच कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होताना दिसत आहे.

संबंधित प्रशासनाचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.जुन्या रासायनिक खतांची चढ्या दराने विक्री होत असून नाईलाजास्तव शेतकरी खाजगी सावकारकीच्या पाशात अडकणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.कोरडवाहूचा आधार आणि त्यात वाढणारा आर्थिक भार यामुळे शेतकरी पिचल्या जात आहे.त्यामुळे खते बियाण्यांचे दर कमी होऊन दिलासा मिळाला व कृषी केंद्रावर प्रशासनाची करडी नजर राहिल्यास निश्चितच शेतकऱ्यांना आधार होऊ शकतो.

पीकविमाच जगवणार:
मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकविम्याचा भरणा केला होता.अतिवृष्टीने सोयाबीन,कापूस,तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.घसरलेली आणेवारी आणि पीक कापणी प्रयोगाअंती दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे भरीव स्वरूपात विम्याचा आर्थिक आधार मिळणार अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.कंधार तालुक्याला विम्याची केवळ एकच कोटी रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *